संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत खाऊ लागतोच. रोजच विकतचा चिवडा, चिप्स, बिस्किटं खाऊन कंटाळा आला असेल तर घरच्याघरी चटपटीत खाऊ तयार करु शकतो. हरभरा, मसूर आणि मुगाच्या डाळीपासून घरच्याघरी चिप्स तयार करता येतात. हे चिप्स बटाटा आणि केळाच्या वेफर्सपेक्षाही भारी लागतात. डाळींपासून तयार केलेले असल्यामुळे पौष्टिकही ठरतात. हा चटपटीत खाऊ करणं अगदी सोपं आहे. थोडा जास्त केला तर दोन तीन दिवसांच्या चहाच्या खाऊची व्यवस्था होवू शकते.
Image: Google
हरभऱ्याच्या डाळीचे चिप्स
हरभऱ्याच्या डाळीचे चिप्स करण्यासाठी 1 कप हरभरा डाळ, 2 चमचे रवा, 2 चमचे गव्हाचं पीठ, चिमूटभर बेकिंग सोडा, 1 चमचा चाट मसाला, 1 चमका काळी मिरी पूड, अर्धा चमचा लाल तिखट, 2 कप तेल आणि चवीनुसार मीठ घ्यावं.
Image: Google
हरभऱ्याची डाळ 3 तास पाण्यात भिजत घालावी. रात्रभर भिजत घातली तरीही चालते. डाळ पाण्यातून उपसून मिक्सरमध्ये घालून बारीक वाटूज घ्यावी. वाटलेल्या डाळीत रवा आणि गव्हाचं पीठ घालावं. मिश्रण चांगलं मळून घ्यावं. मिश्रणाच्या छोट्या छोट्या लाट्या कराव्यात. त्या लाटून चिप्स आकारात कापून घ्यावेत. चिप्स मेकरमध्येही चिप्स तयार करता येतात. कढईत तेल घालावं. त्यात चिप्स सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.
Image: Google
मसूर डाळीचे चिप्स
मसूर डाळीचे चिप्स करण्यासाठी 1 कप मसुराची डाळ, 1 चमचा चाट मसाला, अर्धा कप गव्हाचं पीठ, 2 चमचे रवा , चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा मसाला, चिमूटभर बेकिंग सोडा आणि 1 कप तेल घ्यावं.
Image: Google
दोन लिटर पाण्यात मसूर डाळ भिजत घालावी. 3-4 तास भिजवावी. डाळीतलं पाणी काढून ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. वाटलेलं डाळीचं मिश्रण एका भांड्यात काढावं. त्यात गव्हाचं पीठ, रवा, बेकिंग सोडा, लाल तिखट, काळा मसाला, मीठ घालून मिश्रण चांगलं मळून् घ्यावं. मिश्रणाच्या छोट्या छोट्या लाट्या करुन त्या लाटाव्यात. लाटलेल्या पोळ्या चिप्सच्या आकारात कापाव्यात. कढईत तेल तापवून चिप्स खमंग तळून घ्यावेत.
Image: Google
मुगाच्या डाळीचे चिप्स
मुगाच्या डाळीचे चिप्स करण्यासाठी 1 कप मुगाची डाळ, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा कप गव्हाचं पीठ, 2 चमचे रवा, चवीनुसार मीठ आणि 1 कप तेल घ्यावं.
Image: Google
मुगाची डाळ एक दिवस पाण्यात भिजवावी. दुसऱ्या दिवशी डाळीतलं पाणी उपसून टाकावं. डाळ मिक्सरमधून बारीक वाटावी. वाटलेल्या डाळीत लाल तिखट, काळा मसाला, मीठ घालून मिश्रण मळून घ्यावं. मिश्रणाच्या छोट्या लाट्या करुन लाटून पोळीचे चिप्स कापावेत. कढईत तेल गरम करुन त्यात चिप्स तळून काढावेत.