-वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D.(आयुर्वेद)
उपवास म्हटलं की साबुदाणा, भगर,राजगिरा, शेंगदाणे हे आघाडीवर असतात, मग मागोमाग येतात ते बटाटे,रताळी, सुरण,काकडी वगैरे मेंबर्स. पाठोपाठ राजगिरा लाडू, शेंगदाणा लाडू किंवा चिक्की,खजूर, ड्राय फ्रूट्स ,जोडीला विविध ताजी फळं आणि दही,ताक, दूध आवडीनुसार साइड डिश म्हणून येतात ! तरी या यादीत मी दोन मुख्य पदार्थ समाविष्ट केलेले नाहीत ज्यांचा बायका कोणत्याही उपासाला रतीब घालतात ते म्हणजे चहा आणि कॉफी ....
पण काय खावं आणि काय खाऊ नये याचा विचार न करता सलग नऊ दिवस विविध पदार्थ खाल्ले गेले तर मग त्यांचा परिणाम साहजिकच आरोग्यावर होतोच आणि वेगवेगळ्या त्रासांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे ते समजून घेणं आवश्यक आहे.
Image: Google
1. साबुदाणा : हा खरं तर रंग रुप ,स्वतःची काही वेगळी ,विशेष चव नसणारा पदार्थ !पण आपल्या उपासांनी त्याला विशेषत: 'स्पिरिच्युअल व्हॅल्यू' बहाल केली आणि उपास म्हणजे साबुदाणा हे समीकरण रुढ झालं जणू. यातला महत्त्वाचा भाग म्हणजे बेचव साबुदाण्याची खिचडी मात्र चविष्ट लागते आणि सर्वांना आवडते.
खाताना छान वाटलेली खिचडी पोटात गेल्यावर मात्र वेगवेगळे रंग दाखवते.हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट घालून, भरपूर दाण्याचं कूट घालून केलेली ही खिचडी भरपूर पित्त वाढवते.दुसरा त्रासदायक परिणाम म्हणजे पाणी शोषून घेणं हा साबुदाण्याचा गुणधर्म असल्यामुळे आतड्यांमध्ये असणारा ओलावा, पाणी हा शोषून घेतो आणि मग आतडी कोरडी पडतात. मलप्रवृत्ती कडक होते ,लवकर पुढे पुढे सरकत नाही आणि मग मलावष्टंभ निर्माण होतो. गॅसेस होतात,पोट फुगतं, दुखतं ,मळमळ होते.एखाद्या दिवशी खिचडी खाल्ल्यानं लगेच हे परिणाम दिसत नाहीत पण नऊ दिवस उपास म्हणून खिचडी, खीर,वडे असे साबुदाण्याचे वेगवेगळे पदार्थ पाठोपाठ खाण्यात आले तर मात्र निश्चितपणे त्रास जाणवू लागतो.विशेषतः ज्यांना आधीच मलावष्टंभ आहे किंवा मूळव्याध वगैरेचा त्रास आहे त्यांना तर एक दोन दिवसांतच लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे ज्यांना काही त्रास होत नाही किंवा साबुदाणा झेपतो त्यांनीच तो खावा, तोही कमी प्रमाणात....
2. भगर : आयुर्वेदाच्या दृष्टीने भगर हे धान्य रुक्ष गुणाचे व त्यामुळे वातवर्धक आहे ,शरीरात कोरडेपणा वाढवणारं आहे,भगर शिजायला किती मोठ्या प्रमाणात पाणी लागतं हे आपण पाहतोच! त्यामुळे रोज रोज भगर खाणं देखील इष्ट नाही. साजूक तुपात किंवा शेंगदाणा तेलात केलेली भगर खातानासुद्धा भरपूर तूप किंवा ताक घालून खावी म्हणजे त्याचे दुष्परिणाम जाणवत नाहीत.
Image: Google
3. राजगिरा: शक्यतो लाडू किंवा वडी या स्वरुपात मध्ये खाल्ला जातो तो फार तापदायक नाही. ताका बरोबर किंवा दुधाबरोबर खाण्यास हरकत नाही. राजगिरा पचायला हलका असतो व क्षार,खनिज या गुणांमुळे पौष्टिक देखील. त्यामुळे राजगिरा खाण्यास सर्वांना चालतो,फक्त याने पोट भरल्याची संवेदना होत नाही आणि पट्कन परत भूक लागते.
4. उपवासाची भाजणी: साबुदाणा, भगर ,राजगिरा शिंगाडा यांची पिठं एकत्र करून थालीपिठ करता येतं. तसेच साबुदाणा, भगर, राजगिरा, जिरे वेगवेगळे भाजून घ्यावेत. आणि ते आपल्याकडील मिक्सरमधून ते वाटून घ्यावेत. हे थालीपिठही गुणानं चांगलं असलं तरी तेही कोरडं होतं, म्हणून ते तूप किंवा लोणी लावून खावं. त्याच्यासोबत थोडं उपासाचं लिंबाचं लोणचं खाण्यास हरकत नाही.
Image: Google
5. शिंगाडा : पाण्यात तयार होणारा हा एक प्रकारचा पिष्टमय कंद आहे; परंतु आपल्याकडे ताजे फारसे मिळत नाहीत, याच्या पिठाचा शिरा किंवा खीर क्वचित बदल म्हणून छान वाटते आणि हे शिंगाडा पीठ किंवा त्या पिठाचे पदार्थ अपायकारक नाही .
6. उपवासाची इडली: डोसा हल्ली वेगवेगळ्या फूड ब्लॉगर्समुळे उपवासालाही अनेकविध पदार्थांची चलती असते.भगर,साबुदाणा हे मुलभूत घटक वापरून उपवासाची इडली,डोसा, मेदूवडा,आप्पे असे काही काही पदार्थ बनवले जातात पण ते फुगावेत म्हणून बहुतेक वेळा त्यात खायचा सोडा वापरला जातो, दही टाकलं जातं ,त्यामुळे ते पदार्थ चवदार जरी लागले तरी शरीरातील पित्त वाढवतात आणि ऍसिडिटी, डोकेदुखीला कारणीभूत ठरतात.
7. बटाटे: उपवासाच्या खिचडीपासून पॅटिसपर्यंत अनेकविध पदार्थांत अगदी मिळून मिसळून राहणारा बटाटा उपासात आपलं स्थान टिकवून आहे .नुसती भाजी,साबुदाणा वडा, खिचडी, पॅटिस यात चव वाढवण्यासाठी वापर ठरलेला !पण केवळ पिष्टमय असल्यानं वजनासाठी आणि वात वाढवण्यासाठी कारणीभूत....पोटात गुबारा धरणं,गुडगुडणं,क्वचित पोटदुखी हे त्रास होऊ शकतात.
8. रताळी : जमिनीखाली वाढणारा हा कंद आपल्याकडे केवळ उपवासालाच वापरला जातो.मिरची व दाण्याचं कूट घालून खिस किंवा गूळ घालून गोडाच्या चकत्या केल्या जातात. आता तर रताळीच्या अनेक रेसिपी केल्या जातात.
इतके दिवस सलग भरपूर शेंगदाणे, साजूक तूप ,हिरव्या मिरच्या खाणं हे बहुतांश लोकांना पित्त वाढणं,पोट बिघडणं, गॅसेस,ऍसिडिटी, डोकेदुखी, मलावष्टंभ( क्वचित प्रसंगी संडासच्या वेळी रक्त पडणं) ,गरगरणं अशा कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रासदायक ठरतंच त्यामुळे आपलं वय,प्रकृती,इतर आजार यांचा विचार करून इतके उपास करायचे की नाही ते ठरवायला हवं.नाहीतर केवळ प्रथा म्हणून, घरची पद्धत म्हणून केले जाणारे उपवास दहा दिवसांनंतर आजारपण घेऊन येतात.अशक्तपणा, ऍनिमिया,चक्कर येणं ,गळून जाणं या समस्या घेऊन खूप रुग्ण ,विशेषतः स्त्रिया येतात.
फळं, सुका मेवा यांचे उपयोग किंवा परिणाम याबाबत पुढील भागात पाहू !
(लेखिका प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)
rajashree.abhay@gmail.com