Join us  

गहू बंदच करा असे व्हाट्सपिय सल्ले ऐकावे का? गव्हाची पोळी खावी की टाळावी? खरं काय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 11:00 AM

गव्हातील पोषणमूल्यांबद्दल आहारतज्ज्ञ काय म्हणतात हे समजून घेऊया...

ठळक मुद्देगव्हामुळे कॅलरीज वाढतात त्यामुळे ज्वारी किंवा बाजरीची, नाचणीची भाकरी खा असे वारंवार आपल्या कानावर येते, यात तथ्य काय? गव्हातील पोषणमूल्ये आणि त्याचे फायदे समजून घ्यायला हवेत...

महाराष्ट्रातील बहुतांश भागातील मुख्य अन्न हे पोळी-भाजी आहे. आता रोज किमान दोन वेळा पोळी भाजी खात असल्याने गहू हा आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये पोळी, फुलका, पुऱ्या, वेगवेगळ्या प्रकारचे पराठे असे प्रकार केले तरी प्रामुख्याने गव्हाचा वापर केला जातो. हल्ली गव्हापेक्षा किंवा पोळीपेक्षा भाकरी खाल्लेली चांगली, गहू पचायला जड असतो, गव्हामुळे कॅलरीज वाढतात त्यामुळे ज्वारी किंवा बाजरीची, नाचणीची भाकरी खा असे वारंवार आपल्या कानावर येते. आता यामध्ये खरंच किती तथ्य आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. गहू आरोग्याला किती फायदेशीर असतो, नियमित गहू खाल्ल्याने आरोग्यावर त्याचे काही विपरीत परीणाम होतात का यांसारखे प्रश्न आपल्याला पडतात. सध्या आपल्या सगळ्यांच्याच हातात सतत मोबाइल नावाचे उपकरण असते, सोशल मीडियावर सतत येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीमुळे नक्की काय बरोबर आणि काय चूक हे आपल्याला अनेकदा समजत नाही. त्यामुळे गव्हाची पोळी खावी की नाही याबाबत आहारतज्ज्ञ सुचेता लिमये यांनी आपल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे आपल्या काही शंकांचे निरसन होण्यास निश्चितच मदत होईल. 

(Image : Google)

गहू कोणत्या स्वरुपात खावा? 

गव्हाचे पीठ हा आपल्या आहारातील मुख्य पदार्थ आहे. गव्हाचे पीठ किंवा गव्हाचा दलिया या स्वरुपात गहू खाल्ल्यास त्यातील सगळे फायदे आपल्याला मिळतात. मात्र गव्हापासून तयार होणाऱ्या मैद्यातून शरीराला केवळ ऊर्जा मिळते. गव्हातील इतर फायदे मैद्यामुळे मिळत नसल्याने शरीरासाठी तो अजिबात चांगला नसतो. सतत मैद्याचे पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींमध्ये कालांतराने चरबी वाढणे, वजन वाढणे, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे, हृदयरोग, मधुमेह, हाडांचे त्रास अशा समस्या दिसून येतात. 

गहू पचायला खरंच जड असतो का?

गव्हामध्ये ग्लुटेन नावाचा एक घटक असतो. पोटाचे विकार असणाऱ्यांमध्ये हे ग्लुटेन पचवण्याची क्षमता काही वेळा कमी असते. अशावेळी त्यांना गव्हाची पोळी किंवा अन्य पदार्थ खाल्ल्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते.  अशावेळी गव्हाचे पदार्थ खाणे टाळावे, त्यामुळे पोटाला आराम मिळण्यास मदत होऊ शकते. नियमित गहू खाण्यापेक्षा आपण राहतो त्याठिकाणी जे धान्य प्रामुख्याने पिकते त्याचा वापर आहारात आवर्जून करायला हवा. मराठवाड्यामध्ये ज्वारी, बाजरीचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते, त्या लोकांनी या धान्याचा आहारात वापर करायला हवा. तर कोकण भागात तांदूळ जास्त पिकत असल्याने त्यांनी तांदळाच्या भाकरीचा आहारात समावेश करायला हवा. 

गव्हातून मिळणारे पोषण आरोग्यासाठी किती फायदेशीर?  

गव्हात कार्बोदकांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. याबरोबरच गव्हामध्ये तंतूमय पदार्थ, खनिजे, अँटीऑक्सिडंटस, जीवनसत्त्वांचे प्रमाणही पुरेसे असते, त्यामुळे गहू आरोग्यासाठी चांगला असला तरी तो प्रमाणात खायला हवा. त्यासोबत इतर धान्यांचाही आहारात आवर्जून समावेश करायला हवा. गव्हातील फायबरमुळे अपचन, बद्धकोष्ठता यांसारखे त्रास दूर होण्यास मदत होते. गव्हामध्ये व्हिटॅमिन बी ९ म्हणजेच फॉलेटचे प्रमाण जास्त असते. रक्तातील लाल रक्तपेशींच्या वाढीसाठी त्याचा चांगला उपयोग होतो. 

(Image : Google)

पोळीऐवजी भाकरी खा, यामध्ये तथ्य काय? 

पोळीसाठी कणिक मळताना आपण त्यात तेल घालतो. प्रामुख्याने आपल्याकडे घडीच्या पोळ्या केल्या जातात. त्यामुळे घडी घालतानाही थोडे तेल लावतो आणि पोळी होत आली की तव्यावर किंवा खाली काढल्यावर पुन्हा तेलाची बोटे लावतो. त्यामुळे पोळीला तेल जास्त प्रमाणात वापरले जात असल्याने पोळीपेक्षा भाकरी बरी असे म्हटले जाते. लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आरोग्याच्या समस्या असणाऱ्यांना एका जेवणात तरी भाकरी खा असा सल्ला डॉक्टर किंवा आहारतजज्ञ देतात. मात्र पोळीपेक्षा भाकरीचा आकार जास्त मोठा असल्याने किंवा भाकरीसाठी जास्त पीठ वापरलेले असल्याने त्याचा म्हणावा तसा फायदा होत नाही. तेव्हा तुम्ही भाकरी खाणार असाल तर ती पोळी इतकी पातळ आणि लहान आकाराची असायला हवी. 

टॅग्स :अन्नआहार योजनाहेल्थ टिप्स