भात हा आपल्या जेवणातला महत्त्वाचा पदार्थ. जेवणात भात असेल तर जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटते. आपण दुपारी घरी जेवायला असू तर कुकर लावतो. नाहीतर रात्री तरी आवर्जून आपण गरम भाताचा कुकर लावतोच. भाताचा आपल्याला अनेकदा अंदाज येत नाही आणि आपल्याकडून तो जास्तच होतो. दुसऱ्या दुपारचा भात रात्री खायचा असेल किंवा रात्रीचा भात दुपारी खायचा असेल तर गार भात आपल्याला नकोसा वाटतो. मग हा भात गरम कसा करायचा असा प्रश्न आपल्यापुढे असतो (simple and easy trick to reheat cold rice) .
कुकरला भात गरम करायला लावला तर तो आधीच शिजलेला असल्याने करपण्याची शक्यता असते त्यामुळे त्यात थोडे पाणी घालावे लागते आणि मग भाताची चव जाते. पण असे काहीच न करता अगदी ५ मिनीटांत गार भात मस्त गरम भाताप्रमाणे वाफाळता करायचा असेल तर त्यासाठी नेमकं काय करायचं हे आपल्याला माहित नसतं. गार भात तर जेवणात नकोसा वाटतो. अशावेळी वापरता येईल अशी एक सोपी आणि अतिशय भन्नाट ट्रिक आज आपण पाहणार आहोत. यामुळे जुनाच गार भात अगदी पहिल्या वाफेच्या भातासारखा खाता येईल. यासाठी जास्त कष्टही लागत नसल्याने ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करुन पाहा...
१. एक पातेले आणि एक मोठी गाळणी घ्यायची.
२. या गाळणीमध्ये गार झालेला भात घालायचा आणि तो थोडा मोकळा करुन ठेवायचा.
३. इलेक्ट्रॉनिक किटलीमध्ये किंवा गॅसवर पाणी गरम करायचे.
४. पाण्याला चांगली उकळी आली की हे गरम पाणी या गाळणीतील भातावर घालायचे.
५. यामुळे पाण्याची वाफ भातावर बसते आणि पाणी खाली निघून जाते.
६. वाफेमुळे भात मस्त ताज्या भातासारखा गरम होतो.
७. त्यामुळे आपण शिळा भात खात आहोत असे अजिबातच वाटत नाही.