Join us  

खिचडी- मसालेभात नेहमीचाच, करा साऊथ इंडियन चिंचेच्या कोळातला आंबट-गोड भात, सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2023 10:24 AM

South Indian Style Tamarind Rice Recipe : कोणत्याही वेळेला करता येईल आणि आवडीने खाल्ला जाईल असा एक आगळावेगळा भाताचा प्रकार आज आपण पाहणार आहोत

रात्रीच्या वेळी आपल्याला अनेकदा पोळी भाजी नको असते. अशावेळी आपण भात आमटी, खिचडी, दही भात असे काही ना काही करतो. नेहमी भाताचे तेच ते प्रकार करण्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खूश होतात आणि आवडीने खातात. इतकेच काय घरी पाहुणे येणार असतील तरी आपल्याला भाताचा वेगळा काहीतरी प्रकार करायचा असतो. अशावेळी आपल्याला काही सुचत नाही. अशा कोणत्याही वेळेला करता येईल आणि आवडीने खाल्ला जाईल असा एक आगळावेगळा भाताचा प्रकार आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे चिंचेच्या कोळातला भात. साऊथ इंडियन स्टाईलने केला जाणारा हा भात झटपट होतो आणि चविलाही अतिशय छान लागतो. पाहूयात हा भात कसा करायचा (South Indian Style Tamarind Rice Recipe)... 

पाहा कसा करायचा चिंचेचा भात

१. एका पॅनमध्ये १ चमचा उडीद डाळ आणि १ चमचा हरभरा डाळ घालून चांगले परतून घ्या.

२. त्यामध्ये १ चमचा धणे, २ चमचे तीळ आणि पाव चमचा मेथ्या आणि ५ ते ६ काळे मिरे घालून तेही चांगले परतून घ्या. 

३. नंतर ३ लाल मिरच्या आणि थोडा हिंग घालून सगळे मिश्रण चांगले परता. 

(Image : Google)

४. चांगला वास आला की गॅस बंद करा आणि हे सगळे गार होऊद्या 

५. मग मिक्सरच्या भांड्यात घालून हे मिश्रण बारीक करुन घ्या.

६. एका बाऊलमध्ये कोमट पाण्यात चिंच किमान १.५ तास भिजवा आणि नंतर त्याचा कोळ काढून घ्या.  

७. कुकरमध्ये मोकळा भात शिजवून तो थोडा कोमट होईल असे बघा.

८. एका पॅनमध्ये तेल घालून ते चांगले गरम होऊद्या. मग त्यात मोहरी, उडीद डाळ आणि हरभरा डाळ घाला. 

९. १ मिनीटासाठी चांगली परतल्यावर यात २ ते ३ लाल मिरच्या, कडीपत्ता आणि दाणे घाला. दाणे लाल होईपर्यंत परता. 

१०. आता यामध्ये मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि मिक्सर केलेला मसाला घाला. 

११. साधारण १ मिनीट हे सगळे परतल्यावर यामध्ये चिंचेचा कोळ घाला आणि हे मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या. 

१२. पॅनवर झाकण ठेवून ६ ते ७ मिनीटे हे सगळे मध्यम आचेवर चांगले शिजवून घ्या. 

१३. मिश्रण सॉससारखे घट्टसर झाल्यावर यामध्ये गूळ घाला आणि पुन्हा १ मिनीटासाठी शिजवून घ्या.

१४. शिजवलेल्या भातामध्ये हा चिचेंचा सॉस घाला आणि भात चांगला कालवून घेवून खायला घ्या.

१५. हा सॉस फ्रिजमध्ये किमान १५ दिवस चांगला टिकतो, त्यामुळे तयार करुन पाहिजे तेव्हा तुम्हा हा चिंचेचा भात खाऊ शकता.   

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.