स्वयंपाकघरात भाज्यांमधे कशाला महत्त्व असेल तर ते आहे कांद्याला. भाजी कोरडी असो की रश्याची, नाश्त्याला पोहे असो की उपमा, कोशिंबीर रायता यासाठी कांदा लागतोच. शिवाय घरात कुठलीच भाजी नसेल तर कांद्याची शेंगदाणा कूट घालून केलेली चालू चालू चटणीही गावरान बेत ठरतो. तर अचानक आणि थोड्या वेळासाठी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कांदा भजी आणि चहाने केला जातो.
Image: Google
कांदे घरात असायलाच पाहिजे हे खरं. पण कांदा घरात साठवण्याचीही पध्दत आहे, याकडे मात्र बहुतेकदा दुर्लक्ष होतं. कांदे बटाटे या भाज्या सारख्या लागतात म्हणून जास्तच आणल्या जातात. पण त्या योग्य पध्दतीने साठवल्या नाहीत तर त्यांना कोंब फुटतात. कांद्यांना कोंब फुटले की कांदा आतून सुकल्यासारखा होतो आणि मग तो टाकून द्यावा लागतो. कांद्यांचे भाव बघता कोंब फुटून कांदे वाया घालवणं परवडणारं नाही. त्यापेक्षा कांदे कसे ठेवले म्हणजे त्यांना कोंब फुटणार नाही हे समजून घेणं महत्त्वाचं.
Image: Google
कांद्यांना कोंब फुटू नये म्हणून..
1. कांदे जर बटाटे, लसूण, आलं किंवा इतर भाज्यांसोबत एकत्र ठेवणं ही चूक आहे. कारण अनेक भाज्यांमधे इथायलिन नावाचं रसायन असतं. या रसायनामुळे कांद्यांना कोंब फुटतात. त्यामुळे कांदे स्वतंत्र ठेवावेत. ते भाज्या किंवा फळं यांच्यात मिक्स करुन ठेवू नयेत.
2. पेपरमधे कांदे गुंडाळून ठेवल्यास कांद्यांना कोंब लवकर फुटत नाही. यासाठी कांदे बाजारातून आणले की ते वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून ठेवावेत. किंवा वर्तमानपत्राच्या कागदाच्या पिशव्या तयार करुन त्यात कांदे ठेवावेत. पेपरमधे कांदे गुंडाळून ठेवणार असाल तर थंड ठिकाणी ठेवावेत. ओट्याच्या/ गॅसच्या अगदी जवळ ठेवले तर उष्णतेने कांद्यांना मोड येतात.
3. कांदे हे कधीही फ्रिजमधे ठेवू नयेत. कारण फ्रिजमध्ये ठेवलेल्या इतर जिन्नसांचा वास कांद्याला लागतो आणि कांद्याला कोंब फुटू लागतात. तसेच कांदा फ्रिजमधे ठेवल्याने कांद्यात असलेल्या साखरेच्या पातळीत वाढ होते यामुळेही कांद्याना फ्रिजमधे ठेवल्यास कोंब फुटतात.
Image: Google
4. कांदे बाजारातून आणतांना प्लॅस्टिकच्या पिशवीत आणले असतील तर अनेकजण ते पिशवीतून बाहेरही काढून ठेवत नाही. प्लॅस्टिकच्या पिशवीत कांदे ठेवल्यास ते लवकर गरम् होतात आणि त्यांना कोंब फुटतात.
5. कांद्यांना कोंब फुटू नये म्हणून कांदे सूती कापडात गुंडाळून ठेवले तरी चालतात.