करीना कपूरला कोरोना झाला हे सगळ्यांनाच माहीत आहे. सध्या ती विलगीकरणात असली तरी सोशल मीडियवरुन ती तिच्या तब्येतीची खबरबात तर देत असतेच तसेच नेहमीसारख्या आपल्या आवड्या निवडीच्या गोष्टीही शेअर करते. नुकतीच ती तिच्या इंस्टाग्राम स्टोरीतून हिवाळ्यातल्या तिच्या स्पेशल् डिशबाबत बोलली. आणि नुसती बोलली नाही तर तिनं फोटोही टाकला. तो फोटो पाहून विलगीकरणात राहूनही खाण्या- पिण्याची मजा करणाऱ्या करीनाबाबत हेवा वाटला, कौतुकही वाटलं आणि तिन्ं शेअर केलेला फोटो पाहून तोंडाला पाणीही सुटलं.
Image: Google
करीनानं शेअर केलेला फोटोत दिसते ती मोहरीची भाजी आणि मक्याची भाकरी. म्हणजेच आपल्या सर्वांच्या आवडीची सरसो का साग और मक्के की रोटी. फोटो शेअर करताना गरमागरम भाकरीवर लोण्याचा गोळा असला की मी स्वत: ला खाण्यापासून रोखूच शकत नाही. करीनाचं ही स्टोरी पोस्ट केल्यानंतर करीना अगदी आपल्या मनातलं बोलली अशी भावना ते वाचणाऱ्यांच्या मनात निर्माण झाली. नुसतं नाव काढताच तोंडाला पाणी आणणारा हा बेत अनुभवण्यासाठी बाहेर हॉटेलमधेच जायला हवं असं नाही, तर हिवाळ्याच्या दिवसात हा बेत आपण घरच्याघरीही करु शकतो. फक्त हा बेत करताना हातात थोडी सवड हवी हे मात्र खरं.
Image: Google
मोहरीची भाजी आणि मक्याची भाकरी
हिंदीमधे हिरव्या पालेभाजीच्या पातळ भाजीला साग म्हणतात. पंजाब, हरियाणा, उत्तर भारतातील ही प्रसिध्द भाजी. हल्ली पंजाबी रेस्टोरण्ट सगळीकडेच झाल्यानं या भाजीची चव संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर प्रसिध्द आहे. ही भाजी मक्याची भाकरी सोबत असल्याशिवाय मजा येतच नाही. त्यामुळे ही भाजी करणार असल्यास मक्याची भाजीही आवर्जून करावी.
Image: Google
मोहरीची भाजी कशी करणार?
मोहरीची भाजी ही तब्येतीत आणि भरपूर उसंत असताना करण्याची गोष्ट आहे. आणि अर्थातच ही भाजी आणि भाकरी खाण्यासाठी पोटात मस्त भूक पेटलेली हवी.
मोहरीची भाजी करण्यासाठी १ जुडी मोहरीची भाजी, अर्धी जुडी पालक, थोडी मेथी, थोडी चाकवताची भाजी , भरपूर लसणाच्या पाकळ्या, १ इंच आलं, अर्धा लहान चमचा हळद, चिमूटभर हिंग, २ मोठे कांदे (बारीक चिरलेले) , २ टमाटे (बारीक चिरलेले) , २ मोठे चमचे मक्याचं पीठ, २ चमचे तिखट, फोडणीसाठी १ मोठा चमचा तेल, १ मोठा चमचा तूप, १ छोटा चमचा जिरे, चिमूटभर हळद मीठ आणि भाजीवर वरुन घालण्यासाठी लोणी घ्यावं. आणि भाजी झाल्यावर वरुन घालण्यासाठी गरम मसाला . हा मसाला घरीच तयार करावा. यासाठी मिरे, लवंगा, दालचिनी, मोठी वेलची हे समप्रमाणात घेऊन ते भाजावे. भाजलेले जिन्नस गार झाले की मग मिक्सरमधे वाटून त्याची पूड करावी.
मोहरीची भाजी करताना आधी मोहरी , पालक, मेथी आणि चाकवत या पालेभाज्या निवडून स्वच्छ धुवून घ्याव्यात. नंतर सर्व भाज्या जाडसर चिराव्यात. चिरलेली भाजी कुकरच्या भांड्यात घालून किंवा छोट्या कुकरमधे घालावी. त्यातच लसणाच्या पाकळ्या, आलं यांचे तुकडे करुन घालावेत. हळद आणि हिंग घालून थोडं पाणी घालावं. कुकरच्या दोन शिट्या घ्याव्यात. वाफ मुरली की शिजलेली भाजी बाहेर काढून ती गार होवू द्यावी. नंतर भाजी मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटावी. भाजी वाटतानाच त्यात मक्याचं पीठ घालावं आणि मिश्रण एकजीव करावं.
Image: Google
एका कढईत तेल आणि तूप एकत्र करून गरम करावं. त्यात जिरं घालून ते तडतडू द्यावं. त्यात हळद आणि हिंग घालावा. कांदा घालून तो गुलाबीसर परतून घ्यावा. कांदा मऊ शिजला की त्यात चिरलेला टमाटा घालावा. टमाटा तेल सुटेपर्यंत परतावा. तो चांगला शिजायला हवा. नंतर त्यात तिखट घालून मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. त्यात वाटलेली भाजी घालावी, ती मिश्रणात एकजीव केल्यावर त्यात मीठ घालून भाजी पुन्हा नीट हलवून् घ्यावी. भाजी रटरटली की त्यावर झाकण ठेवून् ती 5- 10 मिनिटं शिजू द्यावी. गॅस बंद करण्याआधी त्यात छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालावा. भाजी पुन्हा हलवून गॅस बंद करावा.
Image: Google
मक्याची भाकरी करताना..
२ वाट्या मक्याचं पीठ , १ वाटी कणीक घ्यावी. भाकरीचं पीठ भिजवतो तसं कोमट पाण्यान्ं पीठ भिजवावं. पीठ नीट मळल्यावर थापून किंवा हलक्या हातानं लाटून भाकरी कराव्यात. या भाकरी खरपूस भाजाव्यात. भाजताना तूप लावावं. खाताना गरम मक्याच्या भाकरीवर लोण्याचा गोळा तर ठेवावाच शिवाय गरम भाजीतही लोणी घालून् ती खावी.