आलं पेस्ट किंवा आल्याचे तुकडे, किसलेलं आलं आपण जेवणाला स्वाद येण्यासाठी नेहमीच वापरतो. अनेकदा वाटणाच्या भाज्या किंवा उसळी या आल्याशिवाय केल्या जात नाहीत. थंडीच्या दिवसांत तर आपण अनेकदा आलं घातलेला चहा पितो. आलं उष्ण असल्याने थंडीत आलं खाल्लेलं चालतं असं जीर आपण म्हणत असलो तरी जास्त प्रमाणात आलं खाल्ल्याने त्याचा शरीराला त्रास होऊ शकतो. आल्यामध्ये औषधी गुणधर्म असतात असे म्हटले तरी कोणतीही गोष्ट प्रमाणातच खायला हवी. आल्यासारखी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त खाल्ली तर त्याचे काय परिणाम होतात पाहूया...
१. हृदयासाठी हानीकारक
आल्यातील घटक हे हृदयाचे काम सुरळीत होण्यासाठी काही वेळा अडथळ्याचे ठरु शकतात. आल्याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर कमी रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना आधीपासूनच रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी अतिशय कमी प्रमाणात आलं खाणं केव्हाही फायदेशीर ठरते. आलं जास्त खाल्ल्यास हृदयाची धडधड वाढण्याची शक्यता असते.
२. डायबिटीस असणाऱ्यांसाठी घातक
डायबिटीस असणाऱ्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी काही औषधे दिलेली असतात. ही औषधे चालू असताना आलं जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच आल्यामुळे रक्तदाब कमी होत असल्यानेही डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनी जास्त प्रमाणात आलं खाणे उपयुक्त नसते. त्यामुळे डायबिटीसच्या औषधांसोबत आलं खाल्लेलं चालतं का याबाबत तज्ज्ञांशी योग्य ती सल्ला मसलत केलेली केव्हाही चांगली.
३. गर्भवतींनी टाळायला हवे
गर्भवती असताना गर्भाशयाचे आकुंचन होणे योग्य नाही. मात्र आल्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात गर्भवती स्त्रियांनी आलं खाणे टाळावे किंवा अतिशय कमी प्रमाणात खावे. तसेच आल्यामुळे छातीत जळजळ होणे, अॅसिडीटी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे गर्भधारणेच्या काळात आल्याचा वापर शक्यतो टाळावा.
४. त्वचा आणि डोळ्यांच्या तक्रारी
प्रमाणापेक्षा जास्त आलं खाल्लं तर त्वचेवर रॅश येणे, पुरळ येणे तसेच डोळे लाल होणे अशा समस्या उद्भवण्याची शक्यता असते. आल्यामुळे शरीरावर खाज येणे, डोळे चुरचुरणे, घशात खवखवणे अशा समस्याही आल्यामुळे उद्भवतात. त्यामुळे आलं शक्यतो कमी प्रमाणात खावे.