कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी अक्षय्य नवमी किंवा आवळे नवमी म्हणून ओळखली जाते. यादिवशी अनेक ठिकाणी आवळी भोजनाचा बेतही आखला जातो. आवळी भोजन म्हणजे आवळ्याच्या झाडाखाली बसून करायचं जेवणं. प्रत्येकीने आपापल्या घरून एखादा पदार्थ आणायचा आणि आवळ्याच्या झाडापाशी जमायचं. सगळ्यात आधी आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आणि त्यानंतर आवळ्याच्या झाडाखाली बसून सहभोजनाचा आनंद घ्यायचा. ही प्रथा आजही महाराष्ट्रात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाळली जाते.
आवळ्याच्या झाडाचीच पूजा का, असा प्रश्न आपल्या मनात येणे अगदी साहजिक आहे. त्यामुळे प्रथेच्या पलिकडे जाऊन या गोष्टीचा थोडा विचार करू या. आवळ्याच्या झाडाचे महत्त्व, त्या झाडाचे आणि आवळ्याचे औषधी गुणधर्म महिलांना कळावेत, हे आवळे खाल्ल्यामुळे होणारे फायदे कळाल्यामुळे महिलांनी आहारात आवळ्याचा वापर करावा, जेणेकरून त्या आणि त्यांचे कुटूंबिय निरोगी राहतील, या भावनेतून आवळे नवमी, आवळे भोजन साजरे करण्याची परंपरा पडली असावी, असा अंदाज अनेक अभ्यासू लोक व्यक्त करतात. ही गोष्ट अगदी बरोबर आहे. आवळा हे फळ अतिशय आरोग्यदायी असून त्याच्या नियमित सेवनामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.
आवळ्याचा मुरंबा, आवळा सुपारी, आवळ्याचा कीस असे अनेक पदार्थ या दिवसांत घरोघरी करण्यात येतात. आता आवळ्याचं चटपटीत लोणचं कसं करायचं ते बघूया. या लोणच्यामुळे जेवणाची रंगत तर वाढतेच, पण त्यासोबतच आरोग्याला अनेक फायदेही होतात. कैरी, लिंबू, मिरची या प्रकारचे लोणचे तर आपण नेहमीच खातो. त्यामुळे आता हे आवळ्याचे लोणचे करून खा. चवीत छान बदल होईल.
करा चिझी ब्रेड पिझ्झा, फक्त १० मिनिटांत! ही घ्या चटपटीत रेसिपी, द्या स्वतःला टेस्टी ट्रीट
आवळ्याचं लोणचं करण्यासाठी लागणारे साहित्य
मोहरी, जिरे, धने, मेथ्या, आवळे, तेल, तिखट, मीठ
आवळ्याचं लोणचं करण्याची रेसिपी
- सगळ्यात आधी मोहरी १ चमचा, १ चमचा जिरं, १ चमचा अख्खे धने एका कढईत घ्या. हे सगळं मध्यम आचेवर २ ते ३ मिनिट भाजून घ्या.
- मोहरी तडतड करायला लागली की गॅस बंद करा.
- यानंतर गरम तव्यावर अर्धा चमचा मेथीचे दाणे घाला आणि एखादा मिनिट छान परतून घ्या. गरम तव्यावर मेथ्या भाजू नका. कारण त्यामुळे त्यांचा कडवटपणा अधिक वाढतो. आता हा मसाला थोडा थंड झाला की मिक्सरमध्ये फिरवून त्याची रवाळ पूड करा. अशाप्रकारे लोणच्याचा मसाला तयार झाला.
- यानंतर एका कढईत पाव कप मोहरीचं तेल घ्या. त्यात एक कप आवळ्याचे तुकडे घाला आणि आवळा पिवळट होईपर्यंत दोन ते तीन मिनिट परतून घ्या. हे सगळे मध्यम आचेवर करा.
- आता गॅस बंद करा आणि आवळ्याच्या फोडी थोड्या थंड होऊ द्या. त्यानंतर त्यात आपण केलेला मसाला घाला. तिखट आणि मीठ चवीनुसार घाला. हे मिश्रण एक ते दिड तास थंड होऊ द्या आणि त्यानंतरच काचेच्या बरणीत भरून ठेवा.
आवळ्याच्या लोणच्याची अशी काळजी घ्या....
- आवळ्याचं लोणचं थंड झाल्यानंतरच काचेच्या बरणीत भरा.
- लोणचं पुर्ण थंड झाल्याशिवाय बरणीचं झाकण लावू नका.
- काचेच्या बरणीत लोणचं भरल्यानंतर ते दोन ते तीन दिवस रूम टेम्परेचरला राहू द्या.
- त्यानंतर बरणी फ्रिजमध्ये ठेवून द्या.
- हे लोणचं फ्रिजमध्ये ठेवल्यास ७- ६ महिने अगदी चांगलं टिकतं.
- बरणीचं झाकणं सैल ठेवणं, लोणच्याला ओले, खरकटे हात लावणं टाळा. असं केल्यास लोणच्यावर लवकरच बुरा येऊ शकतो.