Lokmat Sakhi >Food > साउथ इंडियन म्हणजे फक्त इडली डोसे नव्हे;  4 अस्सल पारंपरिक दक्षिणी पदार्थ खाऊन तर पहा

साउथ इंडियन म्हणजे फक्त इडली डोसे नव्हे;  4 अस्सल पारंपरिक दक्षिणी पदार्थ खाऊन तर पहा

दक्षिण भारतातील पदार्थांमधेही खूप विविधता आहे. काही पदार्थ तर केवळ खास चवीसाठी  म्हणून ओळखले जातात. हे पदार्थ आपण आपल्या आहारात समाविष्ट करु शकतो. शिवाय सणावाराला गोडधोड म्हणून दक्षिण भारतीय पदार्थ करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 02:54 PM2021-08-19T14:54:29+5:302021-08-19T15:00:18+5:30

दक्षिण भारतातील पदार्थांमधेही खूप विविधता आहे. काही पदार्थ तर केवळ खास चवीसाठी  म्हणून ओळखले जातात. हे पदार्थ आपण आपल्या आहारात समाविष्ट करु शकतो. शिवाय सणावाराला गोडधोड म्हणून दक्षिण भारतीय पदार्थ करु शकतो.

South Indian is not just Idli Dose; Try and taste these 4 authentic southern food | साउथ इंडियन म्हणजे फक्त इडली डोसे नव्हे;  4 अस्सल पारंपरिक दक्षिणी पदार्थ खाऊन तर पहा

साउथ इंडियन म्हणजे फक्त इडली डोसे नव्हे;  4 अस्सल पारंपरिक दक्षिणी पदार्थ खाऊन तर पहा

Highlightsभातासोबत गरमागरम रस्सम खाल्ल्यास तोंडाला जी चव येते त्याला तोड नाही.दक्षिण भारतीय सणवार, लग्न समारंभ, शुभ कार्याच्या वेळेस पायसम केलं जातं. फूल क्रीम दुधात तांदूळ शिजवून हे पायसम केलं जातं.दक्षिण भारतात अप्पम नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणात खाल्ले जातात.

साउथ इंडियन पदार्थ म्हटले की इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे आणि सांबार एवढेच पदार्थ डोळ्यासमोर येतात. पण खरंतर दक्षिण भारतातील पदार्थांमधेही खूप विविधता आहे. काही पदार्थ तर केवळ खास चवीसाठी म्ह्णून ओळखले जातात. हे पदार्थ आपण आपल्या आहारात समाविष्ट करु शकतो. शिवाय सणावाराला गोडधोड म्हणून दक्षिण भारतीय पदार्थ करु शकतो. नाश्ता, रात्रीचं जेवण आणि सणवार यासाठी आपणही सहज तयार करु शकू असे काही खास पदार्थ त्यांच्या रेसिपीसह.

रस्सम

छायाचित्र- गुगल

रस्सम हा तर दक्षिण भारतीय जेवणातला महत्त्वाचा पदार्थ. रस्सम शिवाय तिकडे जेवण पूर्ण होवूच शकत नाही. भातासोबत हे गरमागरम रस्सम खाल्ल्यास तोंडाला जी चव येते त्याला तोड नाही.
रस्सम करण्यासाठी 1 कप चिंचेचा कोळ, 1 टमाटा, 1 कप पाणी, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा मिरे, 1 इंच आलं, कढीपत्ता, जिरे, कोथिंबीर, हिंग, हळद आणि मीठ.

रस्सम करताना आधी टेनिस बॉलच्या आकाराएवढा चिंचेचा गोळा घ्यावा. एका भांड्यात गरम पाणी घालून त्यात चिंचेचा गोळा भिजवावा आणि कोळ काढून घ्यावा. एका कढईत चिंचेचा गोळ घालावा. त्यातच एक चिरलेला टमाटा घालावा. गॅस मंद करावा. टमाटा चांगला स्मॅश करावा. त्यानंतर त्यात एक कप पाणी घालावं. आता त्याला चांगली उकळी आणावी. झाकण ठेवून मिर्शण उकळावं. मिर्शण उकळेपर्यंत हिरवी मिरची, काळे मिरे, आलं, कढीपत्ता हे एकत्र करुन वाटून घ्यावं. हे वाटल्यावर त्यात जिरे, कोथिंबीर, पाव चमचा हिंग घालून हा मसाला परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यावा. आता उकळी आलेल्या मिर्शणात हा वाटलेला मसाला घालून मिर्शण चांगलं ढवळून घ्यावं. मिर्शणला पुन्हा उकळी आणावी. मिर्शण उकळेपर्यंत तडका तयार करावा. त्यासाठी एक चमच तेल तापवावं. त्यात एक चमचा मोहरी, दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या आणि थोडा कढीपत्ता घालावा. हा तडका उकळत असलेल्या रस्सममधे घालावा. रस्सम पुन्हा चांगलं ढवळून घ्यावं. शेवटी मीठ आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.

पायसम

छायाचित्र- गुगल

दक्षिण भारतीय सणवार, लग्न समारंभ, शुभ कार्याच्या वेळेस पायसम केलं जातं. फूल क्रीम दुधात तांदूळ शिजवून हे पायसम केलं जातं.
पाल पायसमसाठी साडेचार कप सायीचं दूध, पाव कप बासमती तांदूळ ( अर्धा तास भिजवून निथळलेले) , पाव कप कोमट फूल क्रीम दूध, थोडं केशर, अर्धा कप साखर आणि वेलची पावडर ही सामग्री लागते.

एका भांड्यात पाव कप कोमट दूध घेऊन त्यात केशर भिजवायला ठेवावं. एका खोलगट भांड्यात दूध गरम करावं. त्यात तांदूळ घालावेत. ते चांगले ढवळून घ्यावेत. मध्यम आचेवर ते मधून मधून ढवळत राहावं. सात आठ मिनिटं दूध उकळावं. मग पुन्हा चार पाच मिनिटं मंद आचेवर दुधाला उकळी आणावी. मधून मधून चमच्यानं ढवळत राहावं. ढवळताना चमच्यानं तांदूळ स्मॅश करत राहावे. मग साखर, केशर दुधाचं मिर्शण घालून पुन्हा दोनं मिनिटं उकळी काढावी. हे पायसम थंड करुन खायचं असतं.

अप्पम

छायाचित्र- गुगल

दक्षिण भारतात अप्पम नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणात खाल्ले जातात. अप्पम मुळचा श्रीलंकेचा पदार्थ आहे. पण भारतात तो विशेषत: तामिळनडू आणि केरळमधे खाल्ला जातो.
अप्पम तयार करण्यासाठी 1 कप तांदूळ, 2 कप किसलेलं नारळ, 3 मोठे चमचे साखर, अर्धा चमचा यीस्ट, मीठ आणि गरजेनुसार तेल घ्यावं.

 सर्वात आधी एका भांड्यात तांदूळ आणि खोवलेलं नारळ सहा ते सात तास एकत्र भिजवावं. नंतर त्यात मीठ आणि साखर घालून ते मिक्सरमधून वाटून घ्यावं. नंतर या मिश्रणात यीस्ट घालून ते दोन ते तीन मिनिटं तसंच राहू द्यावं. त्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावं. हे मिर्शण एका भांड्यात काढून चार पाच तास झाकून ठेवावं. अप्पम करताना आधी पॅनला तेल लावून पॅन गरम होवू द्यावा. एका खोलगट डावानं हे मिश्रण पॅनवर घालून डावाच्या बुडानं ते पसरुन घ्यावं. एक बाजू भाजली गेली की दुसरी बाजू भाजावी.

परुप्पु पायसम

छायाचित्र- गुगल

हरभरा डाळ, गूळ आणि नारळापासून तयार होणारी ही अनोख्या स्वादाची खीर आहे. जेवण संपण्याआधी म्हणजे जेवणाच्या शेवटी हे परुप्पु पायसम खावं.

परुप्पु पायसम तयार करण्यासाठी दोन चमचे साजूक तूप, अर्धा कप हरभरा डाळ, 3 कप पाणी , पाव कप साबुदाणा ( अर्धा तास भिजवलेला), अर्धा कप गूळ, पाऊण कप नारळाचं दूध, 10 काजू, 2 चमचे बेदाणे घ्यावेत.

सर्वात आधी कुकरमधे एक चमचा साजूक तूप घालावं. ते थोडं गरम झालं की अर्धा कप हरभरा डाळ घालावी. ती दोन मिनिटं खमंग सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यावी. नंतर यात दोन कप पाणी घालावं. ते चांगलं ढवळून घ्यावं. डाळ चांगली शिजवून घ्यावी. डाळ शिजेपर्यंत एक कढईत पाव कप साबुदाणा आणि एक कप पाणी घ्यावं. साबुदाणा चांगला नरम होईपर्यंत शिजवावा. मग या शिजलेल्या साबुदाण्यात शिजलेली हरभरा डाळ घालावी. ते चांगलं ढवळून घेतलं की त्यात अर्धा कप गूळ घालावा. तो चांगला विरघळू द्यावा. नंतर गॅसची आच मंद करुन त्यात पाऊण कप नारळाचं दूध घालावं. ते चांगलं एकजीव करावं. एका पॅनमधे एक चमचा साजूक तूप गरम करुन त्यात काजू आणि बेदाणे परतून घ्यावेत. काजू चांगले सोनेरी रंगावर परतले गेले की काजू आणि बेदाणे परुप्पु पायसममधे घालावेत.

Web Title: South Indian is not just Idli Dose; Try and taste these 4 authentic southern food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.