Lokmat Sakhi >Food > अस्सल गावरान ठसक्याचं चमचमीत तेल वांगं खायचं तर ही घ्या झणझणीत कृती !

अस्सल गावरान ठसक्याचं चमचमीत तेल वांगं खायचं तर ही घ्या झणझणीत कृती !

गावच्या लग्नात, रविवारी करायची ही खास वांग्याची भाजी, तेल वांगे नाही तर खारे वांगेही म्हणतात, असा गावरान ठसका की तोंडाला चवच येईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:48 PM2021-07-17T16:48:58+5:302021-07-17T17:02:16+5:30

गावच्या लग्नात, रविवारी करायची ही खास वांग्याची भाजी, तेल वांगे नाही तर खारे वांगेही म्हणतात, असा गावरान ठसका की तोंडाला चवच येईल!

spicy brinjal traditional Maharashtra Brinjal recipe, bharle bange-tel bange | अस्सल गावरान ठसक्याचं चमचमीत तेल वांगं खायचं तर ही घ्या झणझणीत कृती !

अस्सल गावरान ठसक्याचं चमचमीत तेल वांगं खायचं तर ही घ्या झणझणीत कृती !

Highlightsहे वांगे मी तेव्हा प्रथम खाल्ले. मन आधीच तृप्त होते नंतर पोटपण!तेल वांगे छायाचित्र- शुभा प्रभू साटम

शुभा प्रभू साटम

कोणे एके काळी देशावरील लग्नात किंवा तत्सम शुभकार्यात तेल/खारे वांगे भाजी असायलाच हवी, हा अलिखित नियम होता. आता जेहत्ते कालाच्या ठायी तिथे पण पनीर आले महाराजा..पण त्यामुळे वांग्याच्या भाजीची चव कमी नाही झाली बरं. आजही ग्रामीण घरात वांगे बहुमतात असते. बरं कृती एकदम सुटसुटीत, वाटून 
वांग्यात मसाला द्यायचा भरून, आणि शिजवायची. मसाला भाजा हा प्रकार नाही. देशावरील असल्याने शेंगदाणे जास्त. आणि गंमत म्हणजे यात गरम मसाला हवाच असे नाही. तिखट पुरते.
मला कृती सांगितली एका आईबाईने, मी बचत गटांचं काम करायची त्याकाळी. तर ती कृती तिच्या भाषेत  अशी..
"बगा.. बचकभर दाने,(पक्षी शेंगदाणे) भाजायचे, मंग लसुन, मिरच्या, कोथमिर आनी खोबऱ्याचा उलुसा तुकडा, सगळ बैजवार वाटायचं.. पानी न्हाई ,घट हवं. मंग द्याची हळद मीठ त्यात. वांगी चिरून की नई मसाला भरायचा.. भगून्यात त्याल टाकून, कांदा घालून मंग वांगी टाकून शिजवायची..बापये येवून हात धुइस्तो होतात की. मंग भाकऱ्या बडवून थाळ्या मांडायच्या.."
कोपरापर्यंत चुडा भरलेली, ठसठशीत कुंकू लावलेली माय, मला कृती सांगताना, लयीत भाकऱ्या बडवत होती.
हजार पोचे आलेल्या अल्युमिनियमच्या भांड्यात वांगी रटरट शिजत होती, तव्यावर एका मागोमाग एक भाकरी पडून, शेकून बाजूला शिस्तीत उभ्या राहत होत्या.
पूर्ण तादात्म्य पावणे म्हणजे काय हे मी तेव्हा अनुभवले. अन्न शिजताना गंध आणि नाद, यांची आवर्तनं होतात . ते अनुभवायची विचक्षण वृत्ती हवी फक्त. मग ते खोपटे असो अथवा कडप्पा ओटा किंवा चकचकीत किचन!
हे वांगे मी तेव्हा प्रथम खाल्ले. मन आधीच तृप्त होते नंतर पोटपण!
बचत गटासाठी काम करताना मला या माय-मावश्या, अक्का खूप शिकवून गेल्या. मी काय बोंबलायचे, ते त्यांनी कितपत घेतले, ते आता माहीत नाही. पण मी खूप शिकले.
या असंख्य अनामिक अन्नपूर्णाची मी कायम ऋणी आहे.
तर त्या ऋणात राहूनच ही तेल वांग्याची झणझणीत कृती..

 

साहित्य- कृती.


छोटी वांगी
देठ अर्धा कापून चीर देवून मिठाच्या पाण्यात बुडवून
एक छोटा कांदा बारीक चिरून
आले लसूण मिरची कोथिंबीर +सुक्या खोबऱ्याचा एक तुकडा+मूठभर शेंगदाणे सगळे वाटून घ्यायचे. मीठ घालून कालवून ठेवायचे. पाणी नको
तेल फोडणी करून कांदा लाल होईतो. वांग्यात मसाला भरून ती कांद्यात घालून हळद घालून एक वाफ काढायची.
आता बाकीचे उरलेले वाटप घालून ढवळून वाफेवर शिजवायची.
गरम मसाला हवाच असला तर वाटणात घालता येतो.तीळ पण छान लागतात.
झालं तेल वांगं तय्यार!


(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

Web Title: spicy brinjal traditional Maharashtra Brinjal recipe, bharle bange-tel bange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न