Join us  

घरच्याघरी करा पाणीपुरीची कुरकुरीत टम्म फुगलेली पुरी... उत्तम पुऱ्या करण्याची ही घ्या सोपी कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 6:16 PM

विकतची पाणीपुरीची पुरी ही कुरकुरीत असते आणि पाणीपुरीचा आनंद घ्यायचा असेल तर अशीच पुरी लागते हे खरं आहे, पण ही पुरी घरी करता येत नाही हे मात्र चुकीचं आहे. घरी सुध्दा विकत मिळते तशी पाणीपुरीची पुरी करता येते. त्यासाठी नियम पाळून पुरी करा.

ठळक मुद्देपुर्‍यांची कणिक घट्ट भिजवावी.पुर्‍यांची कणिक भिजवताना त्यात तेल घालू नये. पुर्‍या जाड न ठेवता पातळ कराव्यात.

पाणीपुरीचं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. कुरकुरीत पुर्‍या मध्यभागी फोडून त्यात बटाट्याचं सारण, पुदिन्याचं तिखट आणि चिंच गुळाचं गोड आंबट पाणी आणि शेव टाकून खाण्याची मजाच काही वेगळी आहे. बाहेर स्टॉलवर पाणीपुरी खाणं सध्याच्या परिस्थितीत धोकादायक आहे. अनेकजण बाहेरुन पाणीपुरीच्या पुर्‍या आणून घरी सारण आणि पाणी तयार करुन पाणीपुरी खाण्याचा आनंद लुटतात. कारण सर्व काही घरी करता येतं फक्त ती पाणीपुरीची टम्म फुगलेली कुरकुरीत पुरी काही जमत नाही , त्यासाठी ती बाहेरुन आणावीच लागते. विकतची पाणीपुरीची पुरी ही कुरकुरीत असते आणि पाणीपुरीचा आनंद घ्यायचा असेल तर अशीच पुरी लागते हे खरं आहे, पण ही पुरी घरी करता येत नाही हे मात्र चुकीचं आहे. घरी सुध्दा विकत मिळते तशी पाणीपुरीची पुरी करता येते.अनेकजणी घरी पाणीपुरीची पुरी करुन बघण्याचा प्रयत्न करतात . पण अनेकींच्या फुगतच नाही तर अनेकींच्या मऊ पडतात. हे असं होतं कारण पुरीची कणिक मळताना काहीतरी चुकतं. पुरीची कणिक जर नियमबरहुकुम मळली गेली तर खात्रीनं परफेक्ट पुरी जमणारच..

काय आहेत पाणीपुरीची पुरी बनवण्याचे नियम? 

  • पाणीपुरीच्या पुर्‍या गव्हाच्या पिठाच्य आणि रव्याच्या दोन्ही प्रकारे करता येतात. जर गव्हाच्या पिठापासून पुर्‍या बनवणार असू तर एक कप कणिक घ्यावी आणि त्यात तीन चमचे रवा घालावा.
  • एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी घालून कणिक घट्ट मळावी.
  • पुर्‍यांची कणिक भिजवताना त्यात तेल घालू नये. कारण तेल घातल्यास पुर्‍या कुरकुरीत न होता मऊ पडतात.
  • भिजवलेली कणिक कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त एक तास ओल्या कापडाखाली झाकून ठेवावी. कणिक सुकल्यास पुर्‍या लाटणं अवघड होतं.

 

  • पुर्‍या करण्याआधी कणिक पुन्हा चांगली रगडून रगडून मळून घ्यावी.
  • छोट्या छोट्या लाट्या कराव्यात. त्या हातावरच दाबून चपट्या कराव्यात.
  • लाट्याही ओल्या कापडाखालीच झाकून ठेवाव्यात.
  • पुर्‍या जाड न ठेवता पातळ कराव्यात. त्या जितक्या पातळ असतात तितक्या चांगल्या फुगतात.
  • पुर्‍या तळताना गॅसची आच मंद ठेवावी. मोठ्या आचेवर पुर्‍या लवकर लाल होतात, जळतात आणि नीट तळल्या जात नाही.

बस एवढे नियम पाळले तर विकतसारखी पाणीपुरीची पुरी घरच्याघरी तयार करता येते.