Join us  

पावसाळ्यात सारखे पोट बिघडते, अपचन होते ? मग काय खायचं आणि काय टाळायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 3:00 PM

पावसाळा म्हणजे आजारी पडण्याचे दिवस. खाण्यात काही कमी- जास्त झालं, पाण्यात बदल झाला, पावसात भिजणं झालं की पडलो आजारी. असे वारंवार आजारी पडणे टाळायचे असेल आणि फिट ॲण्ड फाईन राहून पावसाचा आनंद लुटायचा असेल, तर मात्र काही गोष्टी नक्कीच जाणून घ्यायला पाहिजेत.

ठळक मुद्देपावसाळ्यात आहाराबरोबरच व्यायामाकडेही लक्ष दिले पाहिजे. योगासन, प्राणायाम नियमितपणे केले पाहिजे.

डॉ. पद्मा जगदिश तोष्णीवाल(बीएएमएस, डी. एन. एच. ई.)

आता पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. अतिउष्णतेमुळे उन्हाळ्यात शरीरामध्ये वात दोषाचा संचय होत असतो. पावसाळ्यात वातावरण थंड होत असल्याने शरीरात साचलेला वातदोष वाढतो आणि अंगदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी यासारख्या विकारांना बळ देतो. हाच वात पित्तदोषाच्या संयोगाने ॲसिडिटी, अजिर्ण होणे यासारखे विकार उत्पन्न करतो. पावसाळ्यात जठराग्नी मंद होतो. त्यामुळे पचनशक्तीही कमी झालेली असते. म्हणूनच पावसाळ्यात आहार- विहार व आरोग्याची काळजी घेणे, खूप आवश्यक आहे. 

 

पावसाळ्यातील आहार कसा असावापावसाळ्यात पचनशक्ती कमी झालेली असल्याने हलके अन्न घ्यावे. जुने गहू, जुने तांदूळ, भाकरी, लाह्या, दुधभात यांचा वापर करावा. हिंग, मिरी, अद्रक, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना हे सर्व घटक अन्न पचायला मदत करणारे आहेत. 

 

आहारात असणारे मोजकेच तेल वातदोष कमी करणारे ठरते. साजूक तुपामुळे वात व पित्त दोन्ही कमी होते. तेलात असणाऱ्या काही घटकांमुळे पित्त वाढत असते. त्यामुळे तेलात तळलेले पदार्थ पावसाळ्यात खाणे हानिकारक असते. म्हणूनच बटाटेवडे, भजी यासारखे चटपटीत पदार्थ पावसाळ्यात खूप खावे वाटले, तरी  अगदी क्वचितच आणि ते ही मर्यादितच खावेत

 दह्यामुळे जठराग्नी मंदावतो. त्यामुळे दही न खाता ताज्या दह्याचे घुसळलेले ताक, दह्याच्या वरचे पाणी दुपारच्या जेवणानंतर नियमित घ्यावे. यामुळे पचनशक्ती सुधारते. 

 

 पावसाळ्यात माठाची भाजी खाणे योग्य असते. याशिवाय दुधी, दोडका, पडवळ, भेंडी अशा वातशामक भाज्या पावसाळ्यात अधिक प्रमाणात घ्याव्यात. मोड आलेले मुग, मटकी, चवळी यांच्या उसळींचा वापर नाश्त्यासाठी करावा. 

 

आवळा, लिंबू यांची सरबते घेणे पावसाळ्यात उत्तम आहे.  मांसाहारी व्यक्तींनी पावसाळ्यात मांसाहारी पदार्थ खाण्यापेक्षा त्याचे सूप पिण्यास प्राधान्य द्यावे. 

( लेखिका डॉ. पद्मा जगदिश तोष्णीवाल औरंगाबाद येथे आहार मार्गदर्शक आहेत.) 

 

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्सपाऊस