शुभा प्रभू साटम
पावसाळा सुरू झालाय,पाऊस आणि भजी हे समीकरण असतेच. कांदा बटाटा,पालक,मका असे अनेक प्रकार केले जातात, यातलाच एक हटके प्रकार पाहुयात,सोया पनीर/ चीज रोल. वाचूनच मस्त वाटलं ना, पदार्थही मस्त, करायला सोपा आणि चमचमीत. सोया पनीर चीज रोल.
साहित्य
बाजारात सोयाचे दाणे मिळतात ते किंवा सोया चंक्स १ वाटी. तेच आपण भाजीला आणतो तेच.
पनीर/चीज पाव वाटी
आलं लसूण हिरवी मिरची वाटून
आमचूर पावडर
चाट मसाला
मीठ
थोडा मैदा
रवा/ब्रेड क्रम्प/शेवया चुरा
तळायला तेल
आता हे अत्यंत बेसिक साहित्य आहे,आवडीने तुम्ही यात पालक,मका,मेथी,असे घालू शकता. फक्त मिश्रण घट्ट असायला हवे याची काळजी घ्यावी.नाहीतर तळताना रोल फुटू शकतात.
कृती
सोया चंक कोरडे भाजून कोमट पाण्यात दहा मिनिटे भिजवून घ्या. जर बारीक दाणे /चुरा असतील तर नुसते भिजवा.
दहाएक मिनिटांनी व्यवस्थित पिळून काढा,
मोठे चंक असतील तर नीट कुस्करून घ्या.
यात किसलेले चीज /पनीर आणि बाकी सर्व साहित्य घाला.
थोडा मैदा पाण्यात एकत्र करून सरसरीत करून घ्या.
सोया मिश्रणाचे गोळे करून यात बुडवून रवा अथवा अन्य साहित्यात नीट घोळवून घ्या.
कडकडीत तापलेल्या तेलात लालसर होईपर्यंत तळून घ्या.
तुम्हाला जर तळण नको असेल तर शॅलो फ्राय करू शकता,फक्त थोडा वेळ लागतो. शॅलो फ्राय करताना गोळे चपटे ठेवावेत.
सोबत सॉस अथवा मस्टर्डसोबत मस्त लागते. त्यातही बाहेर पाऊस सुरु असेल तर हे रोल खावेत, मस्त चहा प्यावा. सुखी जगावं.
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)