आहारशास्त्र, स्वयंपाकविज्ञान सांगतं, की कोणतंही कडधान्यं हे नुसतं भिजवून खाऊ नये. मोड आलेली कडधान्यं आहारात असणं हे पोषणाच्या दृष्टिकोनातून योग्य असतात. बहुतांश घरात मोड आलेल्या कडधान्यांची सुकी किंवा रस्सेदार ऊसळ केली जाते. तसेच मोड आलेल्या कडधान्याची कोशिंबीर, भरलेले पराठे, डोसेही केले जातात. मोड आलेल्या कडधान्याची कोणतीही पाककृती ही पौष्टिक असते. पण मोड आलेल्या उसळी म्हटल्या, की मूग, मठ, मसूर एवढ्याच उसळी माहिती असताता. पण मोड आलेल्या गव्हाची देखील उसळ करतात. किंबहुना मोड आलेले गहू खाणं आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर असतं. गहू केवळ पोळीच्या स्वरुपात नाही तर गव्हाला मोड आणून मोड आलेल्या गव्हाचेही वेगवेगळे पौष्टिक पदार्थ करता येतात. वजन कमी करण्यापासून शरीराला पोषण देण्यापर्यंत आणि पचनक्रिया सुधारण्यापासून हाडं मजबूत होण्यापर्यत मोड आलेले गहू खाण्याचे अनेक फायदे होतात.
Image: Google
मोड आलेल्या गव्हाचं महत्त्व
1. मोड आलेल्या गव्हात फायबर, प्रथिनं, कॅल्शियम, जीवनसत्त्वं, खनिजं आणि इतर पोषक घटकही असतात. मोड आलेले गहू आहारात असल्यानं या सर्व पोषक घटकांचा फायदा शरीरास मिळतो.
2. गव्हात असलेल्या ग्लुटेनमुळे गव्हाची पोळी पचण्याची समस्या अनेकांना असते. गव्हाची पोळी , पराठे पचत नसतील त्यांनी आपल्या आहारात मोड आलेल्या गव्हाचा समावेश करावा. मोड आलेल्या गव्हात फायबर, ॲण्टिऑक्सिडण्टस, अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वं हे घटक असतात. या घटकांमुळे पचन सुलभ होण्यास मदत होते.
3. मोड आलेले गहू आहारात असल्याने चयापचय क्रिया सुधारते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी मोड आलेले गहू आहारात असल्यास फायदा होतो.
4. थंडीत हाडं दुखतात, हाडांची दुखणी उद्भवतात. त्यामुळे हिवळ्यात तर मोड आलेले गहू, मोड आलेल्या गव्हाचे पदार्थ खायलाच हवेत. कारण यातून हाडांन आवश्यक असलेलं कॅल्शियम मिळतं. शरीरातील कॅल्शियमची कमतरता कमी करुन हाडं मजबूत ठेवण्यासाठी मोड आलेल्या गव्हाचं सेवन फायदेशीर ठरतं.
Image: Google
5. थायराॅइडसंबंधी आजारात मोड आलेल्या गव्हाचा फायदा होतो. मोड आलेले गहू खाल्ल्याने हायपर थायराॅइड आणि हायपो थायराॅइड या दोन्ही समस्यांवर आराम मिळण्याचा फायदा होतो.
6. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचं काम मोड आलेल्या गव्हातील गुणधर्म करतात. त्यामुळे मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी किंवा मधुमेह असणाऱ्यांनी मोड आलेले गहू अवश्य खायला हवेत असं आरोग्य तज्ज्ञ म्हणतात.
7. मोड आलेल्या गव्हाच्या सेवनामुळे त्वचा आणि केस चमकदार होतात. केसांचं पोषण होवून केस लांब होण्यास मदत होते.
Image: Google
मोड आलेल्या गव्हाचे पदार्थ
मोड आलेले गहू खाणं हे फायदेशीर असतं, पण ते खायचे कसे, मोड आलेल्या गव्हाचे कोणते पदार्थ करतात याबद्दल फारशी माहिती नसते. पण मोड आलेल्या गव्हापासून सॅलेडपासून खीरपर्यंत आणि उसळीपासून डोशापर्यत अनेक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ करता येतात. मोड आलेल्या गव्हाचे पदार्थ कोणते याबद्दल जाणून घेण्याआधी गव्हाला मोड कसे आणायचे हे देखील माहित असणं महत्त्वाचं आहे.
Image: Google
गव्हाला मोड कसे आणावेत?
गव्हाला मोड आणण्यासाठी आपल्या हवे तितके गहू घ्यावेत. ते नीट निवडून पाण्यात धुवून घ्यावेत. गहू पाण्यात व्यवस्थित भिजतील एवढं पाणी घालून गहू भिजवावेत. 12 तास गहू पाण्यात भिजवले की पाणी उपसून घ्यावं. हे गहू दोन तीन पाण्यात धुवून् घ्यावेत. स्वच्छ सुती कापडात बांधून ऊबदार ठिकाणी ठेवावेत. तीन दिवसात आपल्या हवे तसे मोड गव्हाला येतात. फक्त रोज दिवसातून एकदा गहू बांधलेल्या कापडावर थोडं पाणी शिंपडावं. तीन दिवसांनी मोड आलेले गहू कपड्यातून मोकळे करुन भांड्यात काढून ठेवावेत. फ्रिजमधे मोड आलेले गहू चांगले आठवडाभर टिकतात.
Image: Google
मोड आलेल्या गव्हाची खीर
मोड आलेल्या गव्हाची खीर करण्यासाठी एक वाटी मोड आलेले गहू घ्यावेत. हे गहू मिक्सरमधून ओबडधोबड वाटून त्याची भरड काढून घ्यावी. कढईत दोन मोठे चमचे साजूक तूप घ्यावं. ते गरम करुन ही भरड तुपात छान परतून घ्यावी. भरड परतली गेली की, त्यात 4 कप आधी गरम करुन कोमट केलेलं दूध घालावं. ही भरड दुधात शिजवून घ्यावी. भरड शिजली की त्यात दोन वाटी किसलेला गूळ घालावा. गूळ चांगला विरघळला की गॅस बंद करुन खीरीमधे वेलची पूड आणि जायफळ पावडर घालावी.
Image: Google
मोड आलेल्या गव्हाची उसळ
मोड आलेल्या गव्हाची उसळ करण्यासाठी 3-4 वाट्या मोड आलेले गहू, एक मोठा कांदा बारीक चिरलेली, 1 मोठा चमचा काळा मसाला, 3-4 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, गूळ, अर्धा वाटी ओल्या नारळाचा चव, एक चमचा जिरे, एक चमचा लसणाची पेस्ट, मूठभर चिरलेली कोथिंबीर, थोडी चिंच किंवा आमसूल, फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद आणि चिमूटभर हिंग एवढं साहित्य घ्यावं.
उसळ करताना प्रेशर कुकरधे आधी तेल घालावं. तेल तापल्यावर त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की जिरे घालावेत. नंतर हळद आणि हिंग घालून फोडणी परतावी. फोडणीत नंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबीसर परतून घ्यावा. कांद परतला गेला की आवडत असल्यास दोन चमचे तिखट नाहीतर हिरव्या मिरच्यांचं वाटणं घालावं. आलं लसणाची पेस्ट घालून ती परतून घ्यावी. मग मोड आलेले गहू पाण्यातून धूवून फोडणीत टाकावेत. ते चांगले परतून घ्यावेत. मीठ घालून गहू पुन्हा नीट हलवून घ्यावेत. मग दोन कप गरम पाणी घालून कुकरला झाकण लावा. कुकरला वाफ धरली की लगेच गॅसची आच मंद करावी आणि उसळ 10 -12 मिनिटं शिजवावी. नंतर गॅस बंद करुन वाफ गेली की कुकरचं झाकण उघडावं. पुन्हा कुकरखाली गॅस लावून त्यात चिंचेचा कोळ आणि गूळ घालावा. उसळीत जास्त पाणी वाटत असेल तर पाणी थोडं आटवून घ्यावं. उसळीत वरुन गोडा मसाला किंवा काळा मसाला घातला तरी चालतो.. सर्वात शेवटी उसळीवर किसलेलं ओलं नारळ घालावं आणि थोडा लिंबाचा रस पिळावा. वरुन कोथिंबीर पेरुन उसळ पुन्हा थोडा वेळ गॅस बंद करुन झाकून ठेवावी . ही उसळ चविष्ट लागते आणि आरोग्यासाठी पौष्टिक ठरते. दुपारच्या/ संध्याकाळच्या जेवणात किंवा सकाळच्या नाश्त्याला गव्हाची मोड आलेली उसळ हा उत्तम पर्याय आहे.
Image: Google
गव्हाचं आंबिल
ज्वारीचं ताकातल आंबिल करण्याची पध्दत आहे. त्याचप्रमाणे मोड आलेल्या गव्हाचं आंबिलही करतात. हा गोड पदार्थ चव आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून उत्तम आहे.
मोड आलेल्या गव्हाचं आंबिल करताना अर्धा कप मोड आलेले गहू , 1 कप गूळ, 1 कप नारळाचं घट्ट दूध, अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा कीस, 2 मोठे चमचे साजूक तूप, पाव कप सुकामेवा, थोडं मीठ, अर्धा कप दूध पावडर आणि 1 छोटा चमचा वेलची पावडर एवढं साहित्य घ्यावं.
मोड आलेल्या गव्हाचं आंबिल करताना कढई गॅसवर ठेवावी. त्यात दोन चमचे तूप घालून् ते गरम करावं. तूप गरम झालं की तुपात मोड आलेले गहू लालसर भाजून घ्यावेत. गहू लालसर भाजल्यानंतर ते थंड होवू द्यावेत. थंड झालेले गहू मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावेत. पुन्हा कढई गॅसवर ठेवून त्यात एक चमचा तूप घालावं. तुपात चार कप पाणी घालावं. त्यात बारीक केलेला गूळ घालून तो चांगला ढवळून घ्यावा. गूळ पाण्यात विरघळला की त्यात मिक्सरमधून काढलेला जाडसर गहू घालावा. मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. गहू शिजू द्यावा. गहू अर्धवट शिजला की त्यामधे खोबऱ्याचा किस थोडा लालसर भाजून घालावा. खोबऱ्याचा किस त्यात नीट मिसळला गेला की नारळाचं दूध घालावं. गहू चांगला शिजेपर्यंत मिश्रण मंद आचेवर ढवळत राहावं. आंबील पातळ हवी असल्यास त्यात थोडं आणखी नारळाचं दूध किंवा थोडं गरम पाणी घालावं. आणि आंबील खूप पातळ वाटत असल्यास त्यात थोडी दुधाची पावडर घालावी. सर्वात शेवटी वेलची पूड घालून आंबिल हलवून घ्यावं आणि गॅस बंद करावा. गरम आंबिल वरुन तूप घालून खाल्ल्यास छान लागते आणि शरीरास पौष्टिक ठरते.
या तीन प्रकारासोबतच मोड आलेल्या गव्हाचे सारणाचे पराठे, मोड आलेले गहू उकडून त्याची चटपटीत कोशिंबीर, मोड आलेल्या गव्हाचे डोसे तसेच मोड आलेल्या गव्हाचं पीठ तयार करुन त्याची आयत्या वेळी लापशी हे पदार्थही करता येतात.