आता गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी भरपूर पदार्थांचे पर्याय उपलब्ध आहेत. पण मोदक म्हणजे गणपतीला अगदीच प्रिय. मोदकाचा नैवेद्य दाखवताना ते करणार्यालाही समाधान मिळतं. मोदकात तळणीच्या मोदकांपेक्षाही उकडीच्या मोदकांना विशेष पसंती. पण उकडीचे मोदक सगळ्यांनाच मनाजोगते जमतात असं नाही. पण उकडीच्याच या प्रकारामधे आणखी एक मोदकाचा सहज सोपा प्रकार आहे. तो म्हणजे रव्याचे मोदक. उकडीच्या पध्दतीनेच हे मोदक केले जात असले तरी या मोदकांचा पोत ते चव सगळंच वेगळं आणि भन्नाट असतं. पारी रव्याची आणि सारण गूळ आणि सुक्या मेव्याचं. रव्याचे हे मोदक करणं अतिशय सोपं आहे, फक्त साहित्याचं प्रमाण नीट हवं.
रव्याचे मोदक करताना 1 कप रवा, 1 कप दूध, 1 मोठा चमचा तूप, चिमूटभर मीठ, 3 मोठे चमचे साखर, पाव कप बारीक किसलेला गूळ आणि 2 मोठे चमचे सुका मेवा घ्यावा.
छायाचित्र- गुगल
मोदक करताना आधी रवा मध्यम आचेवर चार ते पाच मिनिटं कोरडाच भाजून घ्यावा. रव्याला खमंग वास सुटला की गॅस बंद करावा. रवा भाजताना त्याच रंग बदलायला नको. एका कढईत दूध गरम करावं. त्यात एक चमचा तूप घालावं. दुधाला उकळी येवू द्यावी. दूध उकळलं की त्यात भाजलेला रवा घालावा आणि तो त्यात चांगला मिसळून घ्यावा. त्यानंतर रव्यात साखर आणि वेलची पावडर घालावी. रवा पुन्हा एकदा चांगला घोटून घेतला की झाकण ठेवून बाजूला ठेवावा.
छायाचित्र- गुगल
सारणासाठी गूळ बारीक किसून घ्यावा. तो एका भांडयात गरम करावा. गूळ फक्त दोन ते तीन मिनिटंच गरम करावा. नंतर यात सुक्या मेव्याचे तुकडे घालून गॅस बंद करावा. उकड घेतलेला रवा एका ताटात घेऊन तो चांगला मऊसर मळून घ्यावा. लिंबाच्या आकाराचे गोळे करुन घ्यावेत. हाताने गोळा पसरवून घ्यावा. मोदकाच्या साच्याला तूप लावावं. हातानं केलेली पारी साच्यावर ठेवावी. त्यात छोटे एक किंवा दोन चमचे गुळाचं सारण भरावं आणि साचा बंद करुन मोदक करावा.
छायाचित्र- गुगल
असे सर्व मोदक केले की नैवैद्यासाठी रव्याचे मोदक तयार होतात. रव्याच्या मोदकासाठी ओलं खोबरं, गूळ, सुका मेवा हे जिन्नस घालूनही सारण तयार करता येतं. उकडीच्या पध्दतीचे हे सोपे मोदक एकदा बाप्पाला नैवेद्य म्हणून कराच.