Lokmat Sakhi >Food > श्रावणी सोमवारचे उपवास करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, साबुदाण्याला पर्याय काय?

श्रावणी सोमवारचे उपवास करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, साबुदाण्याला पर्याय काय?

Shravan Somvar Upwas Fasting Diet Tips : उपवास करताना आहाराबाबत नेमकी कोणती कळजी घ्यायची याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2022 11:26 AM2022-07-29T11:26:46+5:302022-07-29T12:37:54+5:30

Shravan Somvar Upwas Fasting Diet Tips : उपवास करताना आहाराबाबत नेमकी कोणती कळजी घ्यायची याविषयी...

Shravan Somvar Upwas Fasting Diet Tips : Remember 5 things while fasting on Shravani Monday, pitta and other dukhanis will stay away | श्रावणी सोमवारचे उपवास करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, साबुदाण्याला पर्याय काय?

श्रावणी सोमवारचे उपवास करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, साबुदाण्याला पर्याय काय?

Highlights शहाळे, सरबत, ताक या गोष्टींचे सेवन केल्यास ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरु शकते. संत्री, मोसंबी, पेर, सफरचंद, डाळींब अशी ताजी फळे योग्य त्या प्रमाणात खायला हरकत नाही. 

श्रावण महिना आला की ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो आणि सणावारांची चाहूल लागते. श्रावण महिना पवित्रा मानला जात असल्याने या महिन्यात सोमवार, शुक्रवार असे बरेच उपवास आवर्जून केले जातात. विशेषत: महिला वर्गात हे उपवास करण्याची पद्धत जास्त असते. यामागे धार्मिक भावना असल्या तरी आताच्या धकाधकीच्या जीवनात उपवास करताना आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम होणार नाही ना याची खबरदारी प्रत्येकीने घ्यायला हवी. घर, स्वयंपाक, मुलं, प्रवास, ऑफीस, इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या, सणवार हे सगळे करताना आपल्या शरीराचे योग्य पद्धतीने पोषण होत असेल तरच आपली तब्येत चांगली राहू शकते. अशावेळी उपवास करताना आहाराबाबत नेमकी कोणती कळजी घ्यायची याविषयी (Shravan Somvar Upwas Fasting Diet Tips)...

(Image : Google)
(Image : Google)

१. वरई चालत नाही मग पर्याय काय?  

वरई किंवा भगर पचायला हलकी असते, त्यामुळे आपण एरवी उपवासाला भगर खातो. मात्र श्रावणी सोमवारला भगर चालत नाही असा काही लोकांचा समज असतो. अशावेळी राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ यांसारख्या पीठांचे थालिपीठ, वडे असे करु शकतो. त्यामुळे वरईला पर्याय असलेल्या या घटकांचा उपवासाच्या दिवशी आहारात जरुर समावेश करावा. 

२. साबुदाणा खाताना...

साबुदाणा हा आवडीचा आणि पोटभरीचा असला तरी साबुदाण्यातून शरीराला विशेष पोषण मिळत नाही. त्यामुळे साबुदाणा खाताना तो योग्य प्रमाणातच खायला हवा, शक्यतो टाळला तर जास्त चांगले. खिचडी करताना त्यामध्ये बटाटा घालावा, म्हणजे साबुदाणा कमी खाल्ला जातो. तसेच त्यासोबत काकडी, दही घ्यावे म्हणजे पोषण मिळते.

३. या गोष्टी जरुर खा...

उपवासाच्या दिवशी शरीरातील ताकद टिकून राहावी यासाठी खजूर, राजगिरा वडी, सुकामेवा, दाण्याचे लाडू किंवा चिक्की अशा गोड पदार्थांचा योग्य त्या प्रमाणात आहारात आवर्जून समावेश ठेवावा. यामुळे पटकन एनर्जी मिळायला मदत होते आणि हे सगळे पौष्टीक असल्याने आरोग्याला त्याचा काही त्रास होत नाही. 

(Image : Google)
(Image : Google)

४. फळे खाताना लक्षात ठेवा...

फळं ही आरोग्यासाठी केव्हाही चांगली असं म्हणत असताना पावसाच्या काळात आपला अग्नी मंद झालेला असतो. त्यामुळे खूप दिवस ठेवलेली, जास्त पिकलेली फळे खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. तसेच बराच वेळ चिरुन ठेवलेली फळे खाणेही चांगले नाही. या काळात संत्री, मोसंबी, पेर, सफरचंद, डाळींब अशी ताजी फळे योग्य त्या प्रमाणात खायला हरकत नाही. 

५. चहा-कॉफीला पर्याय काय

आपल्याकडे एरवीही चहा-कॉफी घेण्याचे प्रमाण जास्त असते. उपवासाच्या दिवशी एनर्जी वाटावी यासाठी चहा किंवा कॉफी घेण्याचे प्रमाण वाढू शकते. मात्र जास्त प्रमाणात चहा-कॉफी घेतल्यास अॅसिडीटी होण्याची शक्यता असते. अशावेळी गरम दूध घेणे हा पर्याय असू शकतो. तसेच शहाळे, सरबत, ताक या गोष्टींचे सेवन केल्यास ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरु शकते. 

Web Title: Shravan Somvar Upwas Fasting Diet Tips : Remember 5 things while fasting on Shravani Monday, pitta and other dukhanis will stay away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.