Join us  

सातूचं पीठ नाही खाल्लं कधी? उन्हाळ्यात खावं असं हे सुपरफूड, त्याचे फायदे कमाल आहेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 7:46 PM

सातूचं पीठ हा पदार्थ मागे पडला असला तरी तो उन्हाळ्याच्या काळात मूद्दाम करुन खावा असा आहे. सातूच्या पिठातील तत्त्वं शरीराचं भरण पोषण तर करतातच शिवाय मधुमेह, पोटाची काळजी, रक्तदाब, वजन आणि केसांचं आरोग्य या अनेक कारणांसाठी ते आरोग्यास लाभदायकही आहे.

ठळक मुद्देरोज सकाळी नाश्त्यास सातूचं पिठ खाल्ल्यास पोटाचं आरोग्य चांगलं राहातं.उन्हाळ्याच्या काळात नियमित सकाळच्या नाश्त्याला एक बाउल सातूचं पीठ खाल्ल्यास भूक भागते. पोट बराच काळ भरल्यासारखं राहातं.वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात नियमित सकाळच्या नाश्त्याला सातूच पीठ खायलाच हवं.

 नवीन पदार्थांच्या गर्दीत अनेक पारंपरिक पदार्थ मागे पडत आहे. हरवत चालले आहेत.त्यातलाच एक पदार्थ म्हणजे सातूचं पीठ. पूर्वी उन्हाळ्याच्या दिवसात सकाळच्या नाश्त्याला सातूचं पीठ आवर्जून खाल्लं जायचं.  लहानांपासून मोठांपर्यंत सर्वजण सातूचं पीठ आवडीनं खायचे. शिवाय तहान लाडूसाठी सातूच्य पिठाचे लाडूही करुन ठेवले जात. उन्हाळ्यात येणारा थकवा, शरीराची होणारी झीज भरुन काढण्यासाठी थंड गुणाचं सातूचं पीठ हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. हा पदार्थ मागे पडला असला तरी तो उन्हाळ्याच्या काळात मुद्दाम करुन खावा असा आहे. सातूच्या पिठातील तत्त्वं शरीराचं भरण पोषण तर करतातच शिवाय मधुमेह, पोटाची काळजी, रक्तदाब, वजन आणि केसांचं आरोग्य या अनेक कारणांसाठी ते आरोग्यास लाभदायकही आहे.

 

सातूचं पीठ खाण्याचे फायदे

-सातूच्या पिठातील ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो. त्यामुळे मधुमेहासारखे विकार नियंत्रित राहातात. ज्यांना मधुमेह आहे त्यांना सातूचं पीठ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कारण नियमित सातूच्या पिठाच्या सेवनानं मधुमेह हळूहळू नियंत्रणात येतो.

- रोज सकाळी नाश्त्यास सातूचं पिठ खाल्ल्यास पोटाचं आरोग्य चांगलं राहातं. सातूच्या पिठात मोठया प्रमाणात तंतूमय घटक असतात. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी त्याची मदत होते. सातूचं पीठ खाल्ल्यानं पोट बराच काळ भरल्यासारखं राहातं. पण म्हणून त्यामुळे पोट जडही होत नाही हे विशेष.

- रक्तादाब सारखा वाढत असेल त्यांच्यासाठीही सातूचं पीठ हे आरोग्यदायी ठरतं. कारण यात डाळव्या असतात. आणि त्यात फॅटी अ‍ॅसिड असतं. फॅटी अ‍ॅसिडमुळे रक्तादाबास कारणीभूत असलेले प्रोस्टाग्लॅन्डिसची निर्मिती कमी होते. डाळाव्यामधील इतर घटकांमुळेही रक्तदाब लवकर नियंत्रित होतो. म्हणूनच रक्तदाबासंबंधित आजारासाठी सातूचं पीठ हे फायदेशीर मानलं जातं.

- उन्हाळ्याच्या काळात नियमित सकाळच्या नाश्त्याला एक बाउल सातूचं पीठ खाल्ल्यास भूक भागते. पोट बराच काळ भरल्यासारखं राहातं. त्यामुळे भूकेवर नियंत्रण राहातं. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी सातूच्या पिठाचा उपयोग होतो. पोट आणि कमरेवरील चरबी कमी करण्यासाठी सातूचं पीठ मदत करतं.

- उन्हाळ्यात उन आणि प्रदूषण याचा परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो. या काळात अनेकजणींचे केस गळतात. शिवाय अकाली केस पांढरेही होतात. केसांच्या या समस्या रोखण्यासाठी सातूच्या पिठाचं सेवन लाभदायक असतं.

-सातूच्या पिठाच्या नियमित सेवनानं  रक्ताची कमतरता भरून निघते.

सातूचं पीठ कसं करावं?- आरोग्यास अनेक तऱ्हेने उपकारक ठरणारं सातूचं पीठ घरच्याघरी तयार करणं अगदीच सोपं आहे. शिवाय यासाठी जिन्नसही कमी लागतं. समजा अर्धा किलो गहू घेतले तर अर्धा किलोच डाळवं ( चिवड्यात टाकतो ते) घ्यावं, अर्धा चमचा सूंठ पूड आणि थोडी वेलची पावडर एवढंच घ्यावं लागतं.

- सातूचं पीठ तयार करण्यासाठी गहू धूवून दहा ते पंधरा मिनिटं भिजवून नंतर निथळून कपड्यावर वाळत घालावेत. ते जरा ओलसर असतानांच खलबत्त्यात कांडून घ्यावेत. ते सूपात पाखडून घ्यावेत. पाखडलेले गहू वाळवून घ्यावेत. वाळलेले गहू लोखंडी कढईत खमंग भाजावेत. मग गहू आणि डाळवं एकत्र करुन ते गिरणीतून दळून आणावेत. तयार झालेल्या पिठात सूंठपूड आणि वेलची पूड घालून ते चांगलं मिसळून घ्यावं. हे पिठ एकदा चाळून घ्यावं आणि कोरड्या बरणीत भरुन ठेवावं. हे सातूचं पीठ एकदा केलं की भरपूर दिवस टिकून राहातं.- नाश्त्यासाठी सातूचं पीठ तयार करताना ते गोड तिखट असं दोन्ही स्वरुपात करता येतं. गोड पीठ करताना एक वाटी सातूचं पीठ, त्यात आवडीनुसार गूळ, दूध किंवा पाणी घालावं. ते अधिक गूणवर्धक करण्यासाठी त्यात ओलं खोबरं खोवून किंवा सुक्या खोबऱ्याचा किसही घालता येतो.

बलवर्धक सातूच्या पिठाचे लाडू करताना सातूचं पीठ, पिठी साखर आणि तूप इतकंच जिन्नस लागतं. सातूचं पिठ, पिठी साखर एकत्र करुन त्यावर गरम तूप घातलं की लाडू वळायला येतात.