Join us  

श्रावणी शुक्रवारसाठी गोडाचे ३ झटपट पदार्थ, नैवेद्यासाठी खास आणि करायलाही सोपे, शुक्रवार होईल साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 10:45 AM

Shravni Shukrwar Jivti Pujan Shravan Special Sweet easy to make Recipes : झटपट होणारे आणि तरीही सगळ्यांना आवडतील असे गोडाचे पदार्थ कसे करायचे पाहूया..

श्रावणी शुक्रवार म्हणजे जिवतीची पूजा-नैवेद्य आणि शुक्रवारचे सवाष्ण जेवण. श्रावणातल्या शुक्रवारला विशेष महत्त्व असून या दिवशी आवरर्जून पुरणावरणाचा नैवेद्य केला जातो. पुरणाची पोळी, कटाची आमटी, कुरडई, भजी, बटाट्याची भाजी, काकडीची कोशिंबीर, खोबऱ्याची ओली चटणी आणि वरण भात असा सगळा साग्रसंगीत स्वयंपाक घरोघरी होतो. जिवतीला नैवेद्य दाखवून सवाष्णीला आणि कुमारीकांना जेवायला बोलावले जाते. आपण घरात असू तर हे सगळे ठिक आहे पण पूजा करुन आपल्याला ऑफीसला जायचे असेल तर पुरणा-वरणाचा स्वयंपाक करणे शक्य नसते. अशावेळी झटपट करता येतील असे गोडाचे ३ सोपे पदार्थ आज आपण पाहणार आहोत. नैवेद्यापुरते थोडेसे पुरण करुन जेवायला वेगळा गोड पदार्थ करु शकतो. आता झटपट होणारे आणि तरीही सगळ्यांना आवडतील असे गोडाचे पदार्थ कोणते ते पाहूया (Shravni Shukrwar Jivti Pujan Shravan Special Sweet easy to make Recipes)..

१. दलिया 

दलिया करायला अगदी सोपा आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ. कुकरमध्ये दलिया शिजवून घ्यायचा आणि कढईमध्ये तूप घालून त्यात दलिया, गूळ, वेलची पूड आणि थोडं पाणी घालून तो पुन्हा एकजीव होईपर्यंत शिजवायचा. शिजत आला की त्यामध्ये आवडीप्रमाणे सुकामेवा, केशर आणि दूध घालायचे आणि वाटीत गरमागरम दलिया द्यायचा. पोटभरीचा असल्याने आणि चविष्ट असल्याने सगळेच आवडीने हा दलिया खातात.

(Image : Google)

२. तांदळाची खीर

करायला अतिशय सोपी, पचायला हलकी आणि लहानांपासूमन मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी ही खीर. आधी तांदूळ कढईत चांगले परतून घ्यायचे. गार झाल्यावर मिक्सरमधून ओबडधोबड वाटून घ्यायचे. तूपावर तांदूळ पसरायचे आणि त्यात थोडे पाणी घालून शिजवायचे. नंतर आवडीनुसार साखर किंवा गूळ घालायचा. याचवेळी ओल्या नारळाचा चव, वेलची पूड घालायची आणि दूध घालून खीर पुन्हा चांगली शिजवायची.

(Image : Google)

३. मूगाचा हलवा

हा एक पारंपरिक आणि अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून होणारा पदार्थ आहे. मूग कढईमध्ये परतायचे आणि त्याचा मिक्सरमध्ये भरडा काढून घ्यायचा. मग तूपावर हा भरडा घालून चांगला भाजून घ्यायचा. त्यानंतर यात साखर आणि थोडेसे दूध घालून हे सगळे चांगले एकजीव करायचे. आवडीनुसार यामध्ये सुकामेवा, केशर घालायचे आणि बारीक आचेवर चांगले शिजू द्यायचे. या हलव्याला तूप नेहमीपेक्षा थोडे जास्त लागते. मात्र मूग पचायला हलके असल्याने आणि आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने शुक्रवारच्या निमित्ताने आपण हा हलवा नक्कीच करु शकतो.  

(Image : Google)

टॅग्स :अन्नपाककृतीश्रावण स्पेशल