पावसाळ्यात सर्वच गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते. विशेषत: स्वयंपाकघरात डाळी साळींपासून मीठापर्यंत सर्व गोष्टी दमटपणामुळे खराब होणार नाहीत ना हे बघावं लागतं. पावसाळ्यात म्हणूनच बायकांची डोकेदुखी वाढते. बुरशी, किड किंवा ओलसरपणा यामुळे अनेक जिन्नस वाया जातं. मसाल्यांच्या बाबतीतही असंच होतं.
मसाले ही स्वयंपाकघरातली अत्यंत आवश्यक गोष्ट. त्यासाठी खास मसाल्याचा डबा असतो. पण मसाल्याच्या डब्यात असलेल्या वाट्यांमधे एका वेळेस फार मसाला मावत नाही. उरलेला मसाला प्लास्टिकच्या , स्टीलच्या नाहीतर अँल्युमिनिअमच्या डब्यात ठेवला जातो. अनेक मसाले हे खास पदार्थ करतांनाच वापरले जातात. त्यामुळे ते जास्त दिवस पडून राहातात आणि असे मसाले किड किंवा बुरशी यामुळे पावसाळ्यात खराब होतात. मसाले महाग असल्याकारणानं ते वाया गेले की फार मनस्ताप होतो. असा मनस्ताप होवू नये म्हणून पावसाळ्यात मसाल्यांची विशेष काळजी घ्यावी. ही काळजी घ्यायला फार कष्ट करावे लागत नाही आणि मसाले सुरक्षित राहिल्याचं समाधान मिळतं.
छायाचित्र:- गुगल
पावसाळ्यात मसाले जपण्यासाठी काय करावं?
1. मसाले ठेवण्यासाठी प्लास्टिक किंवा स्टीलचा डब्बा वापरला जातो. पावसाळ्यात मसाले प्लास्टिक किंवा स्टीलच्या डब्यात न ठेवता काचेच्या डब्यात ठेवावेत. काचेच्या डब्यात मसाले खराब होत नाही. काचेचा डबा वापरण्यास सोयिस्कर वाटत नसेल तर किमान पावसाळ्यापुरती वापरुन पावसाळा संपला की आपल्या नेहेमीच्या डब्यात मसाले ठेवावेत.
2. पावसाळ्यात आद्र्र वातावरणामुळे मसाले ओलसर होतात. त्यांच्यात गुठळ्या तयार होतात. बुरशी लागते किंवा कीड लागते. त्यामुळेच पावसाळ्यात थोडं कडक ऊन पडलं की मसाल्यांना ऊन दाखवावं. पण मसाले भांड्यात काढून थेट कडक उन्हात ठेवू नये. त्यामुळे मसाल्यांचा रंग आणि स्वाद उडतो. मसाल्याच्या भांड्यावर सुती कपडा झाकून मग मसाले उन्हात ठेवावे. फक्त एक दोन तास उन्हात ठेवले तरी त्यांच्यातला ओलसरपणा निघून जातो. हे मसाले परत हवाबंद डब्यात ठेवून द्यावेत.
3.मसाले खराब होवू नये म्हणून ते हलके गरम करुन घेतले तरी चालतात. यासाठी मसाले थेट गॅसवर भांड ठेवून गरम करु नये. त्यामुळे मसाले जळतात आणि त्यांची चवही जाते. आधी कढई किंवा तवा गॅसवर मंद आचेवर गरम करावा. कढई गरम झाली की मग ती गॅसवरुन खाली उतरवावी. आणि त्यात मसाले टाकून ते हलके गरम होईपर्यंत हलवून घ्यावे. या उपायानेही मसाल्यातला ओलसरपणा निघून जातो आणि मसाल्यांचा स्वाद आणि रंग तसाच रहातो.
छायाचित्र:- गुगल
4. पावसाळ्यात पावडर स्वरुपातले मसाले खराब होतात. यावर उपाय ¸म्हणून पावसाळ्याच्या काळात जास्तीत जास्त खडे मसाले वापरावेत. घरात खडे मसाले आणून ठेवावेत. आणि गरजेनुसार त्याची पावडर करुन ते वापरावेत. गरजे इतकेच वाटल्यामुळे ते खराब होण्याचा प्रश्नच येत नाही.