Join us

उकडीचे की तळणीचे असा वाद घालत गोड मोदक भरपूर खाल्ले? यंदा करुन पाहा तिखटाचे चमचमीत मोदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2023 17:54 IST

Spicy Modak Recipe Ganpati Festival : घरात सहज उपलब्ध असणाऱ्याच गोष्टींपासून हे मोदक होत असल्याने त्यासाठी फार काही आणावे लागत नाही.

गणपती-गौरी म्हटलं की मोदक, पेढे-बर्फी, पुरणपोळी आणि सततची पक्वान्न. सुरुवातीचे २ दिवस गोड खायला बरं वाटतं. पण नंतर सतत गोड गोड खाऊन कंटाळा येतो आणि मग झणझणीत, तिखट काहीतरी खावं अशी इच्छा होते. पण बाप्पाला तर मोदकांचाच नैवेद्य दाखवायचा असतो. मग मोदकांनाच थोडा ट्विस्ट दिला आणि तिखटाचे चविष्ट मोदक करायचे ठरवले तर? आता तिखटाचे मोदक कधी असतात का असा प्रश्नही काही जण विचारतील. पण आपल्या आवडीनुसार आपण तळणीच्या मोदाकंमधले सारण तिखट मीठाचे करु शकतो. घरात सहज उपलब्ध असणाऱ्याच गोष्टींपासून हे मोदक होत असल्याने त्यासाठी फार काही वेगळे काही आणावे लागत नाही. पाहूयात तळणीचेच पण तिखटाचे हे मोदक नेमके कसे करायचे (Spicy Modak Recipe Ganpati Festival)...

(Image : Google)

साहित्य -

१. सुकं खोबरं - १ वाटी 

२. दाण्याचा कूट - अर्धी वाटी

३. तीळ - २ चमचे

४. गोडा मसाला - १ चमचा 

५. धने-जीरे पूड - अर्धा चमचा 

६. लाल तिखट - अर्धा चमचा 

७. मीठ - चवीपुरते 

८. बेसन पीठ - अर्धी वाटी

९. गव्हाचे पीठ - २ वाट्या 

१०. तेल - १ वाटी 

कृती - -

१. खोबरं किसून चांगलं परतून घ्या. लालसर होत आलं की एका ताटलीत काढून ठेवा. 

२. याचप्रमाणे बेसन लालसर होईपर्यंत खरपूस भाजून घ्या.

(Image : Google)

३. यामध्ये दाण्याचा कूट आणि तीळ घालून पुन्हा थोडे परतून घ्या आणि त्यात भाजलेले खोबरे घाला. 

४. गॅस बंद करुन या मिश्रणात आपल्या आवडीप्रमाणे गोडा मसाला, तिखट, धने-जीरे पावडर, चवीपुरते मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या. 

५. हे मिश्रण गार होईपर्यंत मोदकांसाठी कणीक मळून घ्या. गव्हाचे पीठ, मीठ, तेल घालून घट्टसर कणीक मळा. (गणपतीच्या नैवेद्याला मीठ चालत नसेल तर मीठ घालू नका.)

६. तळणीच्या मोदकामध्ये आपण ज्याप्रमाणे सारण भरतो त्याचप्रमाणे पुऱ्या लाटून घेऊन त्यामध्ये हे सारण भरा आणि मोदक वळून घ्या.

७. कढईमध्ये तेल चांगले तापले की हे मोदक खरपूस रंगावर तळून घ्या.

८. हे मोदक २ ते ३ दिवस नक्की टिकत असल्याने आणि सतत गोड खायचा कंटाळा आला असेल तर हा मस्त पर्याय आहे.  

टॅग्स :गणेशोत्सवपाककृतीअन्नगणेशोत्सवगणपती