थंडीच्या दिवसांत बाजारात भरपूर भाज्या येतात. स्वस्तात मस्त मिळणाऱ्या या भाज्यांचे दरही कमी असतात. सतत भाजी-पोळी, सूप, पराठे आणि गाजराचा हलवा यांसारखे पदार्थ तर आपण खातोच, पण त्यापेक्षा थोडं वेगळं आणि तोंडाला चव आणणारं काही ताटात असेल तर जेवणाची लज्जत नक्कीच वाढेल. गाजर, मटार, फ्ल़ॉवर यांसारख्या भाज्या बारीक चिरून केले जाणारे हे लोणचे (Mix Vegetable Pickle ) असले की की एखादी नावडती भाजीही आपण सहज खाऊ शकतो. झटपट होणारे हे लोणचे करायला जितके सोपे तितकेत खायला चविष्ट लागते. सध्या कोरोनाची साथ, इतर संसर्गजन्य आजारांची साथ यांमध्ये घरोघरी अनेक जण आजारी असताना दिसत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यं अनेकांना तोंडाला चव नाही ही तक्रार आहे. अशात हलका आणि मोजकाच आहार घेतला जातो. त्यामुळे आजारपणात आणि एरवीही तोंडाला चव येण्यासाठी कोणालाही चालू शकेल असे हे हेल्दी लोणचे नक्की ट्राय करा....
साहित्य -
फ्लॉवर - पाव किलो
मटार - अर्धा किलो
गाजर - पाव किलो
तेल - २ चमचे
मोहरी, हिंग, हळद - फोडणीपुरते
मीठ - १ चमचा
साखर किंवा गूळ - १ चमचा
तिखट - अर्धा चमचा
मोहरी पावडर - १ चमचा
कृती
१. फ्लॉवर आणि गाजर या भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्या, मटार सोलून दाणे पाण्याने धुवून घ्या.
२. भाज्यांमध्ये मीठ, तिखट, गुळ किंवा साखर घालून ठेवा.
३. दुसरीकडे कढईत फोडणी करा आणि त्यात मोहरी घाला. ती तडतडली की हिंग आणि हळद घालून त्यात मोहरीची पूड घाला.
४. फोडणी चांगली झाली की गरमच भाज्यांच्या मिश्रणावर घाला.
५. हे सगळे मिश्रण एकजीव करा आणि जेवणासोबत खायला घ्या. या भाज्या कच्च्या असल्या तरी फोडणीमुळे त्यावर संस्कार होतात.
६. हे लोणचे थंडीच्या दिवसांत बाहेरही १५ दिवसांपर्यंत चांगले टिकते. त्यामुळे ताजे असतानाच तुम्ही हे लोणचे खाऊ शकता.
७. तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. त्याशिवाय मिरची, लसूण, आलं, आवळा यांचे मोठे काप करुन तेही घालू शकता.