Join us  

हिवाळा स्पेशल : तोंडी लावायला ताटात हवीच तीळाची चटणी; हाडांची ताकद वाढवणारी पारंपरिक रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2022 5:31 PM

Sesame seed Chutney Recipe and Benefits : शरीराला आवश्यक ते घटक मिळतात आणि जेवणाची चवही वाढण्यास मदत होते.

ठळक मुद्देथंडीच्या दिवसांत आरोग्य उत्तम राहावे यासाठी आहारात अवश्य बदल करायला हवेत.जेवण रुचकर बनवणारी तीळाची पारंपरिक चटणी नक्की ट्राय करा

आपल्याला सगळ्यांनाच रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तोंडी लावायला चविष्ट काहीतरी ताटात असेल तर जेवण छान होतं. यासाठीच महाराष्ट्रीयन जेवणात डाव्या बाजूला विशेष महत्त्व आहे. चटणी किंवा लोणचं, कोशिंबीर या गोष्टी आपल्या जेवणात आवर्जून असतात. यामुळे शरीराला आवश्यक ते घटक मिळतात आणि जेवणाची चवही वाढण्यास मदत होते. आपल्याकडे लोणच्याचे बरेच प्रकार केले जातात. थंडीच्या दिवसांत तर आवळ्याचे, मिक्स भाज्यांचे, ओल्या हळदीचे लोणचे आवर्जून केले जाते. चटणीमध्येही आपल्याला साधारणपणे दाण्याची, जवसाची किंवा खोबऱ्याची माहिती असते. पण थंडीच्या दिवसांत आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेली तीळाची चटणी आपल्याला माहित असेलच असे नाही. पाहूयात तीळाची चटणी कशी करायची आणि ती खाण्याचे फायदे (Sesame seed Chutney Recipe and Benefits)..

साहित्य - 

१. तीळ - १ वाटी 

२. दाणे किंवा सुके खोबरे - अर्धी वाटी 

३. लसूण - १० ते १२ पाकळ्या 

४. मीठ - चवीनुसार 

(Image : Google)

५. जीरं - अर्धा चमचा 

६. लाल तिखट - अर्धा ते १ चमचा 

७. तेल - अर्धा चमचा 

कृती - 

१. तीळ एका कढईमध्ये मंद आचेवर हलके भाजून घ्यायचे. 

२. त्याच कढईत दाणे किंवा सुके खोबरे खरपूस भाजून घ्यायचे.

३. हे दोन्ही मिक्सरच्या भांड्यात घालून त्यामध्ये जीरे, लसणाच्या पाकळ्या, तिखट आणि मीठ घालून मिक्सर फिरवायचा. 

४. एकदा झाकण उघडून सगळे एकसारखे करुन त्यात अर्धा चमचा तेल घालून पुन्हा एकदा मिक्सर फिरवायचा. 

५. तीळ लसणाची ताजी ताजी चटणी गरम भाकरी, फुलके, पोळी अगदी आमटी-भातासोबतही मस्त लागते.  

(Image : Google)

फायदे -

१. तीळात असणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे घटक हाडांसाठी अतिशय फायदेशीर असतात.

२. तीळात फायबर आणि अँटीऑक्सिडंटस जास्त प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठीही त्याचा चांगला उपयोग होतो.

३. तीळ उष्ण असल्याने थंडीच्या दिवसांत शरीरातील उष्णता आणि ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी तीळाचा फायदा होतो. 

४. तीळांमध्ये असणारी स्निग्धता त्वचा आणि केसांचा कोरडेपणा कमी करण्यास उपयुक्त ठरते. 

५. दात स्वच्छ आणि मजबूत होण्यास तीळ खाण्याचा फायदा होतो. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.