भक्ती सोमण-गोखले
आता मुलांच्या शाळा सुरू होत आहेत. काही शाळा तर सुरुही झाल्या. आणि मग दोन वर्षे जो प्रश्न शांत बसला होता तो पुन्हा छळायला लागला. आज डब्यात काय द्यायचं? अनेक शाळांमध्ये दोन डबे द्यावे लागतात. एक नाश्त्याचा तर दुसरा पोळी भाजीचा. रोज नाश्त्याला डब्यात काय द्यायचे? कारण शेव, कुरकुरे, चिप्स असे चटरफटर जंक पदार्थ देऊ नये असं शाळाही सांगतात, आईलाही ते मान्यच असतं. मात्र मुलांनी खायलाही हवे ते पदार्थ सकाळच्या घाईत लवकरही व्हायला हवेत. मग तो डबा पौष्टीक करण्यासाठी आयांना विविध कल्पना लढवाव्या लागतात. तेच काम सोपं व्हावं, कल्पक पदार्थ सुचावे म्हणून ही थोडी मदत..माझी मैत्रीण ज्ञानदा देशपांडे हिची मुलगी प्रज्ञा पट्टीची पोहणारी आहे. दिवसभर शाळा आणि संध्याकाळी पोहणे. खेळाडू मुलीला उत्तम पौष्टीक पदार्थ देणं, डाएट परिपूर्ण असणं यासाठी ती प्रयत्न करतेच. ज्ञानदा सांगते, आजकाल अनेक मुलं शाळेव्यतिरिक्त खूप काही करत असतात. माझी मुलगीही याला अपवाद नाही. त्यामुळे मी कणकेचा खाकरा, घरी तूप केल्यावर जी बेरी उरते त्या बेरीत कणीक घालून ती थोडी भाजून त्याचे लाडू करते, कडधान्यांमध्ये विविध पीठं घालून त्याची थालिपीठंही छान लागतात. शिवाय ती पोटभरीचे होतात. रोजच्या कणकेत मीठ घालतोच. पण त्याऐवजी डिंकाची पावडर घालून ती पोळीही मुलं आवडीने खातात.’असेच कल्पक हे काही पदार्थ..
बिटाचा पराठा
मुलांना बीट फारसं आवडत नाही. अशावेळी त्यांना छोट्या डब्यासाठी बिटाचा पराठा देता येईल. त्यासाठी एक छोटं बीट उकडून घ्यायचं. ते बीट कुस्करून त्यात बारीक किसलेलं गाजर, थोडा उकडलेला बटाटा, थोडंसं तिखट, मीठ, धणे;, जीरे पावडर आणि गव्हाचे पीठ एकत्र करून कणीक मळून घ्यायची. त्यानंतर लाटून तव्यावर खरपूस भाजून घ्यायचे. या पराठ्याला सुंदर गुलाबी रंग येतो, मुलं आवडीने खातात.
(Image : Google)
मिश्र कडधान्यांचा डोसा
हरभरा, हिरवा- पिवळा वाटाणा,मोड आलेले मुग, मोड आलेली मटकी, मसुर,मोड आलेली चवळी अशी कडधान्य थोडीथोडी एकत्र करून रात्रभर पाण्यात ठेवायची.(प्रत्येक कडधान्य आवडीनुसार एक ते दीड चमचे किंवा थोडी जास्त घेतली तरी चालतील.) आणि दुसऱ्या दिवशी सकाळी करताना मिक्सरमधून कच्ची कडधान्य, गरजेनुसार थोडं आलं- लसूण, मीठ वाटून घ्यायचे. वाटून झाल्यावर बाऊलमध्ये काढायचे. त्या सारणात बारीक चिरलेला थोडासा कांदा, गाजर, सिमला मिर्ची, कॉर्न, कोथिंबीर,चिली फ्लेक्स,गरज लागली तर थोडेसे मीठ,सारणाच्या बाईंडिंगसाठी दोन ते तीन चमचे तांदुळाचे पीठ घालावे, हे सगळं सारण त्याचे डोसे घालता येतील इतपत प्रमाण ठेवून थोडंस पाणी घालून एकत्र करून घ्यावे. या पिठाचे पॅनवर डोसे घालून घ्यावेत. दोन्ही बाजूने खरपूस भाजलेले हे डोसे लागतातही पौष्टिक. तुम्ही गरजेनुसार डोश्यावर वरून चीज घालू शकता.याशिवाय तुम्ही मुलांना ही कडधान्य एकत्र करून त्याची भेळ करून देऊ शकता.
धान्यांचा करा उत्तम उपयोग
तांदूळ, ज्वारी, बाजरी अशी पीठ समप्रमाणात वेगवेगळी भरडसर दळून घ्यायची. ज्वारीचा उपमा विविध भाज्या घालून चांगला लागतो. तसंच पालकाची, टॉमेटोची किंवा ज्या भाज्यांची प्युरी चांगली लागेल त्या प्युरीत, उकडेला बटाटा एकत्र करून ही पिठं मिक्स करून त्याचा परोठा अतिशय पौष्टीक आणि चविष्ट लागतो. हे पराठे करताना त्यात पिझ्झा सिझलिंग घालता येईल. गार्लिक पावडरीचा उपयोग करता येऊ शकेल.थोडक्यात काय, तर मुलांना पौष्टीक खाता यावं यासाठी विविध पीठ, कडधान्य यांचा उपयोग करतानाच त्यांना आवडणाऱ्या पिझ्झा, पास्ता करण्यासाठी वापरले जाणारे मसाले वापरले तर तो पदार्थ ते अधिक आवडीने खाऊ शकतात.
(लेखिका मुक्त पत्रकार असून Three Cheers हे युट्यूब चॅनल चालवितात.)