नाश्त्याला आपण कधी मऊ भात केला की त्यावर तूप तर घेतोच. मात्र मेतकुटाशिवाय मऊ भात खाण्यात मज्जा येत नाही. मस्त खमंग असे मेतकूट भुरभुरल्यावर भाताला चव मस्तच येते. (See the traditional recipe for making authentic Marathi flavoured Metkoot)तसेच तेलात मेतकूट मिक्स करुन चपाती- भाकरीशी लाऊन खाता येते. दह्यामध्ये कालवून चटणीही करता येते. चवीला फारच छान लागते. मेतकूट घरी करणे अगदीच सोपे आहे. तसेच मेतकूट फार पौष्टिकही असते. पाहा मेतकुटाची पारंपारिक रेसिपी. (See the traditional recipe for making authentic Marathi flavoured Metkoot) मऊभातावर मेतकूट तर हवेच, पाहा अस्सल पारंपारिक मेतकूटाची रेसिपी.. अगदी खमंग व स्वादिष्ट तसेच पौष्टिकही.
साहित्य
चणा डाळ, तांदूळ, उडदाची डाळ, मूग डाळ, गहू, मेथीचे दाणे, मोहरी, जिरे, धणे, मीठ, हळद, काश्मीरी लाल मिरची
प्रमाण
सर्व डाळी एक वाटी या प्रमाणात घ्या. तांदूळ अर्धी वाटी घ्या. गहू तीन-चार चमचे घ्या. मसाले समान प्रमाणात घ्या. तीन ते चार चमचे प्रत्येकी घ्या. मोहरी जरा कमी घ्या.
कृती
१. एका कढईमध्ये चणा डाळ घ्या. छान रंग गडद होईपर्यंत परता. सुकीच परतायची. नंतर डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्या. त्याच कढईमध्ये उडदाची डाळ घ्या. पांढरी डाळ छान लाल होईपर्यंत परता. मूग डाळही अशीच वेगळी परतून घ्या. नंतर गहू छान कुरकुरीत होतील असे परता. तांदूळही वेगळेच परतून घ्यायचे. प्रत्येक पदार्थाला व्यवस्थित परतण्यासाठी लागणारा कालावधी वेगळा आहे त्यामुळे वेगळे परता. असे केल्याने सगळ्या डाळी छान परतल्या जातील.
२.शेवटी कढईमध्ये मेथीचे दाणे घ्या. त्यामध्ये मोहरी घाला तसेच धणे घाला जिरेही घाला. सगळं छान परतून घ्या. त्यामध्ये काश्मीरी लाल मिरचीही घ्या. मिरची मस्त कुरकुरीत होईल. मसाल्यांचा खमंग वास पसरेल काही मिनिटांनी गॅस बंद करा आणि मिश्रण गार करत ठेवा.
३. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये परतलेल्या सगळ्या डाळी मिक्स करा. त्यामध्ये परतलेले मसाले घाला. तसेच चवीपुरते मीठ घाला. रंगासाठी हळद घाला. काही जणं लाल तिखटही वापरतात. तुम्हाला मिरची वापरायची नसेल तर लाल तिखटही वापरू शकता. सगळं मिश्रण अगदी मस्त बारीक पूड होईपर्यंत परतून घ्या. सगळं छान एकजीव झाल्यावर मग एका हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा.
४. मेतकूट करताना त्याला पाण्याचा थेंबही लागणार नाही याची काळजी घ्या. नाही तर ते टिकणार नाही. तसेच खमंगही होणार नाही. परतताना तेलाचा किंवा तुपाचा वापरही करायचा नाही. सगळे सुकेच वाटून घ्यायचे.