Join us  

महाराष्ट्रात टॉपचं पक्वान्नं म्हणजे श्रीखंड! ते आलं कुठून, श्रीखंडाला हा मान मिळाला कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 1:49 PM

श्रीखंड सगळ्यांनाच आवडतं पण दही-चक्का ते स्वादिष्ट श्रीखंड हा प्रवास झाला कसा?

मेघना सामंत

सणासुदीची पंगत, रांगोळ्यांची रंगत, उदबत्त्यांचा थाट आणि विविध पदार्थांनी सजलेलं ताट, त्यात टम्म फुगलेल्यापुऱ्यांसोबत गोजिऱ्या रूपाचं मुलायम श्रीखंड ! आहाहा... पाहताक्षणीच तोंडाला पाणी सुटावं ! श्रीखंड हे महाराष्ट्राच्या टॉप टेन पक्वान्नांपैकी पहिल्या नंबरचं. पण ते आलं कुठून आणि त्याला हा मान मिळाला कसा?इतिहासाचा धांडोळा घेतला तर, श्रीखंडाचा उगम भारतातलाच, पाचेक हजार वर्षांपूर्वीचा. वैदिक काळात माणूसएका जागी स्थिरावला तो गोपालनाच्या आधारावर. तेव्हापासूनच शिखरिणी या नावाचं पक्वान्न भारतवर्षात प्रचलित आहे. अगदी सुरुवातीच्या काळात, फेटलेलं दही आणि गोडव्याकरिता घातलेले आंबे, केळं यासारख्या फळांचे तुकडे असं शिखरिणीचं स्वरूप होतं. म्हणजे आपण आज ज्याला फ्रूट योगर्ट म्हणतो ना, ते हेच. यातून पुढे शिकरण, ऊर्फ इन्स्टन्ट शिखरिणी जन्माला आली. केळ्याच्या चकत्या दुधात घालून, जराशी साखर घातली की पोळीसोबत खायला तयार.शिकरणीने फ्रूट सॅलडची ओळख पाश्चिमात्य देशांना करून दिली खरी पण एकंदरीत ही बहीण गरीब घरात पडली असंच म्हणावं लागेल.

दुसरीकडे दह्याच्या शिखरिणीने मात्र राजेशाही थाट प्राप्त केला. दूध सुरेख विरजून, त्या दह्याचा चक्का बनवून, पुन्हा साखरेसोबत वस्त्रगाळ करून, केशर वेलदोड्यांचा स्वाद स्वतःत सामावून घेत, बदाम चारोळ्यांसह सजून ती पेशवाईतल्या मेजवान्यांत मिरवली. याच काळात शिखरिणी या शब्दाचा उच्चार अपभ्रंश होत होत श्रीखंड असा झाला.नव्याने घडवलेला शब्द असूनही संस्कृत भाषेत किती चपखल बसतो तो !पहिलंच अक्षर ‘श्री’ असल्याने असेल, किंवा दह्याच्या शीतलतेमुळेही असेल, सगळ्या शुभकार्यात श्रीखंडाला अग्रमान मिळायला लागला. दसरा आणि गुढीपाडव्याची कल्पना आपण श्रीखंडपुरीशिवाय करू शकू का?श्रीखंडासाठी मलमलच्या कापडात दही बांधून रात्रभर टांगून त्यातलं पाणी काढून टाकतात. तयार घट्ट दह्याला चक्का म्हणतात (म्हणजेच युरोपीय देशांतलं hung curds). चक्का हे नाव आपण खास मराठी समजतो, मात्र ते आलं आहे (पूर्वीच्या रशियन संघराज्यातल्या) ताजिकिस्तानमधून. जुन्या जमान्यात माणसं किंवा भटके समुदाय प्रवासाला निघाले की पातळ कापडात दही बांधून घेत, पुढच्या मुक्कामी पोचेपर्यंत त्यातलं पाणी गळून गेलेलं असे आणि प्रवाहीनसलेलं, मऊसूत दही पावासोबत खायला तयार असे. हा ‘चक्का’ अथवा ‘च्याका’.तिथे आजही रोजच्या जेवणातला साधा पदार्थ आहे. आपल्याकडे तो अफगाणिस्तानमार्गे आला आणि आपलाच होऊन बसला. पुढे साखरेची उपलब्धता वाढली तशी त्यात गोडव्यासाठी घातले जाणारे फळांचे तुकडे गायब झाले; आणि सुक्या मेव्याचं प्रमाण वाढलं (हा मुघल राजवटींचा प्रभाव !).

 

अगदी तीसचाळीस वर्षांपूर्वीपर्यंत, घरगुती श्रीखंडात फळांचे तुकडे घातले जात नसत. पण कालचक्र गोल फिरतं. श्रीखंड जेव्हापासून घरी न करता बाहेरून विकत आणलं जाऊ लागलं, तेव्हा दुग्धजन्य पदार्थांच्या काही ब्रॅण्ड्सनी स्वतःची कल्पकता म्हणून आंब्याचे तुकडे घातलेलं श्रीखंड ‘आम्रखंड’ या नावाने प्रसिद्ध केलं, म्हणजे शिखरिणीचं मूळ रूप पुन्हा परतलं !..(तसं दक्षिण भारतात अजूनही बिनसाखरेच्यासाध्या दह्यात केळ्याच्या चकत्या घालून खाण्याची पद्धत आहे म्हणा, पण त्याला कुणी शिखरिणी संबोधत नाही.)आम्रखंडाच्या लोकप्रियतेनंतर इतर प्रयोग होणं स्वाभाविक, त्यामुळे अननस, स्ट्रॉबेरी हेही ‘फ्लेवर’ दाखल झाले.सफरचंद- अक्रोडाच्या तुकड्यांनी नटलेलं श्रीखंडही प्रसिद्ध आहे, राजभोगचे छोटेछोटे तुकडे घातलेलं श्रीखंड, एवढंच नव्हे तर बटरस्कॉच स्वादाचंही श्रीखंड उपलब्ध आहे. सतत बदल हवा असणाऱ्या बाजारपेठेत जेवढी कल्पकता दाखवाल तेवढी कमीच. कुणी सांगावं, ते शिखरिणी या नावाने ‘नव्याने’सुद्धा लाँच होईल! त्याचं माधुर्य तेवढं टिकून राहो ही मनापासूनची इच्छा!

(लेखिका खाद्यस्ंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)