इडली हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अतिशय आवडणारा प्रकार. गरमागरम इडली तूप आणि पूड चटणी घालून किंवा अगदी खोबऱ्याची चटणी, सांबार यासोबतही छान लागते. पोटभरीची आणि पचायला हलक्या अशा इडलीचा बेत आपण महिन्यातून एकदा तरी करतोच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही इडली पोटभरीची असल्याने नाश्त्यालाच नाही तर एखादवेळी जेवणालाही केली जाते. पण इडली म्हणजे डाळ-तांदूळ भिजवून ते पीठ आंबवून केला जाणारा पदार्थ. पण आज आपण थोडी आगळीवेगळी अशी इडली पाहणार आहोत. ही इडली नेहमीच्या इडलीपेक्षा जास्त सॉफ्ट आणि हलकीफुलकी होत असून तुमच्याकडे इडलीचं पीठ भिजवण्याइतका वेळ नसेल तर तुम्ही ही झटपट होणारी सोपी इडली रेसिपी नक्की ट्राय करु शकता. चिवडा, भडंग, भेळ यांसाठी वापरण्यात येणाऱ्या चुरमुऱ्यांपासून अगदी ऐनवेळी होणारी ही इडली तितकीच सॉफ्ट आणि चविष्ट लागते (Soft Instant Murmura Idli Recipe).
१. सगळ्यात आधी १.५ ते २ वाटी चुरमुरे पाण्यात भिजवून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि काही वेळ पाण्यात तसेच ठेवायचे.
२. त्यानंतर हे चुरमुरे हाताने मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि त्यात थोडे पाणी घालून त्याची चांगली पेस्ट तयार करुन घ्यायची.
३. ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढल्यानंतर त्यामध्ये वाटीभर रवा आणि अर्धी वाटी दही घालायचे.
४. या मिश्रणात मीठ आणि अंदाजे पाणी घालून ते चांगले एकजीव करायचे.
५. त्यावर एखादे कापड किंवा ताट ठेवून हे पीठ साधारण २० मिनीटांसाठी मुरवत ठेवायचे.
६. साधारण २० मिनीटांनी यामध्ये थोडे इनो घालून मग वरुन पाणी घालायचे आणि पीठ पुन्हा एकजीव करायचे.
७. यानंतर इडली पात्र किंवा वाट्यांमध्ये हे पीठ घालून ते १५ मिनीटे वाफेवर झाकण लावून ठेवायचे.
८. अतिशय छान अशा मऊ-लुसलुशीत इडल्या झटपट तयार होतात.
९. या इडल्यांसाठी जास्तीचा वेळ किंवा खूप सामान लागत नसल्याने ऐनवेळी इडलीचा बेत करुनही आपण त्या करु शकतो.