शेगाव नाव उच्चारताच आधी आठवतात ते गजानन महाराज आणि नंतर आठवते ती तिथे मिळणारी सुप्रसिद्ध कचोरी. तिथे गेल्यावर लोक दर्शन घेऊन झाल्यावर कचोरीचा फडशा पाडतात. ही कचोरी आठवडाभर टिकते त्यामुळे शेजारी पाजारी आणि मित्रमंडळींसाठीही घेऊन येतात. आता अनेक ठिकाणी गजानन महाराज कचोरी सेंटरचे फलक आढळतात आणि तिथे शेगावरची प्रसिद्ध कचोरी मिळत असल्याचे बोर्ड वाचायला मिळतात. तीच कचोरी तुम्हाला घरी बनवता आली तर? अर्ध्या तासाच्या आत चहा बरोबर खायला खमंग कचोरी तयार! ती बनवण्याची सोपी रीत जाणून घेऊ.
साहित्य :
एक कप मैदा, अर्धा कप बेसन, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा आमचूर पावडर, एक चमचा गरम मसाला, एक चमचा कसुरी मेथी, एक चमचा मोहरी, दोन चमचे जिरे, तीन हिरव्या मिरच्या, आठ लसूण पाकळ्या, एक इंच आल्याचा तुकडा, तळण्यासाठी तेल, एक चमचा धने, एक चमचा बडीशेप
चवीप्रमाणे मीठ, आवश्यकतेनुसार पाणी
कृती :
- सर्वात आधी एका परातीत मैदा घ्या आणि त्यात तेल आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व व्यवस्थित मिसळून घ्या.
- पिठाचा जर मुटका बनत असेल तर पिठाला पुरेस तेल आहे असे समजा.
- मैद्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याचा गोळा बनवून घ्या. तयार गोळा १५-२० मिनिट बाजूला झाकून ठेवा. पीठ मुरेल आणि गोळा मऊ होईल.
- कचोरीच्या स्टफिंग साठी एक पॅनमध्ये धने,जिरे आणि बडीशेप छान भाजून घ्या. नंतर तिची मिक्सरमध्ये पूड बनवून घ्या.
- पूड वाटीत काढून घ्या आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरचीचे काप, लसूण पाकळ्या आणि आल्याचे काप घाला आणि त्याची पेस्ट बनवून घ्या.
- पॅन मध्ये दोन चमचे तेल घाला. तेल गरम झाले की त्यात मोहरी, जिरे घाला आणि छान तडतडू द्या. खमंग फोडणी झाली की त्यात आल,लसूण, मिरचीची पेस्ट घाला आणि तेलामध्ये परतून घ्या.
- नंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला,आमचूर पावडर आणि कसुरी मेथी घाला आणि सर्व मसाले तेला मध्ये परतून घ्या.
- मसाले छान परतून झाले की त्यात बेसन घाला आणि बेसन छान भाजेपर्यंत कमी आचेवर परतून घ्या. बेसनाचा छान सुगंध यायला लागला की समजायचं की बेसन छान भाजले गेले आहे. आता त्यावर थोडा पाण्याचा हपका मारा.बेसन छान ओलसर होईल एवढं पाणी घाला.
- चवीप्रमाणे मीठ घाला आणि बेसन २-३ मिनिट झाकण ठेवून कमी गॅसवर शिजवून घ्या. कचोरीचे तयार स्टफिंग गार करून घ्या.
- पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या.गोळ्याची हातानेच खोलगट पुरी बनवून घ्या. ही पुरी मध्ये जाड आणि त्याचे काठ पातळ करा.आता त्यात तयार स्टफिंग घाला आणि स्टफिंग व्यवस्थित आतमध्ये दाबून घ्या आणि कडा एकत्र करून वरचा जो पिठाचा भाग येतो तो तिथेच दाबून त्याला गोल गोल फिरवून घ्या.
- आता पोळपाट वर ठेवून हा गोळा हलक्या हाताने लाटून घ्या.आणि अश्याप्रकारे सर्व कचोऱ्या तयार करून घ्या.
- कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाले की त्यात एक एक कचोरी घालून तिला मध्यम आचेवर छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.अश्याप्रकरे सर्व कचोऱ्या तळून घ्या.
शेगाव स्पेशल कचोरी खायला तयार! गरमागरम सर्व्ह करा. या कचोरीसोबत ओल्या, सुक्या चटणीची गरज लागत नाही. तोंडी लावायला मीठ चोळून तळून घेतलेली मिरची असेल तर बेत जमलाच म्हणून समजा.