ब्रेकफास्टला नेहमी तेच तेच करुन आणि खाऊनही कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी छान गरमागरम आणि चविष्ट पदार्थ असेल तर अतिशय आवडीने हा ब्रेकफास्ट केला जातो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे साऊथ इंडियन पदार्थ हेल्दी तर असतातच आणि पोटभरीचेही असतात. त्यामुळे सकाळी एकदा पोटभर खाल्लं की जेवायला थोडं पुढे-मागे झालं तरी चालतं. उतप्पा करायचा तर त्यासाठी पीठ भिजवायला हवं. हे पीठ छान फुगलेलं असेल तर उतप्पा मऊ लुसलुशीत होतो. तसंच त्यासोबत साऊथ इंडियन स्टाईल चटणी असेल तर त्याची मजा आणखी वाढते. हे सगळं परफेक्ट होण्यासाठी नेमकं काय करायचं, पाहूया (South Indian Veg Uthappam and Red Chutney Recipe)...
उतप्पा पीठ भिजवण्यासाठी
१. ३ वाट्या तांदूळ असेल तर १ वाटी उडीद डाळ घ्यायची.
२. १ चमचा मेथीचे दाणे घालायचे म्हणजे पीठ लवकर आंबण्यास मदत होते.
३. हे सगळे स्वच्छ धुवून ४ ते ५ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवायचे.
४. मिक्सरमध्ये बारीक करुन १० ते १२ तासांसाठी पीठ आंबवण्यासाठी ठेवायचे.
५. पौष्टीकता वाढवायची असेल तर यामध्ये अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी हरभरा डाळ घालू शकता.
लाल चटणीची रेसिपी
१. १ कांद्या आणि अर्धा टोमॅटो बारीक कापून घ्यायचे.
२. यामध्ये आलं, मिरची, लसूण घालायचे.
३. जीरं, हरभरा डाळ आणि उडीद डाळ थोडी भाजून घालावी.
४. हळद, मीठ, गूळ आणि चिंचेचा कोळ घालून हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करुन घ्यायचे.
५. फोडणी देण्यासाठी तेलात मोहरी, कडीपत्ता घालायचा आणि फोडणी तडतडली की या मिश्रणावर घालायची.
उतप्पा करण्यासाठी
१. भिजवलेले २ वाट्या पीठ घेऊन त्यामध्ये मीठ, साखर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून हे पीठ एकजीव करावे.
२. उतप्पावर घालण्यासाठी कांदा, टोमॅटो, कोबी, कोथिंबीर आणि आवडत असल्यास मिरची बारीक चिरुन घ्यावी
३. तव्यावर तेल लावून उतप्पा घातला की आवडीनुसार बारीक चिरलेल्या भाज्या घालाव्यात.
४. आवडत असेल तर तिखट, मसाला असे काहीही घालू शकता.
५. उतप्पा दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजून घेऊन चटणीसोबत खायला घ्यावा.