प्रतिभा जामदार
शेवगा सुपरफूड आहे अशी हल्ली सतत चर्चा होते. शेवगा शेंगा आहारात असाव्यात असं वारंवार सांगितलं जातं. शेवग्याची पावडरही काहीजण खाऊ लागले आहे. मात्र शेवग्याच्या पानांची पारंपरिक पौष्टिक भाजी मात्र मागे पडते आहे. ही भाजी म्हणजे कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. कोकणात घरोघरी हे शेवग्याचे झाड असते. कोणत्याही भाकरी बरोबर ही भाजी उत्तम लागते. आणि पौष्टिकही.
शेवग्याच्या पानांची भाजी कशी करायची?
साहित्य- 1 मोठी जुडी शेवग्याची पाने, 4 मोठे कांदे, 1 वाटी उकडलेले काळे वाटणे ( ऐच्छिक), तेल, हळद, मीठ, हिरव्या मिरच्या, ओले खोबरे, 2 चमचे खोबरेल तेल.
कृती- प्रथम देठापासून पाने वेगळी करून घ्यावीत, न धुताच भाजी बारीक चिरावी. चिरून झाल्यावर धुवून निथळत ठेवावी.
कांदे चिरून घ्यावेत. कढईमध्ये पुरेसे तेल घेऊन त्यावर मिरच्यांचे तुकडे परतावे. चिरलेला कांदा परतावा. भाजीला लागेल इतके मीठ कांद्यावर घालावे म्हणजे कांदा लवकर शिजतो. कांदा पारदर्शी झाला की त्यावर हळद आणि चिरून निथळत ठेवलेली भाजी घालून परतावे. भाजी शिजली की आधीच उकडून ठेवलेले काळे वाटणे आणि ओले खोबरे घालून भाजी मिक्स करावी. सगळ्यात शेवटी वरून 2 चमचे खोबरेल तेल घालून भाजी परत एकदा परतून घ्यावी. भाजी तयार.
चवीला अतिशय उत्कृष्ट आणि पौष्टिकही भाजी करायलाही सोपी आहे.