Join us  

शाळा सुरु झाली तोच प्रश्न, डब्याला काय? करा पालक इडली, हिरवीगार सुंदर पौष्टिक रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2022 4:19 PM

South Indian Dish Spinach Idli इडली हा उत्तम नाश्ता, त्यात पालक इडली चवीला तिखटही आणि पौष्टकही, करायलाही सोपी

इडली, या साऊथ इंडीयन डिशने प्रत्येकाच्या घरात स्थान मिळवलं आहे. बनवायला सोपी आणि शरीरासाठी उपयुक्त ठरणारी इडलीमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म आहेत. सकाळच्या नाश्तासाठी उत्तम मानला जाणाऱ्या या पदार्थात काही नावीन्य आणून आपण वेगळी डिश बनवू शकतो. आज आपण पालक इडली बनवणार आहोत. लवकरच लहान मुलांची दिवाळीची सुट्टी संपेल. तर, आपण टिफीनमध्ये पालक इडली देऊन आपल्या मुलांसाठी पौष्टिक डबा बनवू शकता. विशेष म्हणजे या इडलीत आपण मिरची घालणार आहोत, जेणेकरून चटणी जरी नसेल तरी देखील ही इडली चविष्ट लागेल. पालक इडली बनवण्याची पाहा सोपी कृती.

साहित्य:

इडलीचे पीठ बनवण्यासाठी

१ कप साधे तांदूळ

१/२ कप उडद डाळ

८-१० मेथी दाणे

मीठ

मिक्स करण्यासाठी:

१/२ कप पालकाची प्युरी

२-३ हिरव्या मिरच्या

कृती:

पहिली स्टेप

तांदूळ व डाळ निवडून धुवून घ्या. मग तांदूळ, मेथीदाणे व डाळ वेगवेगळे ७ ते ८ तास भिजत ठेवा. नंतर एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यानंतर हे मिश्रण परत १० तास तसेच झाकून बाजूला ठेवा म्हणजे इडलीचे पीठ चांगले फुगेल.

दुसरी स्टेप

पालकची पाने चांगले धुवून घ्या. एका बाऊलमध्ये गरम पाणी करून घ्या त्यात पालकची पाने घाला. हे पाने पाच मिनिटे चांगले उकडून घ्या. पाने उकडून झाल्यानंतर पालकची पाने दुसऱ्या बाऊलमध्ये काढा आणि त्या पानांना थंड होण्याकरिता बाजूला ठेवून द्या. 

तिसरी स्टेप

पालकची पाने थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात उकडून घेतलेली पालकची पाने, हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार, मिक्सरमध्ये चांगले एकत्र वाटून घ्या आणि बारीक पेस्ट बनवून घ्या.

चौथी स्टेप

इडलीचे पीठ, वाटलेले पालकचे मिश्रण आणि मीठ चांगले मिक्स करून घ्या. पीठ जास्त घट्ट झाले असेल तर त्यात थोडेसे पाणी घालावे. इडली पात्रात थोडे तेल लावून त्यात इडलीचे पीठ घालून १०-१२ मिनिट मोठ्या विस्तवावर इडली वाफवून घ्यावी. इडली झाल्यावर इडली पात्रातून इडली हळुवारपणे काढावी. आणि सर्व्ह करावी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स