वांग्याची भाजी, शेवगा भाजी, शेवभाजी यासारख्या कोणत्याही मसालेदार भाज्या करायच्या असतील तर त्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागतो.. कारण या भाज्यांचा मसाला तयार करण्यात भरपूर वेळ जातो. त्यामुळे अशा मसालेदार भाज्या करण्याचा घाट तेव्हाच घातला जातो, जेव्हा आपल्याकडे भरपूर वेळ असतो.. पण या भाज्यांचा मसाला जर आगोदरपासूनच आपल्याकडे तयार असेल तर मग मसालेदार भाजी बनविणं हा फक्त काही मिनिटांचा खेळ..
म्हणूनच तर तुमच्या घरात हे ३ प्रकारचे मसाले नेहमी तयार ठेवा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा अगदी फटाफट झणझणीत मसाला भाजी बनवा.. केवळ मसाला भाजीसाठीच नाही, तर इतर कोणत्याही भाजीत चव बदल म्हणून तुम्ही हे होम मेड रेडी टू कुक मसाले टाकू शकता.
१. अद्रक आणि लसूण पेस्ट (ginger- garlic paste)
काेणत्याही रस्सा भाजीत, मसालेदार भाजीत अद्रक- लसूण पेस्ट असतेच. ही पेस्ट टाकूनच भाजी करण्याच्या प्रक्रियेचा श्रीगणेशा केला जातो. त्यामुळे जेव्हा वेळ असेल तेव्हा अद्रक आणि लसूण पेस्ट तयार करून ठेवा. या पेस्टमध्ये लिंबू पिळा. ही पेस्ट हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवली तर ती ८ ते १० दिवस चांगली टिकू शकते.
२. सुका मसाला किंवा काळा मसाला (kala or dry masala)
हा मसाला तयार करण्यासाठी कढई गॅसवर गरम करायला ठेवा. जीरे, मीरे, दालचिनी, बडिशेप, मेथ्याचे दाणे, थोडेसे शेंगदाणे, थोडीशी हरबरा डाळ, फुटाणे, थोडेसे तांदूळ, धने, खसखस, कढीपत्त्याची पाने, खोबरं, तीळ, लवंग, विलायची हे सगळं कढईत भाजून घ्या. खोबरं वेगळं आणि सगळ्यात आधी भाजून घ्या. नाहीतर इतर पदार्थांमध्ये ते जळण्याची शक्यता जास्त असते. सगळे पदार्थ भाजून थंड होऊ द्या. त्यानंतर ते मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या. जेवढी बारीक पावडर कराल, तेवढा भाजीला अधिक चांगला फ्लेवर मिळेल. हा सुका मसाला फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही. तो एअरटाईट डब्यात १०- १५ दिवस चांगला टिकू शकतो. त्यासाठी फक्त सगळे पदार्थ चांगले भाजले गेले पाहिजेत
३. रेड ग्रेव्ही (red gravy)
बऱ्याच भाज्यांमध्ये हा हमखास लागणारा मसाला. यासाठी कांदा आणि टोमॅटो १: २ या प्रमाणात घ्या. सगळ्यात आधी कढई तापली की त्यात तेल टाका. तेलात कांद्याची प्युरी परतून घ्या. तेल सुटेपर्यंत कांदा परतला गेला पाहिजे. कांदा चांगला परतला गेला की त्यात टोमॅटो प्युरी टाका. तेल कमी वाटत असेल तर आणखी थोडे टाका. जोपर्यंत कढईपासून मसाला सुटून येत नाही, तोपर्यंत तो चांगला परतून घ्या. या मसाल्यात थोडं मीठ टाका. मसाला थंड झाला की हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा. १० ते १५ दिवस हा मसाला चांगला टिकतो. त्यासाठी मसाला चांगला परतला गेला पाहिजे.