संक्रांतीचा आदली दिवस म्हणजे भोगी. आपल्याकडे प्रत्येक सणाचे विशिष्ट ऋतुनूसार खास महत्त्व असते. थंडीच्या दिवसांत बाजारात भरपूर भाज्या येतात. वर्षभर या भाज्या बाजारात विशेष येत नाहीत. पण या भाज्या शरीराला पोषण देणाऱ्या असल्याने त्या या काळात आवर्जून खायला हव्या. मात्र आपण त्या आवर्जून खातोच असे नाही. म्हणूनच भोगीच्या निमित्ताने बाजारात मिळणाऱ्या या भाज्यांची लेकुरवाळी भाजी आवर्जून केली जाते. त्यासोबत शरीरातील ऊर्जा टिकून राहावी यासाठी बाजरीची तीळ लावलेली भाकरीही या काळात आवर्जून खाल्ली जाते (Special Authentic Menu For Bhogi Makar Sankranti).
थंडीत शरीराचे पोषण होण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी नेहमीपेक्षा पौष्टीक पदार्थ खाल्ले जातात. भाज्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ही भोगीची भाजी काही जण करण्याचा कंटाळा करतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या भाजीसाठी लागणारी तयारी. पण ही तयारी आधीच करुन ठेवलेली असेल तर ही भाजी करणे तितके अवघड नाही. पाहूया ही भाजी झटपट होण्यासाठी आधीच कोणती तयारी करुन ठेवायला हवी .
१. भोगीच्या भाजीला बऱ्याच भाज्या लागतात. या सगळ्या भाज्या २ दिवस आधीच बाजारातून आणून त्या स्वच्छ धुवून ठेवायला हव्यात म्हणजे ऐनवेळी आपली पळापळ होत नाही.
२. ही भाजी करायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यामध्ये भाज्या सोलून, निवडून मग चिराव्या लागतात. त्यामुळे वालाच्या शेंगा, मटार, हरभरा, पावटा, घेवडा यांसारख्या भाज्या आधीच सोलून ठेवलेल्या असतील तर ऐनवेळी भाजी करण्याचे काम सोपे होऊ शकते. २ दिवस आधी भाजी आणलेली असेल तर घरातील सगळे मिळून हे काम केले तर झटपट होऊ शकते.
३. या भाजीला आपण तिळाचा कूट घालतो. पण नुसत्या तिळाने भाजीला दाटसरपणा येत नाही. अशावेळी वाटण केलेले असेल तर भाजी जास्त छान लागते. यासाठी ओलं किंवा सुकं खोबरं, थोडे दाणे, तीळ चांगले भाजून घ्यावेत. त्यामध्ये थोडं जीरं आणि भरपूर कोथिंबीर घालून हे सगळे मिक्सर करुन वाटून ठेवावे. म्हणजे हा मसाला आपण ऐनवेळी भाजीसाठी वापरु शकतो.