आरती नल्लमवार
विदर्भातले पारंपरिक पदार्थ करायला सोपे. कमी साहित्यात असे अफलातून पदार्थ तयार केले जातात की चव जिभेवर कायम रेंगाळावी. विशेषत: उन्हाळ्याच्या सुटीत घरात सगळी लहान लेकरं जमतात. पंगतीत जेवणंही भरपूर जातं तेव्हा भात- पोळ्या-भाकऱ्या आणि सोबत या कढीभेंड्या. इतका चविष्ट बेत. पातेली रिकामी होतात. आणि मन भरत नाही. त्यामुळे नेहमीचेच घटक वापरुन हा खास पारंपरिक पदार्थ करुन पहा. त्याचंच नाव कढीभेंड्या.
(Image : Google)
कढीभेंड्या कशा करतात?
साहित्य:- भेंडी. २-३ लसणाच्या कळ्या, कढीपत्त्याची पानं, छोटा कांदा, तिखट, हिंग, तेल, हळद, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ.साखर.
कढीचं साहित्य- अर्धा लिटर ताक, बेसनपीठ, जिरे
कृती
नेहमीप्रमाणे कांदा परतून भेंडीची भाजी करावी. छान कुरकुरती व्हायला लागली भेंडी की गॅस बंद करावा. नंतर त्यावर थोडी कोथिंबीर घालून भाजी थंड होऊ द्यावी. मग नेहमीप्रमाणे कढी करावी. कढीची चव आंबट-गोड हवी. भाजी आपल्याला हवी तशी तिखट करावी. थोडी जास्त तिखट छान लागते. आता कढी उकळली की त्यात भेंडीची भाजी घालावी. झाली कढीभेंडी तयार. मंद आचेवर एक मिनिट भाजी जरा मुरु द्यावी. जेवताना भाकरी असेल तर फार छान. ठेचा -भात, भाकरी आणि मस्त जेवण. सुख असतं हे उन्हाळ्यात.