Join us  

पोळी कधी वातड, कधी कडक होते? मऊ, लुसलुशीत पोळी हवी, त्यासाठी १० महत्त्वाच्या टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 12:37 PM

जेवताना पोळीचा घास तोडला आणि पोळी मऊ, लुसलुशीत असेल तर आपण मनापासून आणि थोडे जास्तच जेवतो. पण हीच पोळी वातड किंवा कडक झाली की मात्र सगळा मूडच जातो, असे होऊ नये म्हणून..

ठळक मुद्देजास्त तेल लावल्याने किंवा कणीक सैल मळल्याने पोळी मऊ होते असे नाही...काही सोप्या युक्त्या वापरल्या तर पोळ्या मऊ, लुसलुशीत राहण्यास मदत होते

पोळी हा आपल्या जेवणातील मुख्य घटक असून या पोळ्या धड नसतील तर मात्र सगळ्या जेवणाचीच चव जाते. मग आपण खायचे म्हणून खातो आणि जेवण उरकतो. पण आवडीने मनापासून जेवण करायचे असेल तर पोळ्या मऊ आणि लुसलुशीत असायला हव्यात. अनेकजण घाईच्या वेळात सकाळचा नाश्ता म्हणूनही गरम पोळीच खातात. ही पोळी कधी वातट होते तर कधी कडक. कणीक मळताना जास्त तेल घातले की पोळी चांगली होते किंवा कणीक सैल भिजवली की पोळी चांगली होते असा आपला समज असतो. पण दरवेळी असेच असते असे नाही. मुख्यत: पोळ्या मऊ होण्यासाठी अनेक घटक गरजेचे असतात. गव्हाचा दर्जा, दळण, पीठ मळणे, पोळी एकसारखी लाटली जाणे आणि मग ती योग्य पद्धतीने भाजणे या सगळ्या क्रिया योग्य झाल्या तर पोळी मऊ आणि लुसलुशीत होते. अशी पोळी तुम्ही डब्यात नेली आणि ती गार झाल्यावर खाल्ली तरीही ती मऊच लागते. आता ही मऊ, लुसलुशीत पोळी थोडे प्रयत्न केले तर आपल्यालाही हे जमू शकते. त्यासाठी काही सोप्या टिप्स समजून घेऊया... 

१. कणीक जास्तीत जास्त चांगली मळून घ्यावी, त्यामुळे त्यातला ग्लुटेन हा पदार्थ व्यवस्थितपणे एकजीव होण्यास मदत होते आणि कणीक मऊ होते. 

२. कणीक मळून झाल्यानंतर ती १५ ते २० मिनिटे झाकून ठेवावी. म्हणजे ती चांगल्या पद्धतीने मुरण्यास मदत होते आणि एकजीव होते. 

३. कणीक मळून झाल्यावर त्याला वरच्या बाजुने तेल किंवा पाण्याचा हात लावून ठेवावा म्हणजे ती कडक होत नाही आणि पोळ्या लाटताना एकसारखा गोळा करता येतो. 

( Image : Google)

४. पोळीच्या कडा आणि मध्यभाग एकसारखा लाटला जायला हवा, जेणेकरुन भाजतानाही पोळी एकसारखी भाजली जाते आणि ती मऊ होण्यास मदत होते. 

५. तवा पूर्ण गरम झाला आहे की नाही तपासायचे. तवा व्यवस्थित गरम झाला नसेल तर पोळी वातट होण्याची शक्यता असते. त्यामुळे तवा पूर्ण तापल्यावरच त्यावर पोळी टाकायची. 

६. पहिली बाजू तव्यावर टाकली की ती उलटण्याची घाई काहीवेळआ होते. मात्र त्यामुळे पोळी योग्य पद्धतीने भाजली जात नाही. वरची बाजू थोडी कोरडी पडतीये असे वाटले किंवा त्याला थोडे पदर सुटतायेत असे वाटले की मगच पोळी उलटायची. 

७. अनेकजण तव्यावरुन पोळी खाली काढली की मग तेल लावतात पण तव्यावरच पोळीला तेल लावल्यास ते चांगल्या पद्धतीने मुरते आणि पोळी मऊ होते. त्यामुळे पोळी भाजत असतानाच थोडेसे तेल सोडायचे. 

( Image : Google)

८. तव्यावर पोळी भाजत असताना ती कडेने थोडी दाबायची त्यामुळे कडा कडक किंवा कच्च्या राहत नाहीत. 

९. पोळी भाजून झाली की ती एखाद्या जाळीवर ठेवायची आणि कोमट झाली की डब्यात ठेवायची त्यामुळे पोळया कडक होत नाहीत. 

१०. तसेच पोळी जास्त पातळ लाटली गेल्यास ती कडक होण्याची शक्यता असते, त्यामुळे फार पातळ न लाटता ती एकसारखी लाटली जाईल याकडे लक्ष द्यायला हवे. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स