आपल्यापैकी बऱ्याचजणांना जेवणासोबत कच्चा कांदा खायची सवय असते. कित्येक लोकांना तर कांद्याशिवाय जेवणच जातच नाही. जेवताना आपण तोंडी लावण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर करतो. या कोशिंबीरमध्ये कांदा नसेल तर त्या कोशिंबीरीला चवच येत नाही. जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी आपण वेगवगेळ्या प्रकारच्या पदार्थांचा समावेश करतो. यात कोशिंबीर, लोणचं, पापड, मुरांबा, दही, कांदा यांसारख्या असंख्य गोष्टींचा समावेश असतो. जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी आपण कांद्याची फोड तर घेतोच. परंतु हा कांदा नुसता खाण्यापेक्षा जर त्याला चटपटीत किंवा क्रिमी फ्लेवर्ड दिला तर जेवताना चार घास नक्कीच जास्त जातील यात काही शंकाच नाही(Laccha Onion & Fresh Creamy Onion Recipe).
१. स्पायसी ओनियन रिंग्स :-
साहित्य :-
१. मिरची पावडर - १ टेबलस्पून २. चाट मसाला - १ टेबलस्पून ३. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)४. बर्फाचे खडे - ५ ते ७ खडे ५. कांद्याच्या चकत्या - १० ते १२ (गोल आकारांत कापून घेतलेल्या)६. लिंबाचा रस - १ टेबलस्पून ७. सैंधव मीठ - चवीनुसार
कृती :-
१. एका बाऊलमध्ये बर्फाचे खडे घालून मग त्यात कांद्याच्या गोल चकत्या घालून काही काळासाठी भिजत ठेवाव्यात. २. दुसऱ्या बाऊलमध्ये मिरची पावडर, चाट मसाला, कोथिंबीर, सैंधव मीठ, लिंबाचा रस घालून हे मिश्रण एकजीव करावे. ३. आता या मिश्रणात बर्फाच्या पाण्यातून काढलेल्या कांद्याच्या गोल चकत्या घालाव्यात. आपण बनवून घेतलेल्या मिश्रणात कांद्याच्या चकत्या व्यवस्थित घोळवून घ्या.
चटकदार स्पायसी कांदा जेवणासोबत खाण्यासाठी तयार आहे.
२. फ्रेश क्रिमी ओनियन रिंग्स :-
साहित्य :-
१. फ्रेश क्रिम - १ टेबलस्पून २. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून ३. चाट मसाला - १ टेबलस्पून ४. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)५. बर्फाचे खडे - ५ ते ७ खडे ६. कांद्याच्या चकत्या - १० ते १२ (गोल आकारांत कापून घेतलेल्या)
कृती :-
१. एका बाऊलमध्ये बर्फाचे खडे घालून मग त्यात कांद्याच्या गोल चकत्या घालून काही काळासाठी भिजत ठेवाव्यात. २. दुसऱ्या बाऊलमध्ये फ्रेश क्रिम, काळीमिरी पूड, चाट मसाला, कोथिंबीर घालून हे मिश्रण एकजीव करावे.३. आता या मिश्रणात बर्फाच्या पाण्यातून काढलेल्या कांद्याच्या गोल चकत्या घालाव्यात. आपण बनवून घेतलेल्या मिश्रणात कांद्याच्या चकत्या व्यवस्थित घोळवून घ्या.
फ्रेश क्रिमी ओनियन जेवणासोबत खाण्यासाठी तयार आहे.