जेवणात दाल मखनी म्हणजे शाही मेजवानीच जणू. खरंतर दाल मखनी हा शाजी मेजवानीचाच प्रकार पण या दाल मखनीला आरोग्याचीही एक बाजू आहे. दाल मखनी खाल्ल्याने एक दोन नव्हे तर आरोग्यास 6 फायदे मिळतात. आहारतज्ज्ञ दाल मखनीतील गुणधर्मामुळे ही डाळ आहारात वरचेवर सेवन करण्याचा सल्ला देतात. दाल मखनी पौष्टिक होते ती काळे उडीद, राजमा, मसूर आणि हरभऱ्याच्या डाळींच्या एकत्रित गुणधर्मांमुळे.
Image: Google
दाल मखनी का खावी?
1. दाल मखनीतले काळे उडीद हे हाडांना ताकद देण्याचं काम करतात. काळ्या उडदात लोह, फाॅस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज, काॅपर आणि झिंक हे घटक असतात जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मॅग्नेशियम, फाॅस्फरस आणि कॅल्शियममुळे हाडांना मजबूती देतं. झिंकमुळे हाडांची संरचना व्यवस्थित राखली जाते.
2. युनायटेड स्टेट फूड ॲण्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ( एफडीए)च्या संदर्भानुसार दिवसभरात शरीरास 2000 कॅलरीज आवश्यक असतात. या सूत्रानुसार आहारात कमीत कमी 25 ग्रॅम फायबर आवश्यक असतात. एक कप काळ्या उडदात 15 ग्रॅम फायबर असतात . याबाबत झालेले अनेक अभ्यास सांगतात की टाइप 1 मधुमेह असलेल्यांनी फायबरयुक्त काळ्या उडदाची दाल मखनी खाल्ल्यास रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं. तर ज्यांना टाइप 2 मधुमेह असेल त्यांनी दाल मखनी खाल्ल्यास रक्तातील साखर आणि इंशुलिनचं प्रमाण सामान्य राहातं.
3. तज्ज्ञ सांगतात की काळ्या उडदामुळे कोलेस्टेराॅलचा स्तर खाली येतो. आख्ख्या उडदात ब6, फोलेट, पोटॅशियम आणि फायबर हे गुणधर्म असतात. हे गुणधर्म हदयाचं आरोग्य सुदृढ ठेवतात तसेच रक्तातील कोलेस्टेराॅलचं प्रमाण कमी करतात. यामुळे हदयाशी संबंधित समस्यांचा धोका दुपट्टीनं कमी होतो.
Image: Google
4. अख्ख्या काळ्या उडीदामध्ये सेलेनियम नावाचं खनिज असतं, जे फळं आणि भाज्या यात प्रामुख्यानं नसतं. हा घटक शरीरात कॅन्सर निर्माण करणाऱ्या घटकांना बाहेर टाकतो. शरीरावर सूज , ट्यूमर निर्माण करणाऱ्या ग्रंथींना विरोध करतो. हा घटक कॅन्सरचा धोका कमी करण्यास सहाय्यभूत ठरतो.
5. काळ्या उडदात फायबरचं प्रमाण चांगलं असतं. यामुळे पोट स्वच्छ राहातं. पचन तंत्र सुरळीत होतं.
6. काळे उडीद, राजमा यांनी तयार झालेली दाल मखनी खाल्ल्यास पोट बराच वेळ भरलेलं राहातं. उडीद आणि राजमात फायबरचं प्रमाण चांगलं असतं. फायबरयुक्त पदार्थ कमी खाल्ले तरी पोट लवकर भरतं. जेवणात दाल मखनी खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही. शरीरात जास्तीचे उष्मांक निर्माण होत नाही.
Image: Google
चविष्ट आणि पौष्टिक दाल मखनी कशी करावी?
दाल मखनी करण्यासाठी अर्धा कप अख्खे काळे उडीद, पाव कप राजमा, पाव कप हरभरा डाळ किंवा अख्खे मसूर, छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा, 2 मध्यम आकाराचे टमाटे, 2-3 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, 2-3 चमचे साय, 2 मोठे चमचे साजूक तूप, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा मेथ्या, पाव चमचा हळद, पाव चमचा तिखट, पाव चमचा गरम मसाला, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी.
दाल मखनी करण्यासाठी उडीद, राजमा, हरभरा डाळ/ मसूर धुवून् 8 तास भिजवावेत. 8 तासांनी डाळी पाण्यातून उपसाव्यात. कुकरमध्ये सर्व डाळी, सोडा आणि मीठ घालावं. डाळींच्या तुलनेत दोन ते तीन पट पाणी घालून सर्व जिन्नस नीट शिजवून घ्यावं. तोपर्यंत टमाटे, हिरवी मिरची आणि आलं बारीक चिरुन मिक्सरमधून वाटून घ्यावं. डाळी शिजल्यानंतर कढईत तूप गरम करावं. त्यात हिंग, जिरे, मेथ्यांची फोडणी द्यावी. नंतर त्यात थोडं बारीक किसलेलं किंवा चिरलेलं आलं, हळद, धने पावडर, लाल तिखट घालून परतून घ्यावं. मसाला परतल्यावर त्यात टमाटा, आलं, हिरवी मिरचीची पेस्ट घालावी. ती परतली गेली की त्यात साय घालवून मसाला सारखा परतत राहावा. शिजवलेल्या डाळी आवश्यकता वाटल्यास थोड्या घोटून घ्यावा. नंतर परतलेल्या मसाल्यात डाळींचं मिश्रण घालावं. डाळ जेवढी पातळ, घट्ट हवी त्यानुसार पाणी घालावं. पाणी घातल्यानंतर डाळ 3-4 मिनिटं उकळावी. मिश्रणाला उकळी आली की त्यात गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. दाल मखनी करताना कांदा लसूण घालायचा असल्यास कांदा आणि लसूण बारीक चिरुन किंवा पेस्ट करुन घालावा. गरम मसाल्या ऐवजी फोडणीत मिरे, लवंग, मोठी वेलची आणि दालचिनी यांचा वापर केल्यास दाल मखनी छान लागते.