ताक म्हणजे उन्हाळ्यातील अमृत. दह्यापासून केलेल्या ताकामध्ये प्रोटीन्सबरोबरच इतरही अनेक घटक असतात हे आपल्याला माहित आहे. उन्हामुळे होणारी लाहीलाही कमी करण्यासाठी किंवा खाल्लेल्या अन्नाचे पचन व्हावे म्हणून आपण सगळेच उन्हाळ्यात ताक पितो. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग कमी होऊन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो. ताकाचे पुदीना ताक, मसाला ताक, मठ्ठा असे विविध प्रकार करता येतात (Side Effects of Buttermilk).
ताकातील विटामिन B 12, कैल्शियम, पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ताकामुळे उष्णता कमी होतेच तसेच लघवीच्या तक्रारी दूर होण्यासही मदत होते. १ ग्लास म्हणजे २५० मिलीग्रॅम ताकात ९८ कॅलरीज, ८ ग्रॅम प्रोटीन, ३ ग्रॅम फायबर, २२ टक्के कॅल्शियम, १६ टक्के सोडियम आणि २२ टक्के व्हिटॅमिन बी १२ असते. असे असले तरी ताक पिण्याचे काही साईड इफेक्टस असतात ते आपल्याला माहित असायला हवेत. काहींना ताकाची अॅलर्जी असते तर ताकात सोडीयम जास्त असल्याने अनेकांना त्याचा त्रास होऊ शकतो. पाहूयात ताकाचे शरीराला असणारे साईड इफेक्टस...
१. रात्री पिणे अयोग्य
ताक आरोग्यासाठी चांगले असले तरी रात्रीच्या वेळी ताक पिणे योग्य नाही. तसेच सर्दी, कफ आणि ज्यांना धुळीच्या कणांची अॅलर्जी असते अशांनी आहारात अजिबात ताकाचा समावेश करायला नको. त्यामुळे अॅलर्जी किंवा ताप, सर्दी वाढण्याची शक्यता असते.
२. लहान मुलांसाठी त्रासदायक
आपण अनेकदा सायीचे ताक करतो. ही साय आपण कित्येक दिवस साठवलेली असते. त्यामुळे त्यात बॅक्टेरीया तयार झालेले असू शकतात. हे बॅक्टेरीया लहान मुलांसाठी घातक ठरु शकतात. या बॅक्टेरीयामुळे मुलांना सर्दी, घशाचे इन्फेक्शन अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे लहान मुलांना असे ताक देताना योग्य ती काळजी घ्यावी.
३. किडनीचे त्रास असणाऱ्यांसाठी घातक
ज्यांना किडनीशी निगडित तक्रारी आहेत त्यांनी ताक पिणे शक्यतो टाळावे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ताकात जास्त प्रमाणात सोडीयम असते, जे किडणीसाठी घातक ठरु शकते.