रोज रोज पोळी-भाजी, भात वरण खाऊन कंटाळा येतो. म्हणून विकेंड आपण आवर्जून वेगळं काहीतरी करतो. करायला सोपी, पोटभरीचे आणि पौष्टीक असल्याने साऊथ इंडीयन पदार्थ अनेक घरात १५ दिवसांनी एकदा तरी केले जातात. नाश्त्याला, जेवणाला आणि कोणी पाहुणे येणार असतील तरीही इडली, डोसा, उतप्पा हे प्रकार करणे सोयीचे असते. डाळींचे भरपूर प्रमाण आणि आंबवण्याची क्रिया झाल्याने हे पदार्थ पोष्टीक असतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खात असल्याने इडली, डोशासोबत सांबार, चटणी हा असा बेत केला जातो (South Indian Special kara chutney Recipe).
इडली किंवा डोशासोबत आपण साधारणपणे खोबऱ्याची हिरवी चटणी करतो. मिरची, कोथिंबीर, खोबरं, दाणे यांपासून केलेली ग्रीन चटणी नेहमीचीच. पण काही दक्षिणेकडे साऊथ इंडीयन पदार्थांसोबत पारंपरिक अशी लाल रंगाची चटणी केली जाते, काही हॉटेलमध्येही ही चटणी आवर्जून दिली जाते. कारा चटणी अशा नावाने ओळखली जाणारी ही चटणी चवीला खूपच वेगळी आणि चविष्ट असते. आंबट-गोड चव असल्याने ही चटणी आपल्याला खूपच आवडते. ही चटणी घरी कशी बनवायची पाहूया...
१. पॅनमध्ये १ चमचा तेल घालून त्यात १ चमचा हरभरा डाळ आणि १ चमचा उडीद डाळ चांगली भाजून घ्यायची.
२. मग यामध्ये बारीक चिरलेला १ कांदा, २ ते ३ लाल मिरच्या आणि लसणाच्या ४ ते ५ पाकळ्या घालून त्याही चांगल्या परतून घ्यायच्या.
३. टोमॅटोचे बारीक काप करुन ते सगळ्यात शेवटी पॅनमध्ये घालायचे आणि थोडेसे परतून गॅस बंद करायचा.
४. हे सगळे मिश्रण थोडे थंड झाले की ते मिक्सरमध्ये घालायचे आणि यात थोडी चिंच, पाणी आणि मीठ घालायचे.
५. मिक्सर फिरवून ते एकसारखे बारीक करुन घ्यायचे.
६. मग यावर तेल, मोहरी, जीरं, हिंग, कडीपत्ता यांची खमंग फोडणी द्यायची.