थंडीच्या दिवसात भूक खवळते. गरमगरम काहीतरी खावं प्यावंसं वाटतं. थंडीचा आरोग्यासाठी चांगला फायदा करुन घ्यायचा असेल तर थंडीत खवळणारी भूक आणि गरम खाण्यापिण्याची इच्छा यांचा मेळ घालण्यासाठी गरमगरम स्वादिष्ट सूप पिणं हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी हॉटेल रेस्टॉरण्ट गाठण्याची किंवा 'रेडी टू कूक' या लेबलची केमिकलयुक्त आरोग्याला घातक अशी बेचव सूप पिण्याचीही गरज नाही. घरच्याघरी सूप तयार करता येतं. घरच्याघरी सूप म्हटलं की फक्त टमाट्याचं आणि पालकाचं करता येतं. पण ते कितीवेळा पिणार? कंटाळा तर येणारच. सूप पिण्याचा कधीच कंटाळा येणार नाही असे उडदाच्या डाळीचं सूप, कॉर्न सूप, लेमन-कोरिअण्डर सूप आणि पम्पकिन सूप. हे चार प्रकारचे सूप म्हणजे चवीची मेजवानी. हे सूप सहजरित्या घरच्याघरी तयार करता येतात.
Image: Google
उडीद डाळीचं सूप
उडीद डाळीच्या सूप पिल्यानं शरीरास मोठ्या प्रमाणात प्रथिनं मिळतात. हे सूप सर्व ऋतुंमधे आरोग्यास लाभदायकस असतं. पण या सूपातील उष्ण प्रवृत्ती थंडीतल्या हवामानाशी जुळणारी, त्यावर काम करणारी आहे.हे सूप तयार करण्यासाठी 1 कप उडदाची डाळ, 1 कप हरभरा डाळ, 1 कांदा, 1 टमाटा, 1 चमचा लसूण, 1 चमचा आलं, 1 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, काळी मिरेपूड, 1 चमचा गरम मसाला एवढी सामग्री लागते.उडीद डाळीचं सूप करताना एका भांड्यात उडदाची आणि हरभर्याची डाळ भिजत घालावी. एक तासानंतर कुकरमधे थोडं तेल घालून चिरलेला कांदा आणि टमाटा परतून घ्यावा. नंतर भिजवलेल्या डाळी पाण्यासह मीठ घालून शिजायला लावाव्यात. डाळ शिजली की आधी ती थंड होवू द्यावी. थंड झालेली डाळ चांगली घोटून घ्यावी.एका कढईत थोडं तूप गरम करावं. यात लसूण आणि आल्याची पेस्ट घालून परतून घ्यावी. नंतर घोटलेली डाळ घालावी. ती एकदा चांगली हलवून घ्यावी. नंतर हिरवी मिरची आणि मिरेपूड घालावी. यानंतर यात दोन ते तीन ग्लास पाणी घालावं. पाणी घातल्यानंतर 8-10 मिनिटं सूप उकळावं. सूप चांगलं उकळलं की त्यात गरम मसाला घालावा. तो चांगला मिसळून घ्यावा. सूपला पुन्हा एकदा उकळी आणावी. हे सूप गरम गरम प्यावं.
Image: Google
कॉर्न सूप
कॉर्न सूप हे इंडो चायनीज सूप या प्रकारात मोडतं. या सूपला जो दाटसरपणा असतो त्यामुळे या सूपची चव आणि पौष्टिकता आणखी वाढते. कमीत कमी सामग्रीमधे उत्तम चवीचं सूप म्हणजे कॉर्न सूप होय.हे सूप तयार करण्यासाठी 1 मका कणीस, अर्धी वाटी उकडलेला मका, 2 चमचे तेल, 1 चमचा जिरे, 1 चमचा मिरपूड, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर, 1 चमचा ऑरेगॅनो आणि 5-6 पुदिन्याची पानं घ्यावीत.कॉर्न सूप तयार करताना एका भांड्यात पाणी उकळून घ्यावं. पाणी उकळलं की त्यात मका उकडायला घालावा. मका उकळून मऊसर झाले की ते थंड होण्यास ठेवावेत. मक्याचे दाणे थंड झाले की ते मिक्सरवर वाटून घ्यावेत. नंतर कढईत तेल गरम करावं. गरम तेलात आधी जिरे घालावेत. ते परतले गेले की मिरेपूड आणि हिरवी मिरची घालावी. ते परतलं गेलं की मक्याच्या दाण्यांची पेस्ट घालावी. ती चांगली त्यात मिसळून घेतली की त्यात पाणी घालावं. मिश्रणाला चांगली उकळी काढावी. नंतर त्यात चवीनुसार मीठ , कोथिंबीर , पुदिन्याची पानं , ऑरेगॅनो आणि उकडलेले मक्याचे दाणे घालावे. आणखी एक उकळी काढली की कॉर्न सूप तयार होतं.
Image: Google
लेमन-कोरिअण्डर सूप
लेमन कोरिअण्डर सूप म्हणजे चवीची मेजवानी नाही तर ते आरोग्यास एकाच वेळी अनेक फायदे देतं. या सूपमधे लिंबामुळे क जीवनसत्त्व असतं. थंडीत रोगप्रतिकाराश्क्ती वाढवण्यासाठी हे सूप पिणं महत्त्वाचं आहे. या सूपमधील कोथिंबीरमुळे हे सूप पचनासही मदत करतं. लिंबू आणि कोथिंबीरच्या सहाय्याने परफेक्ट सूप तयार होतं.हे सूप करण्यासाठी 1 चमचा तेल, 1 चमचा लसूण, 1 हिरवी मिरची, 1 वाटी पत्ता कोबी, अर्धा वाटी कोथिंबीर, 2 चमचे लिंबू, अर्धा वाटी गाजर, अर्धा वाटी उकडलेले कॉर्न एवढं साहित्य घ्यावं.सर्वात आधी एका कढईत तेल गरम करावं. तेल गरम झालं की लसूण, हिरवी मिरची घालावी. लसूण परतला गेला की त्यात चिरलेला कांदा, बारीक चिरलेला पत्ता कोबी, गाजर, कोथिंबीर आणि लिंबू टाकावं. फोडणी चांगली परतली गेली की किमान दोन मिनिटं मध्यम आचेवर भाज्या शिजू द्याव्यात. भाज्या थोड्या शिजल्या की त्यात लिंबाचा रस आणि कॉर्न फ्लोअर टाकावं. मिश्रण ढवलून त्यात उकडलेले मक्याचे दाणे घालावेत. नंतर मिश्रणाला चांगली उकळी फुटली की त्यात मीठ , चिरलेली कोथिंबीर घालावी . इतक्या सोप्या पध्दतीने हे सूप तयार करता येतं.
Image: Google
पम्पकिन सूप
पम्पकिन सूप म्हणजे रुचकर मेजवानी. इतर सूपच्या तुलनेत पम्पकिन सूप हलकं फुलकं आणि आरोग्यदायी असतं. मुलांना, मोठयांना भाज्या आवडत नसतील तर त्या भाज्या मिसळूनही हे सूप तयार करता येतं,हे सूप तयार करण्यासाठी, 2 वटी डांगर/ भोपळा, 1 चमचा आलं, अर्धा चमचा आलं, अर्धा लसून पाकळ्या, 1 कांदा, 1 चमचा ऑलिव्ह ऑइल, अर्ध चमचा साखर, एक चिरलेला कांदा, मिरेपूड, चवीनुसार मीठ, 4 ब्रेड स्लाइस, 2 चमचा चिरलेली कोथिंबीर आणि अर्धी वाटी खोबर्याचं दूध एवढं जिन्नस घ्यावं.
सर्वात आधी कढईत ऑलिव ऑइल घालावं. तेल गरम झालं की त्यात वाटलेली आलं आणि लसूण पेस्ट घालावी. ते चांगले परतले गेले की त्यात चिरलेला कांदा घालावा. कांदाही परतून घ्यावा. कांदा थोडा शिजला की त्यात चिरलेला भोपळा घालावा. भोपळा चांगला मिसळून घेतला की त्यात मीठ आणि मिरे पूड घालावी. मिश्रण चांगलं ढवळून घ्यावं. त्यानंतर त्यात पाणी घालून सूपमधला भोपळा 20 मिनिट उकळू द्यावा. भोपळा शिजला की त्यात खोबर्याचं दूध घालावं. आणि मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. नारळाचं दूध भाज्यात मिसळलं गेलं की हे मिश्रण ब्लेण्डरनं बारीक करुन घ्यावं. यामुळे मिश्रणाला दाटसरपणा येतो. हे दाटसर सूप गरम गरम घेतलं की छान लागतं.