जेवणाची रंगत वाढवण्यासाठी ताटात लोणचे, पापड, कोशिंबीर वाढले जाते. भारतीय लोकांना जेवणासोबत चमचमीत पदार्थ खाण्याची सवय असते. काही लोकांना चटकदार खाल्ल्याशिवाय जमत नाही. भारतात चपाती - भाजी, डाळ - भात हा कॉमन प्रकार आहे. मात्र, जर ताटात खिचडी वाढली असेल तर, सोबतीला लोणचे, तूप अथवा पापड हे लागतेच.
तोंडी लावण्यासाठी आपण लोणचं खातो. त्यात आंब्याचे लोणचे हे प्रत्येकाचे प्रिय आहे. लोणच्यामध्ये देखील विविध प्रकार आहेत. मात्र, कधी कधी लोणचं खाऊन कंटाळा येतो. आपल्याला काहीतरी हटके आणि वेगळं ट्राय करायचे असेल तर, ढाबास्टाईल मसाला गार्लिक ही रेसिपी ट्राय करा. हा पदार्थ बनवण्यास अत्यंत सोपा आहे. कमी वेळात झटपट बनणारा हा पदार्थ चटपटीत लागतो. मसाला गार्लिक आपण नान, रोटी, अथवा भाताच्या खिचडीसोबत देखील खाऊ शकता. चला तर मग या झटापट चटपटीत पदार्थाची कृती पाहूयात..
मसाला गार्लिक बनवण्यासाठी लागणारं साहित्य
लसणाच्या पाकळ्या
तेल
मीठ
लाल तिखट
काळे मीठ
चाट मसाला
लिंबू
कृती
सर्वप्रथम, लसूण सोलून घ्या. लसणाच्या पाकळ्या एका बाऊलमध्ये काढून घ्या. दुसरीकडे एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या टाका. गोल्डन ब्राऊन रंग येऊपर्यंत लसणाच्या पाकळ्या चांगले खरपूस तळून घ्या.
लसणाच्या पाकळ्या तळून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढा. टिश्यूच्या मदतीने त्यातील अतिरिक्त तेल काढून घ्या. त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये तळलेले लसणाच्या पाकळ्या घ्या. त्यात चवीनुसार मीठ, काळे मीठ, लाल तिखट, चाट मसाला आणि लिंबाचा रस टाका. हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करा. अशा प्रकारे झटपट चटपटीत मसाला गार्लिक खाण्यासाठी तयार.
ज्यांना लसूण खायायला आवडत नाही त्यांना ही रेसिपी नक्की आवडेल. आपण ही रेसिपी एका डब्ब्यात झाकून फ्रिजमध्ये ठेऊ शकता. एक आठवडापर्यंत हा पदार्थ आपण खाऊ शकता. मात्र, खाण्याअगोदर या पदार्थाला थोडे गरम करून खा.