Join us  

उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी खास वन डिश मिल, डाळ पुलाव! करायला सोपा, चवीला बेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 7:30 PM

रात्रीच्या जेवणात खिचडी, खिचडा खाण्याचा कंटाळा आला असेल तर करा डाळ तांदळाचा 'डाळ पुलाव'..

ठळक मुद्देडाळ पुलावासाठी साहित्य  खूप आणि वेगळं लागत नाही. मात्र हा डाळ पुलाव करण्यासाठी तुरीचीच डाळ लागते हे महत्वाचं.

उन्हाळ्याच्या दिवसात जीव पाणी पाणी करतो. दिवसभरात पाणी, सरबतं पिल्यानं पोट भरलेलं राहातं. रात्री जड, मसालेदार खावंसं वाटत नाही आणि नेहमीचा डाळ खिचडी किंवा डाळ खिचडाचा पर्यायही नकोसा वाटतो. नेहमीचे पर्याय टाळून वेगळं काही करायचं असल्यास डाळ तांदळाचा पुलाव हा उत्तम पर्याय आहे. उत्तम चवीचा, पटकन होणारा हलका फुलका पर्याय असलेला हा डाळ पुलाव करणं अगदीच सोपं.  डाळ पुलावासाठी साहित्यही खूप आणि वेगळं लागत नाही. मात्र हा डाळ पुलाव करण्यासाठी तुरीचीच डाळ लागते हे महत्वाचं.

Image: Google

कसा करायचा डाळ पुलाव?

डाळ पुलाव करण्यासाठी तुरीची डाळ, बासमती तांदूळ, तूप, हिंग, जिरे, मीठ, सुक्या लाल मिरच्या आणि गरम पाणी घ्यावं.. डाळ पुलाव करताना डाळ आणि तांदूळ वेगवेगळे धुवून अर्धा तास भिजत घालावेत. नंतर डाळ आणि तांदळातलं पाणी निथळून घ्यावं. कुकरमध्ये तूप गरम करावं. तूप गरम झालं की तुपाला जिरे, हिंग आणि लाल मिरचीची फोडणी द्यावी. नंतर त्यात डाळ आणि तांदूळ घालून ते चांगले परतून घ्यावेत.

Image: Google

डाळ पुलावात हळद घालण्याची गरज नसते. नंतर डाळ आणि तांदळाच्या प्रमाणापेक्षा थोडं जास्त पाणी गरम करुन घालावं. मिश्रण एकदा चांगल हलवून कुकरला झाकण लावून कुकरला मध्यम आचेवर 3 शिट्या घाव्यात. डाळ आणि तांदूळ आधी भिजवून घेतल्यामुळे जास्त शिट्या घेण्याची गरज नसते. कुकरची वाफ जिरल्यावर पुलावात वरुन साजूक तूप घालावं. हा डाळ पुलाव दही, चटणी, कोशिंबीरीसोबत छान लागतो. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती