Join us  

पोपटी हिरव्या मिरच्यांची भरवा भजी, मस्त थंडीत हा चटकदार बेत करा.. पाहा रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2023 3:22 PM

Stuffed Mirchi Recipe : भजीच्या इतर प्रकारांसोबतच, मिरचीची भजी खाणे देखील अनेक लोकांना आवडते.

थंडीत गरमागरम भजी खायला कुणाला नाही आवडणार. भजी म्हटलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांचा तो वीक पॉईंट असतो. हिवाळा आणि पावसाळा हे दोन ऋतू असे आहेत की, ज्याचा आनंद भजी खाल्ल्याशिवाय अपूर्णच राहतो. पावसाळ्यात आपण मोजक्याच प्रकारच्या भजी खाऊ शकतो पण हिवाळ्यात मात्र विविध प्रकारच्या भज्यांचा आपल्याला आस्वाद घेण्याची संधी असते. गरमागरम, कुरकुरीत, खमंग भजी पाहिली किंवा त्यांचा सुगंध जरी आला तरी आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.

गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा यासारखं सुख देणारं दुसरं कोणतं समीकरण असूच शकत नाही. कांदा भजी व बटाटा भजी हे प्रकार तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. पण भज्यांमध्येही असे काही प्रकार आढळतात जे बनवायला सोपे आणि अतिशय चविष्ट असतात. या सर्व प्रकारच्या भज्या हिरवी चटणी किंवा सॉससोबत खाल्ल्या जाऊ शकतात. कांदा भजी, बटाटा भजी, मेथी भजी, पालक भजी अशा वेगवेगळ्या भज्या आपण खाल्ल्या असतील मिरचीची भजी खाणे देखील अनेक लोकांना आवडते. मिरचीची भजी बनवण्याचे साहित्य व कृती समजून घेऊयात(Stuffed Mirchi Recipe). साहित्य :- 

१. मेथी दाणे - १ टेबलस्पून २. जिरे - १ टेबलस्पून ३. ओवा - १ टेबलस्पून ४. बेसन - ५ टेबलस्पून ५. सुक खोबर - १ टेबलस्पून (बारीक किसून घेतलेलं)६. ओल खोबर - १ टेबलस्पून (बारीक किसून घेतलेलं)७. धणे पावडर - १ टेबलस्पून८. हिंग - १/२ टेबलस्पून ९. हळद - १ टेबलस्पून१०. मीठ -  चवीनुसार ११. पाणी - गरजेनुसार १२. तेल - ५ ते ८ टेबलस्पून (मिरच्या तळण्यासाठी)१३. हिरव्या मोठ्या मिरच्या - ६ ते ८ (भजीसाठीच्या मोठ्या मिरच्या)

me_haay_foodie या इंस्टाग्राम पेजवरून मिरचीची भजी कशी बनवायची याचे साहित्य व कृती समजून घेऊयात. 

कृती :- 

१. भजीसाठी वापरल्या जाणाऱ्या हिरव्या मोठ्या मिरच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. २. त्यानंतर या मिरच्यांना बरोबर मधोमध सुरीने उभी चीर पाडून घ्यावी. ३. चमच्याच्या मदतीने या मिरच्यांमधील बिया काढून घ्याव्यात. ४. गरम तव्यावर मेथी दाणे, ओवा, जिरे २ मिनिटे भाजून घ्यावेत. ५. नंतर मेथी दाणे, ओवा, जिरे हे खलबत्त्यात कुटून त्याची जाडसर पूड करून घ्यावी. 

६. गरम तव्यावर बेसन २ ते ४ मिनिटे भाजून घ्यावे. ७. एक मोठा बाऊल घेऊन त्यात भाजून घेतलेलं बेसन, सुक खोबर, ओल खोबर, धणे पावडर, तसेच मेथी दाणे, ओवा, जिरे यांची जाडसर करून घेतलेली  पूड, हिंग, हळद, मीठ घालून त्यात चमचाभर पाणी घालून मिरचील स्टफिंग तयार करून घ्यावे. ८. हे स्टफिंग मिरच्यांमध्ये भरून घ्यावे. ९. एका भांड्यात बेसन पीठ घेऊन त्यात मीठ, पाणी घालून भज्यांसाठी आपण जसे पीठ भिजवून घेतो त्याच कन्सिस्टंसीचे पीठ तयार करून घ्यावेत. १०. आता या स्टफ केलेल्या मिरच्या बेसन पिठामध्ये घोळवून बेसन पीठाने व्यावस्थित कोट करून घ्याव्यात. ११. एका कढईत तेल तापवून गरम तेलात या मिरच्या सोडाव्यात. या मिरच्या खमंग, खरपूस तळून घ्याव्यात.

टॅग्स :अन्नपाककृती