घरात ताजे मटार असले की कशातही घालून भाजी स्पेशल होते. मटारामुळे भाजी देखणी तर होतेच पण चविष्टही होते. खावीशी वाटते. न आवडत्या भाजीत मटार टाकलेले असल्यास ती भाजी आवडीने खाल्ली जाते. ताज्या मटारच्या या सिझनमधे मटारच्या विविध पाककृती केल्या जातात. पण एक चटपटीत पाककृती मात्र करायची राहून जाते. कारण ती माहितीच नसते.
चटपटीत स्वरुपात मटार खायचे असल्यास मटार रायता करावा.मटार रायता हा सकाळच्या जेवणात किवा रात्रीच्या जेवणात कधी केला तरी चालतो. उलट जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी अधून मधून मटार रायता करायलाच हवा.
Image: Google
कसा करणार मटार रायता?
मटार रायता करण्यासाठी दोन कप दही, 1 कप उकडलेले मटार, पाव चमचा जिरे भाजून त्याची तयार केलेली पूड, पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा लाल तिखट, थोडा चाट मसाला आणि चवीप्रमाणे साधं मीठ घ्यावं. मटार रायता तयार करताना आधी कपभर मटार पाण्यात उकळून मऊ करुन घ्यावेत.
एका भांड्यात 2 कप दही घ्यावं. ते चांगलं फेटावं. मग उकडलेले मटार ओबडधोबड ठेचून् घ्यावेत. दह्यात वाटलेले मटार टाकावेत. ते चांगले मिसळून घ्यावेत. नंतर यात साधं मीठ, काळं मीठ, चाट मसाला, तिखट, जिरे पूड घालावी. सर्व जिन्नस छान एकत्र करावं .
Image: Google
मटार रायता आणखी चविष्ट करायचा असल्यास रायत्याला फोडणी द्यावी. यासाठी छोट्या कढईत थोडं तेल घ्यावं. ते गरम झालं की मोहरी घालावी. ती तडतडली की थोडे जिरे घालावेत. चिमूटभर हिंग, एखादी चिरलेली हिरवी मिरची आणि थोडा कढीपत्ता घालावा. ही चुरचुरीत फोडणी तयार मटार रायत्यावर घालून रायता चांगला फेटून घ्यावा. मसाले भात, साधा भात, खिचडी किंवा पराठे, दशम्या यासोबत छान लागतो.