रोज - रोज भाजीला काय बनवायचे हा प्रत्येक गृहिणीला पडणारा कॉमन प्रश्न आहे. अशावेळी चपाती किंवा पराठ्यांसोबत झटपट बनवून खाता येईल असा पदार्थ म्हणजे भुर्जी. पनीरपासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. जेवणामधे स्टार्टरपासून ते मेनकोर्सपर्यंत सगळ्याच पदार्थांत पनीरचा वापर केला जातो. चावायला त्रासदायक नसणारे, अगदी मऊ असणारे पनीर वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये घोळवून खायला खूपच चविष्ट लागते(Amritsari Paneer Bhurji).
मटार पनीर, पनीर मसाला टिक्का, पनीर कोफ्ता, पनीर लाबाबदार असे पनीरचे अनेक प्रकार आपण आवडीने खातो. याचबरोबर पनीरच्या भुर्जीवर देखील तितक्याच आवडीने ताव मारला जातो. पनीरची भुर्जी अगदी कमी साहित्यात झटपट होणारी अशी डिश आहे. पनीरची भुर्जी आपण चपाती, पराठा किंवा ब्रेडसोबत देखील खाऊ शकतो. ही भुर्जी आपण वेगवेगळ्या (Easy Paneer recipe) स्टाईलने देखील बनवू शकतो. नेहमीची पनीरची भुर्जी करण्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून अमृतसरी स्टाईलने देखील हि भुर्जी बनवू शकतो. ही रेसिपी बनवायला सोपी आणि खायला खूप टेस्टी लागते. जर आपल्याला पनीरची वेगळी रेसिपी ट्राय करायची असेल तर अमृतसरी पनीर भुर्जी बनवून पहा(How to make amritsari paneer bhurji).
साहित्य :-
१. बेसन - २ टेबलस्पून २. कसुरी मेथी - १ टेबलस्पून ३. तेल - गरजेनुसार ४. हळद - १ टेबलस्पून ५. लाल मिरची पावडर - २ टेबलस्पून ६. दही - १ कप ७. धणेपूड - १ टेबलस्पून ८. जिरे पावडर - १ टेबलस्पून ९. चाट मसाला - १ टेबलस्पून १०. पाव भाजी मसाला - १ टेबलस्पून ११. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून १२. मीठ - चवीनुसार १३. पाणी - गरजेनुसार १४. बटर - २ टेबलस्पून १५. जिरे - १ टेबलस्पून१६. लसूण - १ (बारीक चिरलेली)१७. हिरव्या मिरच्या - २१८. कांदा - २ कप (उभा चिरलेला)१९. टोमॅटो - २ कप (उभा चिरलेला)२०. पनीर - ३५० ग्रॅम (बारीक किसून घेतलेले)२१. दूध - १/२ कप २२. कोथिंबीर - २ टेबलस्पून
कृती -
१. एका पॅनमध्ये बेसन आणि कसुरी मेथी ३ ते ५ मिनिटे कोरडी भाजून घ्यावी. त्यानंतर हे मिश्रण एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवावे. आता पॅनमध्ये तेल, हळद, लाल मिरची पावडर घालावी. त्यानंतर या मिश्रणात दही घालून १ ते २ मिनिटे शिजवून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणात बेसन व कसुरी मेथीचे मिश्रण घालून २ ते ३ मिनिटे शिजवून घ्यावे. आता या मिश्रणात धणेपूड, जिरे पावडर, चाट मसाला, पाव भाजी मसाला, काळीमिरी पूड व चवीनुसार मीठ घालून घ्यावे. सगळ्यात शेवटी या तयार ग्रेव्हीमध्ये पाणी घालून बेसनची ग्रेव्ही तयार करून घ्यावी.
२. एका कढईमध्ये, तेल व बटर घेऊन त्यात जिरे, लसूण, हिरव्या मिरच्या घालून फोडणी तयार करून घ्यावी. नंतर त्यात उभा चिरलेला कांदा व टोमॅटो घालून शिजवून घ्यावे. हे मिश्रण व्यवस्थित शिजवून झाल्यावर त्यात बेसनची तयार केलेली ग्रेव्ही घालावी. त्यानंतर त्यात गरजेनुसार थोडे पाणी घालून ग्रेव्ही व्यवस्थित ढवळून घ्यावी.
३. आता या तयार ग्रेव्हीमध्ये कुस्करलेले पनीर घालावे. सगळ्यात शेवटी या भुर्जीमध्ये, दूध, गरम मसाला, काळीमिरी पूड घालावी. नंतर वरुन कोथिंबीर भुरभुरवून भुर्जी खाण्यासाठी सर्व्ह करावी.