श्रावणात उपवास भरपूर. त्यात श्रावणी सोमवार खास. या उपासाला नाश्ता करतोच आपण असं नाही, पण दुपारी एकदम फराळ केला की ॲसिडीटी होते. त्यामुळे सकाळी झटपट होईल आणि पचायला हलका असा पदार्थ करा. त्यासाठीच हा उपवास ढोकळा. करायला अगदी सोपा. घरात साहित्य असतंच काही धावपळही होत नाही.
कसा करायचा उपवास ढोकळा?
आपल्याला अगदी कमी साहित्य हवं. साबुदाणा पीठ,भगर(वरई)पीठ, राजगिरा पीठ, यापैकी जे पीठ तुमच्याकडे असेल ते घ्या. तिन्ही असतील तर मिक्स करा. भरपूर पोषण, पौष्टिक हवं तर फक्त राजगीरा पीठ घेतलं तरी चालेल. राजगीरा हे सुपरफूड आहेच. पचायला हलका आणि पोषण भरपूर.
आणि बाकी मिरची,तुप,जीरे,दही,पाणी, तुम्हाला चालत असेल उपवासाला तर कोथिंबिर आणि आलं घेतलं तरी चालेल.
फक्त एक महत्त्वाचं या ढोकळ्यात इनो किंवा खायचा सोडा घालावा लागतो.
काहीजण ते उपासाला खात नाही. त्यामुळे त्यांचा ढोकळा फार फुलणार नाही, पातोड्यांसारखा लागेल. पण तरीही चविला अगदी मस्त.
आता करा झटपट ढोकळा..
दोन वाटी पीठ घ्या. चार-पाच चमचे दही घालून, थोडं पाणी घालून पंधरा वीस मिनिटे भिजवून ठेवायचं. मग त्यात आले, जिरे, मिरची वाटण घालायचं. चांगलं फेटून मग एक चमचा इनो किंवा खायचा सोडा घालायचा. त्यानंतर नेहमीप्रमाणे डब्यात घालून १५ ते २० मिनिटे वाफ आणायची. थोडं गार झाल्यावर तुप जीरे मिरची घालुन फोडणी करायची. खवलेले नारळ भुरभुरावे.
हा ढोकला पचायला हलका होतो. पोटभरीचा आणि चविष्ट होतो.
(Image : google)
आता इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर एक युक्ती. तयार मिश्रण खूप वेळ फेटा. अगदी चमच्याला हलकं लागेतो. आणि मग ढोकळा उकडायला ठेवा.
ढोकळा अगदीच स्पाँजी होणार नाही, पण छान हलका होईल. याच पिठाच्या तुम्ही छोट्या इडल्या करुन दहीच-चटणी सोबत खाऊ शकता.
किंवा तयार छोट्या इडल्या तूपावर परतून उपवासाची मसाला इडलीही करु शकता.
मस्त चवीने खा..