केक म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडात पाणी सुटलेच म्हणून समजा. मग तो कोणत्याही प्रकारचा केक असो. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना केक हा फार आवडतो. लॉकडाऊनमध्ये अनेक जणींनी केक शिकण्याचा प्रयत्न केला. काहींचा केक फसतो तर, काहींना बेकरी स्टाईल परफेक्ट जमतो. आपल्याला जर केक शिकायचे असेल तर, सर्वात आधी सोपे स्टेप्सचा आधार घेऊन केक शिका.
सध्या गुलाबी मौसम सुरु आहे. सर्वत्र व्हॅलेण्टाइन्स डे चे वारे वाहू लागत आहे. आपल्याला जर आपल्या प्रियजणांसाठी काहीतरी स्पेशल बनवायचं असेल, तर त्यांच्यासाठी खास साऊथ इंडियन अय्यंगार स्टाईल रवा केक ही रेसिपी बनवा. रवा, दुध, दही अशा घरगुती साहित्यात बनणारी ही रेसिपी झटपट बनते. चला तर मग या स्पॉन्जी रेसिपीची कृती पाहूयात.
स्पॉन्जी रवा केकसाठी लागणारं साहित्य
दही
साखर
रवा
दुध
मैदा
मिल्क पावडर
बेकिंग पावडर
बेकिंग सोडा
मीठ
व्हॅनिला इसेन्स
कृती
सर्वप्रथम, एका मोठ्या बाऊलमध्ये दही, दुध, साखर टाका. व हे मिश्रण चांगले मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात रवा टाका. रवा टाकल्यानंतर चाळणी घ्या. त्यात मैदा, मिल्क पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळून मिक्स करा. आता त्यात चवीनुसार मीठ आणि व्हॅनिला इसेन्स टाकून मिश्रण चांगले मिक्स करा. एका दिशेने संपूर्ण मिश्रण एकत्र मिक्स करा.
मिश्रण मिक्स झाल्यानंतर केकच्या भांड्याला चांगले तेल अथवा बटरने ग्रीस करा. त्यावर बटर पेपर ठेवा. आणि तयार मिश्रण केकच्या भांड्यात टाका. हा केक ओव्हन अथवा कुकरमध्ये शिजवून घ्या. हा केक साधारण ३० मिनिटात तयार होतो. केक शिजला आहे की नाही हे चेक करण्यासाठी केकच्या आतमध्ये टूथपिक टाकून तपासून पाहा. याने केक शिजला आहे की नाही याचा अंदाज येईल. अशा प्रकारे साऊथ इंडियन आयंगर स्टाईल रवा केक खाण्यासाठी रेडी. आपण हा केक सायंकाळच्या चहासह खाऊ शकता. अथवा मुलांच्या टिफिनसाठी देखील देऊ शकता.