Join us  

South Indian coffee सहज जमेल! कॉफी पांचटच होते हा इतिहास विसरा, करा रिफ्रेशिंग कॉफी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 6:46 PM

कितीही प्रयत्न केला तरी कॉफी नेहमी पांचटच होते, असं अनेक जणींचं म्हणणं असतं. तुमचा अनुभवही असाच आहे का?, असं असेल तर कॉफीची ही एकदम झकास रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा.

ठळक मुद्देतुम्हाला रोजच कॉफी प्यायची सवय असेल तर इन्स्टंट कॉफी बनवून ठेवू शकता.इन्स्टंट कॉफीमध्ये गरम दूध टाका. चमच्याने थोडेसे हलवले, की झाली कॉफी तयार. 

कधी कधी खूप कंटाळा आला किंवा खूपच थकवा आला असेल, तर मस्त गरमागरम कॉफी प्यावी वाटते. अशी कॉफी जी नेहमी आपण बाहेर हॉटेलमध्ये घेत असतो. हॉटेलमधली कॉफी घेतली की सगळा थकवा एकदम पळून जातो. घरी मात्र कितीही प्रयत्न केला तरी बाहेर मिळते, तशी स्ट्राँग  काॅफी आपल्याला  काही जमत नाही आणि त्यामुळे मग कॉफी पिण्याची तल्लफ काही भागत नाही. म्हणूनच तर कॉफीची ही मस्त मस्त रेसिपी घ्या आणि पावसाळ्याच्या या थंडगार वातावरणात रिफ्रेश करून टाकणाऱ्या कॉफीचा आनंद लूटा. या कॉफीची चव थेट South Indian coffee सारखी लागेल.

 

अशी बनवा स्ट्राँग कॉफीसाहित्यएक टेबलस्पून कॉफी, एक टेबलस्पून साखर, दोन टेबलस्पून काेमट पाणी आणि एक कप गरम दूध.

कॉफी कशी बनवायची- सगळ्यात आधी तर दूध गॅसवर गरम करायला ठेवून द्या.- यानंतर कॉफी आणि साखर कॉफी मग मध्ये टाका.- आता त्याच्यात कोमट पाणी टाका आणि हे मिश्रण चमच्याने पाच ते सहा मिनिटे एकाच दिशेने गोलाकार पद्धतीने हलवा.

- कॉफी मेकर असेल तर एक ते दोन मिनिटात काम होते.- कॉफी फेटून होईपर्यंत दूध गरम झालेले असेल. आता गरम दूध या कपात ओता.- पुन्हा एकदा चमच्याने कपातले दूध आणि कॉफी हलवून घ्या आणि मस्त गरमागरम स्ट्राँग कॉफी प्या.

असे बनवा इन्स्टंट कॉफी मिक्स१. तुम्हाला रोजच कॉफी प्यायची सवय असेल तर इन्स्टंट कॉफी बनवून ठेवू शकता. इन्स्टंट कॉफी बनविण्यासाठी कॉफी पावडर आणि साखर यांचे समसमान प्रमाण एका पातेल्यात घ्या. यामध्ये जेवढी कॉफी घेतली असेल, त्याच्या दुप्पट पाणी टाका. आता कॉफी ब्लेंडरने हे मिश्रण फेटून घ्या. जोपर्यंत कॉफीचा रंग बदलत नाही, तोपर्यंत हे मिश्रण फेटत रहावे.

 

कॉफीचा रंग फिकट चॉकलेटी झाला आणि कॉफीचा जाड थर दिसू लागला, की मग हे मिश्रण एखाद्या एअरटाईट बाटलीमध्ये भरून ठेवा. हे मिश्रण १५ दिवस तरी फ्रिजमध्ये आरामात टिकते. जेव्हा काॅफी बनवायची असेल, तेव्हा एक चमचा ही इन्स्टंट कॉफी कपात घ्या, यामध्ये गरम दूध टाका. चमच्याने थोडेसे हलवले, की झाली कॉफी तयार. 

 

टॅग्स :अन्नपाककृती