Lokmat Sakhi >Food > चटकदार सळसळीत नूडल्स म्हणजे सुख; पण नूडल्स नेमक्या कोणत्या देशातल्या, शोधल्या कुणी?

चटकदार सळसळीत नूडल्स म्हणजे सुख; पण नूडल्स नेमक्या कोणत्या देशातल्या, शोधल्या कुणी?

नूडल्स ओरपताना गृहित धरलेलंच असतं-- चीनमधून आल्यात. पण हे शोधून काढण्यासाठी जगभरातल्या अभ्यासकांनी (भरल्या पोटी का होईना) कष्ट उपसलेत....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 05:31 PM2021-07-02T17:31:39+5:302021-07-02T17:39:23+5:30

नूडल्स ओरपताना गृहित धरलेलंच असतं-- चीनमधून आल्यात. पण हे शोधून काढण्यासाठी जगभरातल्या अभ्यासकांनी (भरल्या पोटी का होईना) कष्ट उपसलेत....

Spicy noodles are a delight; But in which country did the noodles come from? origin of noodles | चटकदार सळसळीत नूडल्स म्हणजे सुख; पण नूडल्स नेमक्या कोणत्या देशातल्या, शोधल्या कुणी?

चटकदार सळसळीत नूडल्स म्हणजे सुख; पण नूडल्स नेमक्या कोणत्या देशातल्या, शोधल्या कुणी?

Highlightsनूडल्स हा शब्द तेवढा जर्मनीतला. नॉडेल या जर्मन शब्दाचा अर्थ नॉट्स- गाठी.

मेघना सामंत

तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या, सॉसेस घालून परतलेल्या चटकदार असोत, नाहीतर सूपमध्ये न्हायलेल्या सळसळीत-- नूडल्स म्हणजे…सुख सुख म्हणतात ना ! त्या ओरपताना गृहित धरलेलंच असतं-- चीनमधून आल्यात. पण हे शोधून काढण्यासाठी जगभरातल्या अभ्यासकांनी (भरल्या पोटी का होईना) कष्ट उपसलेत....
बऱ्याच दशकांपूर्वी चीन आणि इटलीमध्ये कडाक्याचं भांडण लागलं-- हा पदार्थ आमचाच म्हणून. कारण इटलीचा पास्ता आणि चिनी मियान यांच्या कृतीतलं विलक्षण साम्य. अडीचेक हजार वर्षांपूर्वीचे, पास्ता बनवण्याचे साचेही रोम शहरात उत्खननात मिळालेत. त्यावरून मूळ कृती आपलीच असल्याचा रोमनांचा दावा. काहींचं म्हणणं, युरोपला रेशीम विकणाऱ्या चिनी व्यापाऱ्यांनी इटलीकडून पास्त्याची कृती सोबत नेली, तर काही याउलट म्हणत की इटलीचा धाडसी प्रवासी मार्को पोलोने तेराव्या शतकात चीनकडून नूडल्सचं गुपित हस्तगत केलं.

 

मग अरब या वादात उतरले, म्हणाले, गव्हाच्या पिठाच्या लडी ऊर्फ ‘इट्रिया’; सर्वप्रथम वळल्या गेल्या त्या
अरबस्तानातच. रेशमाच्या व्यापाऱ्यांनी त्या सर्वदूर पोचवल्या, त्यांना चिनी लोकांनी नाव दिलं मियान आणि
इटालियन्सनी पास्ता.
चर्चा तावातावाने सुरू राहिली... पुढे १९९९मध्ये चीनमध्ये लाजिया या गावात उत्खननात, मातीच्या वाटीत
पुराण्या खाद्यपदार्थाचे अवशेष मिळाले. त्यांचं पार रेडियो टेस्टिंग वगैरे झालं. पुरातत्ववेत्ते म्हणाले, चार हजार
वर्षांपूर्वीचे आहेत ते…. हाती वळलेले शेवगाठ्यांसारखे लांबटसर तुकडे, त्यासाठी दोन प्रकारच्या मिलेट्सचं पीठ
एकत्र मळलेलं. आदिम रूपातल्या या नूडल्स सापडताच जनकत्वाच्या वादात चीनची सरशी झाली.
नूडलप्रेमात आकंठ बुडालेल्या जेन लिन-लिऊ या अमेरिकन अभ्यासकर्तीने ऐतिहासिक ‘सिल्क रूट’ने प्रवास करत, ठिकठिकाणी थांबत, शेवयांचे स्थानिक प्रकार चाखत, चीनवरून इटली गाठलं आणि २०१०मध्ये
हा ग्रंथ लिहिला. फार गाजला तो. ती कुण्या एका देशाला श्रेय द्यायला तयार नाही. तिचा निष्कर्ष असा की जगात
विविध ठिकाणी, साधारणपणे एकाच कालखंडात मानवाने शेवया जन्माला घातल्या. पीठ आणि पाणी असे दोनच
आवश्यक घटक आणि सोपी कृती, त्यामुळे भलतीच लोकप्रिय झाली.

नूडल्स एकसमान पडण्यासाठी साचे बनवण्याची कल्पकता, वेगवेगळ्या पिठांचा वापर, पास्त्याच्या आकारांमध्ये आलेली उच्च दर्जाची कलात्मकता, देशोदेशी शेवयांना नटवण्याचे अनंतरंगी प्रकार, हे सगळं नंतरचं. तेव्हा, चाऊमियान, फो, स्पॅघेटी, इडियप्पम, रामेन, रिश्ता, शेवई, स्ट्रिंग हॉपर्स, सोबा, कुरडया, वॉनटॉन, फुझिली हे एकाच कृतीचे अवतार बरं!
नूडल्स हा शब्द तेवढा जर्मनीतला. नॉडेल या जर्मन शब्दाचा अर्थ नॉट्स- गाठी.

(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
 

Web Title: Spicy noodles are a delight; But in which country did the noodles come from? origin of noodles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न