Join us  

पदार्थ तळताना लक्षात ठेवा ५ गोष्टी; आहारतज्ज्ञ सांगतात, तेलकट खाण्याचा त्रास होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 10:07 AM

Special Tips For Deep Frying by Rujuta Divekar : एअर फ्रायपेक्षा डीप फ्राय केलेले पदार्थ खाणे केव्हाही जास्त चांगले असे त्या आवर्जून सांगतात.

तळलेल्या पदार्थांमधून शरीरात खूप जास्त प्रमाणात तेल जाते. म्हणून अनेकदा तळलेले पदार्थ खाणे टाळले जाते. मग त्याला पर्याय म्हणजे एअर फ्राय. एअर फ्राय केलेले पदार्थ आपण खातो खरे पण ते खाल्ल्याचे समाधान मिळत नाही आणि खाल्ल्यासारखेही वाटत नाही. प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर सांगतात, डीप फ्राय चांगले की एअर फ्राय हा प्रश्न कायम विचारला जातो. मात्र एअर फ्रायपेक्षा डीप फ्राय केलेले पदार्थ खाणे केव्हाही जास्त चांगले असे त्या आवर्जून सांगतात. मात्र हे पदार्थ योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खायला हवेत. बाहेर पाऊस पडत असताना आपण गरम भजी, वडे, सामोसा असं काही खाल्लं नाही तर आपलं आयुष्य बरबाद आहे असंही त्या म्हणतात (Special Tips For Deep Frying by Rujuta Divekar). 

१. कढईचा आकार

प्रत्येक घरात साधारणपणे ३ आकाराच्या कढई असायलाच हव्यात. एकट्यासाठी काही करायचे असेल तर लहान आकाराची कढई. ३ ते ४ जणांसाठी आवश्यक अशी मध्यम आकाराची कढई आणि ७ ते ८ लोकांसाठी लागेल अशी मोठ्या आकाराची कढई. तसेच यापैकी १ ते २ कढई या लोखंडाच्या असाव्यात. लोखंडी कढईत तयार केलेले पदार्थ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात त्यामुळे यामध्ये पैसे गुंतवणे केव्हाही चांगले. 

२. तेलाचे प्रमाण

आपण कोणतीही गोष्ट तळतो तेव्हा कढईत पुरेशा प्रमाणात तेल घ्यायला हवे. जो पदार्थ तळणार आहोत तो पूर्णपणे या तेलात बुडला जायला हवा. तसेच एखादा पदार्थ तेलात तळत असताना त्याच्या बाजुने बुडबुडे आले की मगच तो पदार्थ उलटा करावा आणि दुसऱ्या बाजूने तळावा. तसेच पदार्थ तळून झाल्यानंतर कढईतून बाहेर काढताना तेल पूर्ण निथळले जाईल याची काळजी घ्यायला हवी. 

३. तळलेले पदार्थ गरमच हवेत

तेलात तळलेले पदार्थ गरम असतानाच सगळ्यात जास्त चांगले लागतात. तसेच हे पदार्थ एका ठराविक प्रमाणात खाल्ले तरच चांगले लागतात. प्रमाणाबाहेर हे तळलेले पदार्थ खायला सुरुवात केली की त्याची टेस्ट उतरते हे लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे टेस्ट एका ठराविक पॉईंटपर्यंत असेल तोपर्यंतच हे तळलेले पदार्थ खायला हवेत. 

४. कोणतं तेल तळण्यासाठी सगळ्यात चांगलं

तुम्ही कोणता पदार्थ करताय आणि कोणत्या प्रदेशात राहता त्यानुसार तुम्हा तळण्यासाठी कोणतं तेल वापरायला हवं हे ठरतं. तुम्ही केरळ साईडला राहत असाल तर खोबरेल तेलात तळावे, पूर्वेकडच्या राज्यांमध्ये राहत असाल तर मोहरीच्या तेलात तळावे. देशाच्या पश्चिमेकडच्या भागात राहत असाल तर शेंगदाण्याच्या तेलात तळलेले केव्हाही चांगले. 

५. तळेलेले तेल पुन्हा वापरावे का?

योग्य आकाराची कढई असेल तर त्यात तेल फारसे उरत नाही. अशा तेलात गरम पाणी घालून ते टाकून द्यावे किंवा झाडांना घालावे. मात्र हे तेल परत वापरणे योग्य नाही. मात्र तूपामध्ये तळत असाल तर हे तूप कणीक भिजवायला किंवा पराठ्यांना लावायला आपण निश्चितच वापरु शकतो. 

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलअन्न